तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले आमने सामने ; पोलिसांनी खुनाचा प्रयत्न रोखला

तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट  भिडले आमने सामने ; पोलिसांनी खुनाचा प्रयत्न रोखला

वेब टीम नगर : शहरातील बोलेगाव परिसरातील गांधीनगर भागांमध्ये महिलांच्या दोन गटातमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये येत असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर जोरदारपणे भिडले. हातामध्ये चाकू व कोयता घेत दोन जणांवर पोलीस ठाण्याच्या आवारातच हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, विशेष म्हणजे तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाला अटकाव केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

गणेश कुऱ्हाडे , अक्षय डाके, किरण सोमनाथ,  सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे प्रथमेश चौरे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा तर दुसऱ्या फिर्यादी वरून सचिन निकम, जयेश पाटोळे व दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गांधीनगर येथे आज दुपारी एकच्या सुमाराला दोन महिला गटामध्ये जोरदार वादावादी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ पोलिसांच्या पथकाला त्या ठिकाणी जाण्यास सांगितले. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले असतानाच ते दोन्ही गट हे तोफखाना पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले होते. पोलिस ठाण्यात येत असताना पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. यामध्ये एका गाडीच्या काचा सुद्धा फोडलेल्या आहे. गणेश कुऱ्हाडे याने सचिन निकम व त्याचा मित्र गणेश पाटोळे याच्यावर चाकू हल्ला केला. पोलीस ठाण्याच्या आवारात प्रकार सुरू असतानाच त्या ठिकाणी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे व वैशाली भामरे यांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटाला बाजूला काढण्यामध्ये शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला. या घटनेमध्ये सचिन निकम यांच्या डोक्याला मार लागला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये सर्व बाबी या उघड झालेल्या आहेत. कशा पद्धतीने एकमेकांना हे गट भिडले हे पाहिल्यानंतर थेट पोलिस ठाण्याचा आवारातच प्रकार घडल्यामुळे दोन्ही गटावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला 

पोलिस ठाण्याच्या आवारात दोन्ही गट एकमेकांना भिडले असताना चाकू व कोयता यासारखे हत्यार एकमेकांवर काढून वार केले. त्या ठिकाणी असलेले दोन पोलीस कर्मचारी जर सोडवायला आले नसते, तर मोठी दुर्घटना घडली असती. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे व वैशाली भामरे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणा मधील आरोपी गणेश कुऱ्हाडे याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे या अगोदर पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये तो सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे .

Post a Comment

0 Comments