'महापौर' पदावर आता काँग्रेसचा दावा
वेब टीम नगर : मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. जातीयवादी पक्षाला बाजुला करत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याची सांगत आता काँग्रेसने महापौर पदावर आमचा दावा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यातच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अनुसूचित जाती विभागातून पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या शीला दीप चव्हाण यांना महापौर करण्याबाबतचा ठराव पक्षीय व्यासपीठावर संमत केला असल्याची माहिती काळे दिली आहे.
महापौरपदासाठी आता काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर कंबर कसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सोडचिठ्ठी घेत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर मनपामध्ये एकत्र येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे मनपात पाच नगरसेवक आहेत. संख्यात्मक दृष्ट्या जरी काँग्रेसची ताकद कमी असली तरी देखील मनपा स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला तसेच शिवसेनेला प्रत्येकी तीन वेळा महापौर पद मिळाले आहे. एक अपवाद वगळता काँग्रेसला मागील अनेक वर्षांपासून शहरात संधी मिळाली नाही. सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाकडे महापौरपदाच्या आरक्षणासाठी असणारा सक्षम उमेदवार आहे.
विधानसभा निवडणुकी वेळी राज्यात असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीमुळेच नगर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आमदारकीचे यश आले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विजयामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. ही बाब विसरून चालणार नाही. मनपा निवडणुकी वेळी देखील आघाडीच होती. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला या वेळी साथ देत त्याची परतफेड करावी, असे आवाहन किरण काळे यांनी राष्ट्रवादीला केले आहे.
काळे पुढे म्हणाले की, सर्वात जास्त नगरसेवकांची संख्या ही खरेतर शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना महापौर पदाचे प्रबळ दावेदार असणे आम्ही समजू शकतो. पक्ष म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. पण काँग्रेसला देखील संधी मिळाली पाहिजे. जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवत राज्या प्रमाणे शहरात देखील महाविकास आघाडी एकत्र आल्यास मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments