मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित करण्याचा निर्णय

मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित करण्याचा निर्णय

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने

चुकीचे धोरण व हुकुमशाही पध्दतीने देशात अनागोंदी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप

वेब टीम नगर: गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकीचे धोरण व हुकुमशाही पध्दतीने देशात अनागोंदी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पंतप्रधानांचा सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे. तर देशाचे वाटोळे झाले असताना पंतप्रधान मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर लहरीपणाने निर्णय घेतल्याने देशात अनागोंदी निर्माण झाली. सर्व अधिकार जास्तीत जास्त स्वतःकडे घेऊन मंत्र्यांना निर्णय करण्याची क्षमता कमी करून टाकली. सत्तेचे केंद्रीकरण करुन पंतप्रधान कार्यालयाकडे सर्व अधिकार प्राप्त करुन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी त्यांना करता आली नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे संमत करून लोकशाही धोक्यात आली आहे. सत्तेवर येण्यापुर्वी भारतीयांचा काळापैसा देशात आणू व देशाचा विकास साधू, अशा पध्दतीने नागरिकांना खोटी आश्‍वासने देण्यात आली होती. मात्र एक रुपयाचा काळा पैसा पुन्हा भारतात आलेला नाही. भोळीभाबडी जनतेने भूल थापांना प्रतिसाद देऊन त्यांना सत्तेवर बसवले. मात्र त्यांना लोक कल्याणकारी राज्य निर्माण करता आले नाही. घरकुल वंचितांना न्याय देखील देता आलेला नाही. अहमदनगर महापालिकेत घरकुल वंचितांच्या 20 हजार सदस्यांच्या यादीत एकालाही घरकुल मिळालेले नाही. आर्थिक कुवत असलेल्यांनी घरे घेताना अडीच लाखांचे अनुदान लाटले. घरकुल वंचित दुबळे घटक या पासून वंचित आहेत. त्यांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही. निवारा या मूलभूत अधिकारापासून ते वंचित आहेत.

 केंद्र सरकारने कोरोना काळात कुंभमेळ्यास परवानगी दिल्याने दुसरी लाट निर्माण झाली व कोरोना काळात अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले. लसीकरणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु असून, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचे म्हंटले आहे. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा भंडाफोड होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments