आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्याने प्रेयसीच्या भावाचा खून;प्रियकराला अटक

आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्याने प्रेयसीच्या भावाचा खून;प्रियकराला अटक

वेब टीम नागपूर: आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्याने प्रियकराने प्रेयसीच्या १२ वर्षीय भावाची गळा आवळून हत्या केली. ही थरारक घटना सोमवारी रात्री नागपूर शहरातील वाडी भागात उघडकीस आली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला अटक केली आहे. स्नेहल सोनपिंपळे (वय १९ रा. विवेकानंदनगर),असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. सूर्यांश (बदललेले नाव),असे मृतकाचे नाव आहे. तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर मुलाच्या रहस्यमय हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

सूर्यांशचे आई-वडील मजूर असून, सूर्यांश याला मोठी बहीण रिया आहे. स्नेहल व तिचे प्रेमसंबंध आहेत. सोमवारी दुपारी रियाने सूर्याश याला किराणा दुकानात पाठविले. याचदरम्यान स्नेहल हा तिच्या घरी आला. काही वेळाने सूर्यांश घरी परतला. त्याला बहीण व स्नेहल आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. दोघांनी सूर्यांश याला समजवायला सुरुवात केली. याबाबत कोणालाही न सांगण्याची विनंती केली. घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगेन, असे सूर्यांश दोघांना म्हणाला. त्यावर स्नेहल संतापला. त्याने सूर्यांश याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर रियाकडून दुपट्टा घेत स्नेहल याने सूर्यांशचा गळा आवळून खून केला. रियाला गप्प राहण्याची धमकी देत स्नेहल तेथून पसार झाला. या घटनेने रिया घाबरली. तिने मुलांनी मारहाण केल्याने सूर्यांश बेशुद्ध झाल्याचा बनाव करीत आई-वडिलांना माहिती दिली. त्याची आई घरी आली असता सूर्यांशला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सूर्यांश याला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नुरूल हसन, वाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. रिया देत असलेल्या माहितीवर पोलिसांना संशय आला. त्यांनी रियाच्या मोबाइलचे कॉल डीटेल्स तपासले. ती सतत स्नेहलच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात कसून चौकशी केली असता रियाचे स्नेहलसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. त्यानंतर स्नेहलने गळा आवळून भावाला ठार मारल्याची तिने पोलिसांपुढे कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी स्नेहल याला अटक केली. वृत्त लिहिपर्यंत पोलीस स्नेहल व रियाची चौकशी करीत होते. याप्रकरणात रियालाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments