मिनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनता व व्यावसायिकांना दिलासा द्यावा

मिनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनता व व्यावसायिकांना दिलासा द्यावा

भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

सोमवार ते शुक्रवार दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी

वेब टीम नगर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असल्याने राज्यसरकारने कठोर निर्बंध लादले आहे. शनिवार व रविवारी दोन दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला. परंतु प्रत्यक्षात पाच दिवसात कठोर निर्बंध लाऊन जनमानसात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्राचा म्हणजेच रिटेलर्स छोटे दुकानदार, होलसेलर, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक होते. कारखाने चालू पण दुकाने बंद, ट्रांन्सपोर्ट सुरु तर गॅरेज व स्पेअर पार्टची दुकाने बंद, कोर्ट व वकिलांचे ऑफिस सुरु परंतु टायपिंगची दुकाने बंद, कापड मिल चालू पण कापड दुकाने बंद असे अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय एकमेकांना निगडित आहेत. मिनी लॉकडाऊन करताना अशा लहान-मोठ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. सर्व छोट्या-मोठ्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा, गरिबांची जीवन आणि अर्थकारण दोन्ही प्रभावित होणार नाही अशा पद्धतीने नव्याने निर्बंध घालण्याबाबत अधिसूचना जारी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जगण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल अशी कृती होता कामा नये. मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सरकारचेही मोठ्या प्रमाणावर कराच्या स्वरूपात नुकसान झाले होते. हळूहळू अर्थचक्र रुळावर येत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली पूर्णच लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इतर दुकानाचे दिवाळे निघणार आहे. कामगारांचा रोजगार, कर्जावरील व्याज, लाईट बिल, दुकान भाडे, कर्ज हप्ते, सर्व प्रकारचे कर इत्यादी अनेक प्रकारच्या संकटाला व्यापारी वर्गास व गोरगरीबांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडणार होते. शनिवार व रविवारी पुकारण्यात आलेल्या पुर्ण लॉकडाऊनला सर्वांची तयारी व सहमती होती. मात्र हे कठोर निर्बंध लाऊन छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांची फसवणूक करण्यात आली आहे. सर्व दुकानदारांना सोमवार ते शुक्रवार पर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकान उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments