मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित

वेब टीम मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली केल्यानंतर आजच आदेश निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं याआधी सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज अधिकृतपणे कारवाई करण्यात आली.

आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला होता. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.

पत्राने उडवून दिली होती खळबळ

मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत.

खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते.सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचं सांगितलं होतं. तसंच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विमानतळावरून थेट कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हजर झाले होते.

Post a Comment

0 Comments