'जवद ' वादळाचा धोका......

'जवद' वादळाचा धोका......  

वेब टीम मुंबई : डिसेंबर म्हटलं की डोळ्यासमोर येते गुलाबी थंडी. यंदा मात्र थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी संततधार बसरल्यानंतर गुरुवारीही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडलाय. तर दुसरीकडे पूर्व किनारपट्टीलाही ‘जवद’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडतोय. पण नक्की हे असं का होतंय? यामागील कारणं काय आहेत?, नक्की पूर्व किनारपट्टीवर काय इशारा देण्यात आलाय? या साऱ्या प्रश्नांवर टाकलेली नजर…

महाराष्ट्रामध्ये पाऊसच पाऊस…

लांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभूती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला. बुधवारची ही पावसाची रीपरीप गुरुवारीही सुरुच राहिल्याचं चित्र दिसत आहे. 

एकीकडे राज्याची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्रातील अनेक शहरं, जिल्हे डिसेंबरमध्ये ओलेचिंब झालेले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका आहे. ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात किनारपट्टीवरील जिल्ह्यांना इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं असे आदेश दिलेत.

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शनिवारी पहाटच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता आहे.

हे वादळ जमीनीला धडकेल तेव्हा त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास इतका असेल. भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र लॅण्डफॉल नक्की कुठे होणार हे सांगता येणार नाही असं म्हटलंय. ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ३ डिसेंबरपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचा भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तीन डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल असं महापात्रा म्हणाले.

हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

अरबी समुद्रामध्ये ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. १ डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्रापासून कच्छपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या पश्चिम भागात त्याचा परिणाम होतो आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, ते आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. या चक्रीवादळाला जवद असं नाव देण्यात आलं आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिलं आहे.


Post a Comment

0 Comments