कारभारात सुधारणा करा : आ.संग्राम जगताप यांचा वीज वितरणाला इशारा
वेब टीम नगर : नागरिक आणि महावितरणच्या दर्जाहीन सेवा यामुळे यामध्ये सातत्याने वाद उपस्थित होत असतात. यातच नगर शहरात महावितरणच्या नियोजनशून्य आणि मनमानी कारभारामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.कारभारात सुधारणा करा, शहरात या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दात आ. संग्राम जगताप यांनी महावितरणच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान नगर शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर आ. जगताप यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना पत्र देऊन याबाबत संयुक्त बैठक लावण्याची सूचना केली होती.त्यानुसार बुधवारी महावितरणच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत आ. जगताप यांनी शहरातील विज ग्राहकांना होत असलेल्या विविध त्रासाबाबत महावितरणच्या अधिकार्यांना चांगलेच सुनावले.
नागरीक पैसे भरण्यास तयार आहेत, मात्र महावितरणकडून नागरीकांना वेळेवर बिले दिली जात नाहीत. मीटर रिडींग न घेता अंदाजे भरमसाठ बिले दिली जातात आणि बिले भरण्यासाठी दमबाजी केली जाते.नागरिकांचे याबाबत काहीही ऐकून घेतले जात नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत. वीज कनेक्शन तोडण्याच्या, मीटर काढुन नेण्याच्या, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. यात तातडीने सुधारणा करावी, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
0 Comments