साडेचार लाख रुपयांचा ४६ किलो गांजा जप्त

 साडेचार लाख रुपयांचा ४६ किलो गांजा जप्त 

वेब टीम नगर : श्रीरामपूरातील देवकर वस्ती परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक संदीप मिटके आणि श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने कारवाई करून गांजाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्याला बुधवारी पहाटे अटक केली आहे . त्याच्याकडून साडेचार लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

या घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी कि बुधवारी पहाटे श्रीरामपूरातील देवकर वस्ती परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप व पोलीस पथकासह तेथे छापा घातला. तेथे एक चारचाकी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वाहनचालकाकडे चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली. वाहनात खोक्यांमध्ये निळ्या पिशव्यांमध्ये गांजा भरून ठेवल्याचे आढळून आले.

वाहनाचा चालक गणेश भास्कर सरोदे (वय ३८, रा. देवकर वस्ती, श्रीरामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ४ लाख ६० रुपये किंमतीचा ४६ किलो गांजा, चार लाख रुपये किंमतीची चारचाकी असा एकूण ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, जोसेफ साळवी, पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव, सुनील दिघे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments