नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे तर उपमहापौर गणेश भोसले

नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे तर उपमहापौर गणेश भोसले


वेब टीम नगर : नगर शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश पुंडलिक भोसले यांची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही पदासाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केवळ बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक होती. दरम्यान, या निवडणुकीत पंधरा नगरसेवक असलेल्या भाजपचे हसू झाले तर महापौरपदावर दावा ठोकणार्‍या काँग्रेसचा बार फुसका निघाला. 

नगरचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांची मुदत बुधवारी दि. ३०जून रोजी संपुष्टात येत होती. त्यापूर्वी नवीन महापौर-उपमहापौर निवडणे आवश्यक होते. मात्र राजकीय खलबते, सरकारस्तरावरील हालचाली यामुळे मुदत संपायच्या दिवशीच नवीन महापौर-उपमहाौपरांच्या निवडीची तारीख ठरली. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. सोमवारी महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे रोहिणी शेंडगे यांनी तर मंगळवारी उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडीसाठी बुधवारी दि. ३० रोजी होणार्‍या सभेत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होणे शिल्लक होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले पिठासीन अधिकारी असलेल्या या सभेत अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर माघारीसाठी वेळ देऊन नंतर महापौरपदी शेंडगे तर उपमहापौरपदी भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. 

राज्यात महाविकास आघाडी असल्याने त्याचाच धर्म नगरमध्ये पाळण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी राष्ट्रवादी  आणि शिवसेनेने या निवडीच्या सर्व प्रक्रियेपासून काँग्रेसला दूर ठेवले होते. अवघे पाच नगरसेवक असतानाही महापौरपदासाठी काँग्रेसने सर्वात अगोदर दावा केला होता. मात्र या दाव्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीने दुर्लक्ष तर केले होतेच, पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही तो फारसा गांभिर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्या पत्नी शिला चव्हाण महापौरपदासाठी इच्छूक होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी या निवडणुकीसाठी आघाडी करताना काँग्रेसला कुठेही विचारात घेतले नाही. पर्यायाने मोठ्या ऐटीत दावा करणारी काँग्रेस एकाकी पडली. काँग्रेसच्या कोणत्याच वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे लक्ष दिले नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर चव्हाण यांची भिस्त होती. मात्र महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत थोरात यांनी चव्हाण यांना भेट दिली नसल्याचीही चर्चा आहे. खुद्द चव्हाण यांच्याशी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात चौकशी केली असता, त्यांनीही अद्याप मंत्री थोरात यांच्याशी चर्चा होऊ शकली नसल्याचे सांगितले. मुदत संपत आली तरीही ही भेट होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसचे उर्वरित चार नगरसेवकांनी जे समजायचे ते समजून महापालिकेत धाव घेत हा महापौर-उपमहापौर महाविकास आघाडीचाच असल्याचे सांगत आम्ही पण शिवसेना-राष्ट्रवादीबरोबर असल्याचा दावा केला. निवडीनंतर काँग्रेसच्या या भूमिकेवर खिल्ली उडवीली जात होती. महापौरपदावरील त्यांचा दावा किती फुसका होता, याची चर्चा नंतर रंगली.

दुसरीकडे मागील अडीच वर्षे महापौर, उपमहापौर, सभापती अशी महत्त्वाची पदे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ताब्यात घेऊन सत्ता उपभोगणार्‍या भाजपचे या निवडणुकीत पुरते हसू झाले. महापौरपद अनुसुचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपकडे उमेदवारच नसल्याने पंधरा नगरसेवक असूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून त्यांना शुन्य किंमत देण्यात आली. आमच्याकडे कोणीच फिरकले नाही, ही खंत भाजप नगरसेवक अखेरपर्यंत व्यक्त करत होते. महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी उपमहापौरपदासाठी भाजप रिंगणात उतरू शकत होता. मतांची बेरीज होत नसल्याचे कारण देऊन नंतर त्यांना या निवडणुकीतून माघार घेता आली असती. मात्र मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीने केलेल्या उपकाराचे ओझे असल्याने त्यांच्या विरोधात उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे धाडस भाजपमध्ये उरले नव्हते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून निवडीपर्यंतच्या प्रक्रियेत कुठेही भाजप दिसली नाही.  (फोटो-डीएससी-०३४०,एन सी पी )

Post a Comment

0 Comments