कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी पुढच्या आठवड्यात काँग्रेसमध्ये?

कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी पुढच्या आठवड्यात काँग्रेसमध्ये?  

वेब टीम नवी दिल्ली : जेएनयू (JNU) विद्यापीठातल्या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमारआणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी हे लवकरच काँग्रेसमध्ये  प्रवेश करणार अशी चर्चा आहे. पुढच्या आठवड्यातच हा प्रवेश होईल अशी जोरदार चर्चा सध्या दिल्लीत सुरु आहे. 

कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवानी देशाच्या राजकारणातले दोन युवा चेहरे... एकाचा उदय जेएनयू विद्यापीठातल्या कारवाईतून तर दुसरा मोदींच्या गुजरातमध्ये दलित अत्याचाराविरोधात लढणारा. लवकरच हे दोन नेते काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा आहे. कन्हैय्या कुमारनं काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची भेटही घेतली होती. अगदी पुढच्या आठवड्यातच हे दोघे काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. 

कन्हैय्या, जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील होणार याची नेमकी तारीख काय याबद्दल दोन तर्क आहेत. काहीजण म्हणतायत 2 ऑक्टोबर...गांधी जयंतीचा मुहूर्त साधत हा प्रवेश होईल..तर त्याआधी 27 सप्टेंबरला भगतसिंह यांची जयंतीही आहे..त्यामुळे 27 किंवा 28 सप्टेंबरला हा कार्यक्रम होईल अशीही चर्चा ऐकायला मिळतेय. 

काँग्रेसची पडझड रोखणार युवा चेहरे

याआधी गुजरातमध्ये हार्दिक पटेल याला काँग्रेसनं आधीच पक्षात स्थान दिलं आहे. आता कन्हैय्या कुमार, जिग्नेश कुमार यांनाही पक्षात आणून मोदींविरोधात थेट टक्कर देणाऱ्या तरुणांचा शोध काँग्रेसनं सुरु केल्याचं दिसतंय

कन्हैय्या कुमार 34 वर्षांचा आहे तर जिग्नेश मेवाणी 38 कन्हैय्यानं बिहारच्या बेगुसरायमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवलीय

तर जिग्नेश मेवाणी हा गुजरातमधे अपक्ष आमदार  जिग्नेश मेवाणीला मागच्या निवडणुकीत त्याला निवडून आणण्यात काँग्रेसनं मदतही केली होती. त्यामुळे त्याचं काँग्रेसमध्ये येणं हे तसं सहज आहे. पण कन्हैय्यासाठीचा प्रवास मात्र लांबचा आहे...एकतर भाकपमध्ये प्रवेश करुन त्यानं लोकसभेची निवडणूकही लढवली होती..या पक्षाचा भारतीय राजकारणात फारसा प्रभाव उरलेला नाहीय...पण डावी विचारसरणी सोडत काँग्रेस हा टप्पा त्याला पार करावा लागेल..बिहारमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाहीय.. त्यात आरजेडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष..त्यामुळे कन्हैय्या कुमारची एन्ट्री झाल्यावर तेजस्वी यादवच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस-आरजेडीच्या मैत्रीवर त्याचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असेल. जिग्नेश मेवाणीनं पंजाबमध्ये काँग्रेसच्या दलित मुख्यमंत्री निवडीचं स्वागत ज्या पद्धतीनं केलं त्यातूनच काँग्रेस प्रवेशाचे संकेत मिळत होते.

या दोन नावांसोबतच प्रशांत किशोर यांच्याबाबतही काँग्रेस प्रवेशाची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळते. पण प्रशांत किशोर यांच्या थेट प्रवेशाला पक्षातल्या काही लोकांचा विरोध असल्याचंही कळतंय. कारण त्यांनी भाजपसोबत निवडणूक रणनीतीचं काम केलेलं आहे. 

2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. एकीकडे ज्योतिरादित्य, जितेंद्र सिंह यांच्यासारखे अनेक चेहरे राहुल गांधींची साथ सोडून गेलेत..तर आता ही जागा कन्हैय्या, जिग्नेश भरुन काढणार का हे पाहावं लागेल. एक दिसतंय की जे भाजपला, संघाच्या विचारसरणीला थेट भिडतायत त्यांनाच राहुल गांधी जास्त जवळ करताना दिसतायत..त्याचमुळे प्रदेशाध्यक्षांची निवड असो की नवे तरुण चेहरे अशाच लोकांना अधिक पसंती मिळतेय..


Post a Comment

0 Comments