करोनाच्या तिस-या लाटेपुर्वीच राज्यशासनाला सज्जतेचे आवाहन
-जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांचा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचेशी पत्रव्यवहार
वेब टीम नगर : करोनाच्या दुस-या लाटेत महाराष्ट्रात उच्चांकी रुग्णसंख्या झाली आहे.खासकरुन ग्रामीण भागातील वातावरण भयग्रस्त आहे.लोकांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्याने किरकोळ अंगदुखी असली तरी घरगुती उपचार किंवा स्थानिक वैद्यकाच्या सल्ल्याने उपचार केले जातात.करोना उपचाराचा येणारा खर्च लोकांच्या नजरेसमोर असल्याने ही परिस्थिती होते.परिणामी करोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.करोनाची तिसरी लाट दृष्टीक्षेपात घेऊन शासनस्तरावर उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती जि.प.अहमदनगरचे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात ते म्हणाले,दुस-या लाटेची ही अवस्था असताना तिस-या लाटेचाही अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.ही लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जाते.दुसरी लाट नियंत्रणात आणणे आणि तिस-या लाटेच्या संकटापुर्वी उपाययोजनांची गरज आहे.
सध्या ठिकठिकाणी कोव्हिड सेंटर सुरु आहेत.परंतु आरोग्य खात्याची धावपळ लक्षात घेता सर्वत्र सेवा देणे शक्य होत नाही.त्यामुळे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अशा सर्व ठिकाणी तातडीने कोव्हिड सेंटर उभारणीची प्रक्रिया चालू करणे गरजेचे आहे.जलसंपदा खाते अंतर्गत असणा-या कर्मचारी वसाहत,शासकीय गोदामे किंवा शासन मालकीच्या ज्या इमारती रिकाम्या असतील अशा सर्व ठिकाणी तात्काळ ही कोव्हिड सेंटर उभारण्याची कार्यवाही सुरु होणे अपेक्षित आहे.१४ व्या वित्तआयोगाचे व्याज,१५ व्या वित्तआयोगाचा निधी,शासनाचा आपत्कालीन निधी,जिल्हा नियोजनामार्फत मिळणारा निधी या सा-याचा वापर करुन ही पुर्वतयारी करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदांची आरोग्य यंत्रणा आहोरात्र झटून करोनावर नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहेच.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी शासकीय मालकीच्या निवारा ठिकाणी ऑक्सिजनयुक्त कोव्हिड सेंटर उभारण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाल्यास दुस-या लाटेचे नियंत्रण आणि तिस-या लाटेशी लढण्याची सज्जता निर्माण होण्यास मदत होईल.त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शक्य होईल अशा सर्व ठिकाणी किमान दोन व्हेंटीलेटरची व्यवस्था झाल्यास अधिक उपयुक्त ठरेल. तरी आपण ही बाब गांभीर्याने विचारात घेऊन उपाययोजना करावी अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.पत्राच्या प्रती नाशिक विभागीय आयुक्त आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठविल्या आहेत.
समुपदेशनाची गरज
ग्रामीण भागात किरकोळ शारीरिक दुखणेही अंगावर काढण्याची सवय असते.करोना कहरात नेमकी हीच बाब घातक ठरत आहे.साधा आजार आला तरी तातडीने करोना चाचणी करुन घ्यावी जेणेकरुन प्राथमिक स्तरावरच त्यातून बाहेर पडण्यास मदत होते.शिवाय काळजी घेतली तर करोना आजारातून लवकर बरेही होता येते हा आशावाद जागविण्यासाठी ग्रामीण भागाचे समुपदेशनाची गरज आहे.शासन प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था,आरोग्य खाते,गावोगावचे लोकप्रतिनिधी या सर्वांनी आता लोकांना मानसिक आधार देण्याची गरज आहे.तसेच आर टी सी पी आर चाचण्या देखील जि प च्या मार्फतच करण्यात याव्यात .
...जालिंदर वाकचौरे
जि.प.सदस्य,भाजप गटनेता अहमदनगर
0 Comments