पेट्रोल ,डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली
वेब टीम नगर: भाजपा सरकारने केलेली भरमसाठ पेट्रोल-डिझेल, गॅस ची दरवाढ आणि वाढलेली महागाई या विरोधात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व फ्रंटलच्या वतीने तालुक्यात सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सोमवार दि. १२ जुलै २०२१ रोजी सकाळी११ वाजता शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब साळुंके म्हणाले की, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात येत्या आठवडाभर सर्व तालुक्यांमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्र सरकार विरोधात भाववाढीच्या निषेधार्थ प्रत्येक तालुक्यात सायकल रॅली, महिलांच्या वतीने गॅस वाढी विरोधात आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन, युवक काँग्रेसचे आंदोलन याचबरोबर सरकार विरोधात सह्यांची मोहीम असे विविध निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली यामध्ये आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राज्य सरचिटणीस उत्कर्षाताई रूपवते, कार्याध्यक्ष सचिन गुजर यांसह सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला .
याप्रसंगी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, केंद्र सरकारने मनमानी धोरण सुरू केले आहे. हे सरकार पूर्णपणे शेतकरी कामगार सर्वसामान्यांच्या विरोधी धोरण घेत असून या धोरणाचा निषेध करण्यासाठी आपण जनजागरण मोहीम आयोजित केली आहे. गावपातळीपर्यंत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवावा. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ होत नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या बॅरल च्या किमती अत्यंत कमी असतानाही मोदी सरकारने मात्र पेट्रोल डिझेल दरवाढ करून भरमसाठ लूट सुरु ठेवली आहे या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे असे आवाहन केले.
तर आमदार कानडे म्हणाले की, मोदी सरकारने फक्त भांडवलदारांना साठी कायदे व नियम बनवणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. केंद्र सरकारमध्ये नवीन मंत्री आले म्हणून सर्वसामान्यांना कोणताही फरक पडणार नसून त्यांच्या जीवनात फरक पडावा यासाठी काँग्रेसच काम करत असून ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्यासाठी करावे.
0 Comments