तीस एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा नगरच्या पुरोहित संघाचा निर्णय

तीस एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा नगरच्या पुरोहित संघाचा निर्णय 

वेब टीम नगर : शहरात  वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे नगरमध्ये होणारे  सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली.

अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित करोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती करोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, करोना बाधित असल्याची माहिती  लपवत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे किशोर जोशी यांनी सांगितले.  

काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहेत  असे सांगतात. प्रत्यक्षात लोक गर्दी करतात. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या दररोज करोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, होणारे मृत्यू व पुरोहितांची सुरक्षितता या बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने ३० एप्रिलपर्यंत अमरधाममध्ये कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाहीत, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments