“प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज”, भारताचा चीनला इशारा!

“प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज”, भारताचा चीनला इशारा! 


सीमाभागात चीनकडून आगळीक होण्याची शक्यता 

वेब टीम गलवान : गलवान प्रांतात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनकडून सातत्याने अतिक्रमण केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. चीनबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी वारंवार टीका केल्यानं एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पूर्वेकडच्या सीमाभागात चीनकडून आता हालचाली वाढवण्यात आल्यामुळे सामरिक दृष्ट्या देखील या मुद्द्यावरून तणाव निर्माण होऊ लागला आहे. मात्र, भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज असल्याचा ठाम निर्धार इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांना लागून असलेल्या सीमाभागात चीनी लष्कराच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाभागात चीनच्या बाजूला चीनी सैन्यानं गस्तीचं प्रमाण वाढवलं आहे. त्याशिवाय, सैन्याच्या विविध तुकड्यांचा एकत्रित सराव देखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीनकडून पुन्हा एकद आगळीक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून देखील आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याचं पांडे यांनी सांगितलं.

“लष्कर, वायूदल यांच्या संयुक्त तुकड्यांचा सराव चीन सीमाभागात करत आहे. यावर्षी त्यामध्ये विशेष वाढ झाल्याचं दिसून येत आहे. बऱ्याच काळापासून ते या प्रकारचा सराव करत आहेत. शिवाय, सीमाभागात चीनकडून गस्तींचं प्रमाण देखील वाढलं आहे”, असं मनोज पांडे म्हणाले.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून चीनच्या बाजूने आमची चिंता वाढल्याचं मनोज पांडे यांनी सांगितलं. “गेल्या दीड वर्षांपासून चिंता वाढली आहे. पण लष्कराच्या इस्टर्न कमांडनं आपली पूर्ण तयारी केली असून कोणत्याही प्रकारच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी लष्कर सज्ज आहे”, असं ते म्हणाले.

“आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्ती वाढवल्या आहे. चीननं आगळीक केलीच, तर प्रत्येक सेक्टरमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे पुरेसं सैन्यबळ उपलब्ध आहे. गस्तीसाठी सर्वेलन्स ड्रोन्सचा देखील वापर करण्यात येत असून अत्याधुनिक रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि नाईट विझिबिलिटीसाठीची सामग्री आपल्याकडे उपलब्ध आहे”, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments