“लॉकडाउन कधीही उठू शकतो, पण…,”

“लॉकडाउन कधीही उठू शकतो, पण…,”

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले 

वेब टीम रत्नागिरी :  करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले असून सध्या काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आहे. तसंच तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की वाढणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लॉकडाउनसंबंधी विधान  केलं आहे. 

रत्नागिरीत महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला.

“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे," असंही त्यांनी सांगितलं.

सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, यावर त्यांनी जोर दिला.

दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये”.सिंधुदूर्गमध्येही उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य करताना, "लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे," असं सांगितलं.जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे त्यातील ७० टक्के लोकांना लक्षणं नाहीत. तरीदेखील बेड कमी पडत आहेत. ती टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा,असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

"लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनेही लस मिळाल्यानंतरही मास्क घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. ही बंधनं पाळणं अत्यावश्याक आहे," असंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments