पतीसाठी अनवाणी धावून जिंकणारी ‘ती’ करोनात हरली!

पतीसाठी अनवाणी धावून जिंकणारी ‘ती’ करोनात हरली!

बारामती मॅरेथॉन विजेत्या लता करे यांच्या पतीचे निधन

वेब टीम बारामती : काही वर्षांपूर्वी पतीच्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी वयाची तमा न बाळगता नऊवारी साडीवर अनवाणीच धावून मोठय़ा जिद्दीने कोणत्याही तयारीविना बारामती मॅरेथॉन जिंकणारी ‘ती’ करोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र हरली.. करोनाच्या विळख्यातून या वेळी ती पतीचे प्राण वाचवू शकली नाही.. लता करे या ६४ वर्षे वयाच्या धाडसी महिलेची ही करुण कहाणी. त्यांचे पती भगवान करे (वय ७२) यांचे करोनामुळे नुकतेच निधन झाले.

काही वर्षांपूर्वी भगवान करे यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. उपचारासाठी मोठी रक्कम लागणार होती. ती कशी उभी करायची, असा प्रश्न लता करे यांच्या समोर होता. नेमके याच काळात बारामती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार होती. ही स्पर्धा जिंकली, तर मिळणऱ्या रकमेतून पतीवर उपचार केले जाऊ शकतात, असा विचार लता करे यांच्या मनात आला. मॅरेथॉन आणि स्पर्धा आदी कशाचाही गंध नसलेल्या कोणाच्याही मनात हा विचार येणार नाही. पण, करे या त्याला अपवाद ठरल्या. स्पर्धेत भाग घ्यायचा आणि जिंकायचेच असा चंग त्यांनी बांधला.

बारामती मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठांच्या गटात त्यांनी सहभाग घेतला. कसून सराव केलेले आणि सातत्याने स्पर्धेत भाग घेणारे अनेक स्पर्धक त्यांच्यासमोर होते. पायात बूट नव्हते आणि पोशाखही नव्हता, होती केवळ जिद्द. त्याच जोरावर आणि पतीवरील उपचाराच्या ध्येयाने नऊवारी साडीतच त्या अक्षरश: अनवाणी धावल्या आणि जिंकल्याही. मिळालेल्या बक्षिसातून त्यांनी पतीवर यशस्वी उपचार केले. त्यानंतर त्या पुढील काही स्पर्धेतही सहभागी झाल्या. या जिद्दीची दखल घेत त्यांच्यावर चित्रपटही काढण्यात आला होता. त्यातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीला करोनाचा संसर्ग झाला. महागडी औषधे आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. घाबरलेल्या अवस्थेत फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांना त्या दिसल्या. परिस्थिती समजल्यानंतर करे यांना आवश्यक ती मदत करण्यात आली. मात्र, तोवर करोनाचा विळखा अधिक घट्ट झाला होता. त्यातून भगवान करे यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

Post a Comment

0 Comments