रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा : नागरिकांचे ठिय्या आंदोलन

रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा : नागरिकांचे  ठिय्या आंदोलन 

वेब टीम नगरः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. त्यामुळे हे औषध मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईंकांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अनेक ठिकाणी फिरूनही औषध न मिळाल्याने केडगाव येथे नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावरच ठिय्या दिला.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात डॉक्टर मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर औषधाची शिफारस करीत आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात नातवाईकांची धावपळ सुरूच आहे. रविवारी शहरात अनेक ठिकाणी फिरून औषध मिळाले नाही. केडगावमधील एका औषध दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यामुळे अनेकांनी तेथे घाव घेतली. मात्र, तेथे अपुरा साठा होता. अनेकांना औषध मिळाले नाही. नवीन साठा येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कालपासून वाट पाहून थकलेल्या नातेवाईंकानी अखेर रस्त्यावर धाव घेऊन तेथेच ठिय्या दिला. या ठिकाणी काही नागरिकांकडून या दुकानातून चढ्या भावाने विक्री करत असल्याचा असेच ठराविक लोकांनाच इंजेक्‍शन दिले जात असल्याचाही आरोप केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार यासाठी नगर जिल्ह्यातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यांना कार्यपद्धतीही ठरवून दिली आहे. तरीही यासंबंधी अद्याप नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निमार्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे कडक लॉकडाउनच्या काळातही रुग्णांच्या नातेवाईकांची औषधासाठीची वणवण सुरूच आहे. त्यातही अपयश येत असल्याने संयम संपल्याने नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.


Post a Comment

0 Comments