लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत; अनेक देशांमध्ये लसींचा तुटवडा
वेब टीम नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक स्तरावरील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारताकडे आणि सीरम संस्थेकडे मदत मागितली आहे. बर्याच देशांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीचा दुसरा डोस देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनी सीरमकडे मदत मागितली आहे. सीरम इंस्टीट्यूट ही अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे.
जगातील ३० ते ४० देशांमध्ये लसींचा तुटवडा
कोविशिल्ड लसीचा एक डोस दिल्यानंतर अनेक देशांमध्ये दुसर्या डोसची कमतरता आहे. ही कमतरता तीस ते चाळीस देशांमध्ये आहे. यावर मात करण्यासाठी भारत सरकार आणि सीरम इंस्टीट्यूटकडे ही लस देण्यासाठी मदत मागण्यात आली आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये लसीची कमतरता आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ सल्लागार ब्रूस आइलवर्ड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये करोनाच्या लाटा
भारताच्या शेजारील नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये करोनाच्या अनेक लाटा येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्स मोहिमेअंतर्गत अलिकडच्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर ८० दशलक्षांपेक्षा जास्त लसींचे डोस उपलब्ध केले आहेत. भारतात करोनाच्या दुसर्या लाटेनंतर लसींचा तुटवडा जाणवत आहे. याआधी देखील भारतातर्फे जगातील बर्याच देशांना लस पुरविली गेली आहे.
करोना लसीच्या पुरवठ्याच्या मागणीला वेग
जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की लसींचा पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी भारत सरकार आणि अॅस्ट्राझेनेका-सीरम यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. आरोग्य संघटना त्वरित लसींचा तुटवडा असलेल्या देशांमध्ये करोना लसीची पुरवठा करण्यासाठी अॅस्ट्रॅजेनेका, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) व भारत सरकारबरोबर तातडीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारतातील करोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर आम्हालाही सीरम इन्स्टिट्यूटने लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे कारण कोव्हॅक्स अंतर्गत त्यांचे वितरण करायचे आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रॉस गेब्रीएयसस यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.
0 Comments