मूकबधिर महिलेवर बलत्कार करणाऱ्या आरोपीस गुजरात मध्ये अटक

मूकबधिर महिलेवर बलत्कार करणाऱ्या आरोपीस गुजरात मध्ये अटक 

वेब टीम मुंबई : पहाटेच्या सुमारास कामावर जाणाऱ्या मूकबधिर तरुणीला हेरून तिचा पाठलाग करत निर्मनुष्य ठिकाणी बलात्कार करून पळून जाणाऱ्याला अखेर महात्मा फुले पोलिसांनी अथक परिश्रमाने गुजरातमधून अटक केली. अश्विन राठवा (१९) असे त्याचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी कर्जत ते सीएसएमटी परिसर पिंजून काढला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या या आरोपीचा माग काढत अखेर जेरबंद करण्यात आले.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणारी २३ वर्षीय मूकबधिर तरुणी शुक्रवार, २ जुलैला पहाटे ५.३०च्या सुमारास कामावर निघाली होती. तिच्या भावाने तिला रेल्वेच्या जिन्यापर्यंत सोडल्यानंतर ती रेल्वेचा जिना उतरून पार्किंगजवळील मार्गाने सुभाष चौकाकडे निघाली होती. सुभाष चौकात कंपनीची बस तिला घेण्यासाठी थांबली होती. मात्र निर्मनुष्य रस्त्यातून जाणाऱ्या या तरुणीला हेरून अश्विनने तिला पकडून खेचत रेल्वेच्या पडीक बंगल्याच्या आत नेले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या हातातील फोन खेचून तो पळून गेला होता.

आरोपी रेल्वेच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे शेवटचे ठिकाण कळवा झोपडपट्टीत मिळाले होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. आरोपीचा माग काढत असताना मागील आठ ते १० दिवसांपासून तो ठाण्यात राहत असल्याचे समजले. त्याचा पत्ता काढून शोध घेत असताना तो पोलिसांना गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानकावर फिरताना सापडला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पीडित तरुणीचा चोरलेला मोबाइलही हस्तगत केला आहे.

कल्याण न्यायालयाने अश्विनला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्याच्या नावावर आणखी काही गुन्हे आहेत का, याचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments