लवकरच मुलांचे लसीकरण !

लवकरच मुलांचे लसीकरण !

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे स्पष्ट संकेत

वेब टीम नवी दिल्ली : देशातील १२-१७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू करण्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी दिले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पाश्र्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

भाजप संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होईल, असे मंडाविया यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत हा मोठा लसउत्पादक देश असून, आणखी कंपन्यांच्या लशींना लवकरच परवानगी मिळेल, असे मंडाविया म्हणाले. याआधी १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.



१२-१७ वयोगटातील मुलांना लस उपलब्ध करण्यासाठी त्याच्या लवकर चाचण्या घेण्यात याव्यात आणि त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडीला या लशींची मुलांवर चाचणी सुरू आहे. १२ वर्षांपुढील मुलांसाठी झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होईल, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात नुकतेच स्पष्ट केले होते.

सप्टेंबरपासून मुलांना (१२-१८) झायडसची लस देण्यात येईल, असे लसींबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. कोव्हॅक्सीनच्या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबपर्यंत मिळतील, असे ‘एम्स’चे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले होते. मुलांचे लसीकरण सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता डॉ. गुलेरिया यांनी वर्तवली होती. करोनाची साखळी तोडण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले होते. त्याआधीच मुलांचे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसरी लाट रोखण्यास किंवा तिची तीव्रता कमी करण्यास ते उपयुक्त ठरेल, असे मानले जाते. दरम्यान, युरोपने १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मॉडर्ना लशीच्या वापरास नुकतीच परवानगी दिली आहे.

लसपुरवठय़ाचे आव्हान

देशात आतापर्यंत ४४ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. देशातील नागरिकांचे वर्षांअखेपर्यंत लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, लसीकरण संथगतीने सुरू आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण होत असून, या मोहिमेत १२ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश झाल्यानंतर लसपात्रताधारकांमध्ये वाढ होईल. त्यामुळे लसपुरवठय़ाचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे.

शाळांसाठी आशेचा किरण

करोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू करण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे

Post a Comment

0 Comments