“तेव्हातरी कुठे झालं विलिनीकरण?”, महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर

“तेव्हातरी  कुठे झालं विलिनीकरण?”, महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर

वेब टीम मुंबई : जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं..?, अशा शब्दात भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, “आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण? रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे”.

आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा झालं नाही, जनतेनं हुशार होणं हाच मार्ग असल्याचं महादेव जानकर म्हणाले. त्यामुळं महादेव जानकर यांनी भाजपला एक प्रकारे घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जात आहे.

बुलडाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महादेव जानकर आले होते. तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं. जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

Post a Comment

0 Comments