कामावरून काढलेल्या कामगारांनी कारखान्यात ठेवले 'पाईप बॉम्ब '

 कामावरून काढलेल्या कामगारांनी कारखान्यात ठेवले 'पाईप बॉम्ब'

वेब टीम तिरुनेलवेली : करोनानं आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर केलेल्या हल्ल्यात देशातील अनेक नागरिक बेजार झाले आहेत. अशातच तामिळनाडूच्या तिरुनेलवेली शहरातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. तिरुनेलवेली शहराच्या शंकर नगर भागात एका खासगी सीमेंट कारखान्यात दोन '

पाईप बॉम्ब' आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत करोनाकाळात सध्या कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून हे बॉम्ब कारखान्यात ठेवण्यात आल्याचं समोर आलंय.

करोना काळात प्रशासनानं जाहीर केलेले नियम पाळताना आणि आपली कामं सांभाळताना कंपन्यांची, कारखान्यांची त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे. तामिळनाडू राज्य सरकारनं सीमित संख्येत लोकांना काम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर संबंधित खासगी सीमेंट कारखान्याच्या मालकांनी काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाईप बॉम्ब अतिशय शक्तीशाली होते. बॉम्बचा स्फोट झाला असता तर कारखान्याला जबर नुकसान सहन करावं लागलं असतं. बॉम्ब ताब्यात घेऊन ते निष्क्रीय करण्याचं काम पोलीस करत आहेत.

प्राथमिक चौकशीनंतर बुधवारी सहा संशयितांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

करोना काळात अचानक कामावरून काढण्यात आलेले कर्मचारी आर्थिक परिस्थितीशी झुंजत होते. अशातच या कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कारखान्यात पाच ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकीही या कर्मचाऱ्यांनी दिली होती.

या घटनेची तक्रार कारखाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांत नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी परिसराची झाडाझडती घेतली. तपासणीत बॉम्बविरोधी पथकाकडून दोन पाईप बॉम्ब जप्त करण्यात आले. हे बॉम्ब संबंधित कर्मचाऱ्यांनीच ठेवल्याची दाट शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलीय. घटनेची एफआयआर नोंदवत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

या दरम्यान कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सिमेंट कारखान्यात जवळपास १०० कायमस्वरुपी कर्मचारी तर हजारांहून अधिक कंत्राटी मजूर काम करत आहेत. ही कंपनी तामिळनाडूसहीत केरळ राज्यात बांधकाम साहित्य पुरवते.

Post a Comment

0 Comments