दुसऱ्या लाटेत मनपातील १६ कर्मचाऱयांचा दुर्दैवी मृत्यू

दुसऱ्या लाटेत मनपातील १६ कर्मचाऱयांचा दुर्दैवी मृत्यू 

प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविणार 

वेब टीम नगर : महानगरपालिकेतील तब्बल १९ कर्मचार्‍यांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या लाटेत अहमदनगर पालिकेतील फक्त ३ कर्मचारी कोरोनामुळे मृत पावले पण दुसर्‍या लाटेने नगरमध्ये हाहाकार माजवला असतानाच पालिकेतील फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आणि तब्बल १६ जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे प्रस्ताव पालिका वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दोन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे यापूर्वीच पाठवण्यात आले असून उर्वरित प्रस्तावही लवकरच पाठवण्यात येतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनामुळे प्रशासनातील कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. पहिल्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही कर्मचार्‍यांना राज्य शासनाकडून ५० लाखांची मदत मिळालेली आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. मधल्या काळात कोरोना आटोक्यात आला असतानाच कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाली आणि पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेकांना अपुर्‍या आरोग्य व्यवस्थेमुळे नाहक प्राण गमवावा लागला. तसेच काही जणांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करताना देखील कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालिका कर्मचारी हे फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करत असताना त्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने शासनाच्या मदतीसाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments