डेल्टा प्लस व्हेरिएंट बद्दल या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्यात!
डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लसमध्ये झालंय
वेब टीम मुंबई : देशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंट हा करोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालेला नवा प्रकार आढळून आला आहे. सध्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेले ४० रुग्ण आहेत. या प्रकारामुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे. मात्र या नव्या प्रकाराबद्दल सर्वांना काही गोष्टी माहित असायलाच हव्यात.
१. डेल्टा प्लस व्हेरिएंट हा प्रामुख्याने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेशाच्या काही भागांमध्ये आढळून आला आहे. लवकर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी या राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
२. या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण मध्य प्रदेशच्या भोपाल आणि शिवपुरी, महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव तर केरळच्या पलक्कड आणि पथनमथिट्टा या भागांमध्ये आढळून आले आहेत.
३. करोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष व्ही.के. पॉल यांच्या म्हणण्यानुसार विषाणूचा हा प्रकार मार्चपासूनच युरोपातल्या काही भागात आढळण्यास सुरुवात झाली होती. मात्र १३ जूनला विषाणूचा हा प्रकार प्रकाशझोतात आला.
४. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूच्या या प्रकाराबद्दल अजून अभ्यास सुरु आहे. त्यामुळे याचं गांभीर्य, याच्यासाठीचे उपचार, लसींचा प्रभावीपणा या सगळ्याबद्दल अजून फारशी माहिती नाही. ह्या विषाणूच्या प्रकाराचं अद्याप निरिक्षण सुरु आहे.
५. विषाणूचा हा नवा प्रकार वेगाने पसरणारा असून सध्याच्या करोना उपचारांना निष्प्रभ करणारा ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
६. हा विषाणू अधिक वेगाने पसरणारा, फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचवणारा आणि अँटिबॉडींना प्रतिकार करणारा आहे, मात्र यावर अद्याप संशोधन सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
७. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंट हा सध्या नऊ देशांमध्ये आढळून आला आहे. हे नऊ देश- अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, जपान, रशिया, चीन आणि भारत
८. १८ जूनपर्यंत या विषाणूच्या २०५ संरचना आढळून आल्या आहेत. त्यापैकी अर्ध्याच्या वर ह्या अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आढळून आल्या आहेत.
९. महाराष्ट्र करोना कृती दलाचे सदस्य शशांक जोशी सांगतात, सध्या या विषाणूच्या प्रकाराबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आपण सध्याचे करोना प्रतिबंधाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. दोन मास्कचा वापर, गर्दी टाळणे, लसीकरण मोहीम सुरुच राहायला हवी .
0 Comments