नगरटुडे बुलेटीन 08-04-2021

 नगरटुडे बुलेटीन 08-04-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खाजगी रुग्णालयमध्ये तात्काळ कॅशलेस सुविधा सुरु करण्यात यावी

माजी शहरप्रमुख   संभाजी कदम यांची जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत मात्र खासगी रुग्णालयात कॅशलेस सुविधा देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे .तरी यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे 

पुढे बोलताना संभाजी कदम म्हणाले कॅशलेस सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक बोजाचा ताण पडत आहे .त्यात मेडिक्लेम  इन्शुरन्स कंपन्या जो पर्यंत रुग्णालयाचे बील मंजूर करत नाही तो पर्यंत संबंधित रुग्णाला डिस्चार्ज दिला जात नाही .परिणामी रुग्णालयात बेड शिल्लक राहत नाही व वेळ हि वाया जात आहे ,इतर शहरप्रमाणे अहमदनगर मध्येही कॅशलेस सुविधा मिळून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करावेत त्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळेल आणि नागरिकांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे 

वरील निवेदन चे प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे ,मनपा आयुक्त  ,जिल्हा पोलिस अधीक्षक ,जिल्हा शल्य चिकित्सक आदी देण्यात आले आहे . 



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे

वेब टीम नगर : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने दुकानदार, कारागिरांच्या रोजगारावर गदा आल्याने करोनाशी लढतांना प्रपंच कसा चालवायचा याची चिंता या सर्वसामान्यांना भेडसावत असुन, यातील अनेक जण रस्त्यावर येऊन चिंतन करीत, चर्चेत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे मिनि लॉकडाऊन मधुन दुकानदारांना दुकानं उघडण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक श्री. बाळासाहेब बोराटे यांनी केले आहे.

ओबीसी,व्ही.जे,एन.टी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. श्रीकांत चेमटे, सौ. अनुरिता झगडे, सौ. वनिता बिडवे अदिंच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री बोराटे बोलत होते.

तांगेगल्ली येथील संपर्क कार्यालयात सुरक्षित अंतर राखुन मोजक्या पदाधिका­यांमध्ये ही बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत सद्याच्या परिस्थितीत उपेक्षितांनी घरगुती छोटे छोटे व्यवसाय सुरु करून देता येईल का ? अपेक्षितांना मदत देता येईल, सरकारने पुन्हा एकदा रेशनवर ८ रू, १० रू. किलो धान्य उपलब्ध करून द्यावे, गरजवंत रूग्णांना कमी खर्चात उपचार, औषधे मिळवून देणे, लोकांना प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठीच्या घरगुती उपय योजनांचा प्रचार करणे, अदि सुचना यावेळी सदस्यांनी केल्या, या सुचनाचा आढावा घेतांना श्री. फुलसौंदर व श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ओबीसीचे नेते ना. विजय वड्डेटीवार तसेच ओबीसी,व्हीजे,एनटी जन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब सानप यांना निवेदन पाठवुन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सर्व प्रश्न मांडून परिस्थिची कल्पना देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

आपण सर्व समन्वय व सुरक्षित अंतर राखून या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या बैठकीचा अहवाल ना. विजय वड्डेटीवार आणि जनमोर्चाचे संस्थापक श्री. बाळासाहेब सानप यांना त्वरीत पाठविण्यात येणार असुन, त्यांच्या सुचना मार्गदर्शन मागविण्यात येईल. या वरिष्ठांच्या सुचनांनुसार महिलाध्यक्ष, युवाध्यक्ष आणि नगर शहर ग्रामीण परिसरातील सदस्यांच्या नियुक्त्या या दोन- चार दिवसात कण्यात येणार असुन, त्याबाबत ही प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.

संघटनेचे शहरजिल्हा उपाध्यक्ष तथा बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. माऊली गायकवाड, जनमोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सानप, जनमोर्चाचे सरचिटणीस सर्व श्री.रमेश बिडवे, प्रकाश सैंदर, अनिल इवळे, शामराव औटी, शशिकांत पवार, अभिजीत कांबळे, शेख नईम, विनोंद पुंड, फिरोज खान, सदस्य अशोक तुपे व माध्यम प्रमुख पत्रकार राजेश सटाणकर अदिंनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मिनी लॉकडाऊनचा तुघलकी निर्णय मागे घ्यावा

 विश्‍व मानव अधिकार परिषदेची मागणी : छोटे-मोठ्या व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी

वेब टीम नगर : मिनी लॉकडाऊनचा निर्णय मागे घेऊन लादण्यात आलेल्या कठोर नियमामध्ये शिथीलता करण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार परिषदेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजीम शेख, प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, प्रदेश सचिव सय्यदशफी बाबा, अल्ताफ शेख, अ‍ॅड.निलेश कांबळे, शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे, शादाब कुरेशी, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, रफिक सय्यद, शाहबाज खान, ललित कांबळे, वाहिद शेख, अरुण कोंडके आदी उपस्थित होते.            

राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन पुकारुन पुर्णत: लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे होणारे नुकसान भरुन निघणार नाही. हातावर पोट भरणारे हॉकर्स, छोटे-मोठे व्यापारी, गॅरेज, टेलर, जीम चालक, इलेक्ट्रेशियन, पान टपरीधारक यांचा कोणत्याही प्रकारे विचार न करता त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहे. अशा हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाचा प्रश्‍न ऐरणीवर येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्वसामान्यांचा विचार करुन मिनी लॉकडाऊनचा तुघलकी निर्णय  मागे घेण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अरणगाव रस्त्याचे अर्धवट सोडलेले काम सुरु

मनसेच्या पाठपुराव्याला यश

रेल्वे ब्रिज व सर्व्हिस रोड डांबरीकरणास सुरुवात

वेब टीम नगर :  नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव रोडचे अर्धवट राहिलेले काम अनेक दिवसापासून रखडले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेल्वे ब्रिज आणि सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीसंदर्भात अनेकवेळा आंदोलने, निवेदन आणि पाठपुरावा करण्यात आला होता. मनसेच्या पाठिंब्याला अखेर यश आले असून, या रोडचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या कामाची पहाणी केली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अरणगाव शाखा अध्यक्ष राहुल फुलारे, उपाध्यक्ष सागर उदमले, अनिकेत जाधव, शुभम साबळे, मोहन जाधव, प्रकाश जाधव, श्रीकांत फुलारे परशुराम फुलारे, मंगेश जाधव, वैभव पवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव रोडचे अर्धवट राहिल्याने सदर रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत होते. तर काही अपघातामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. स्थानिक नागरिकांना देखील या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम होण्यासाठी मनसेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन वेळप्रसंगी खड्डयात रोपे लावून, तर ठिय्या मांडून आंदोलने करण्यात आली. या पाठपुराव्याला आखेर यश आले असून, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.  मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या पुलाच्या आणि पुलाशेजारील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. ज्या कंपनीने हे काम सुरु केले, त्यांचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आभार मानले. सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात, मनसेने रास्ता-रोको करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे अनिकेत जाधव यांनी स्पष्ट केले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लालटाकी येथील जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचीच

विश्‍वस्तांचा खुलासा : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वेब टीम नगर : सावेडी येथील लालटाकी भागातील सर्व्हे नं.११९ सि.स.नं.६९९८ सदर जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट रजिस्टर नं.एफ-१७ यांच्या मालकी, वहिवाटीची होती व आहे, असे निवेदन ट्रस्टच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष युनूस सुलतान तांबटकर, सचिव इम्रान शफी अहेमद शेख, खजिनदार इम्रान जमीर खान, विश्‍वस्त फरहान खालीद खान, नवीद आरिफ तांबटकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर जागेत पूर्वीपासून बालवाडी अस्तित्वात होती व आहे. काही दिवसांपूर्वी किरण काळे यांनी वर्तमान पत्रात बातमी दिली. सदर जागा ही महापालिकेने रोझ गार्डन, सुशोभिकरण करावी, वास्तविक सन २००३ साली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट यांच्या जागेवरील संपूर्ण अतिक्रमण काढून ताब्यात द्यावी, त्यानुसार सदर जागा ही नागोरी मुस्लीम मिसगर जमात ट्रस्टएफ -१७ तत्कालीन जिल्हा अधिकारी साहेबानी ताब्यात देऊन भुमापन अधिकारी यांनी ७/१२ उतार्‍यावर ट्रस्टची नोंद लावलेली आहे. किरण काळे हे प्रशासनाची व समाजाची दिशाभुल करत आहेत.

सदर संस्था ही अल्पसंख्याक असून, १९१३ पासून अस्तित्वात आहे. सदर संस्थेचे तेथे शाळा व वैद्यकीय सेवा या करीता उपयोगात आणून मिसगर समाजातील गरजू लोकांना रोजगाराकरीता नियोजन, तसेच संस्थेतर्फे मिसगर समाजातील गरजू व विधवा महिलांना मदत दिली जाते. या सर्व गोष्टींचा विचार करण्यात यावा. तरीही कोणत्याही प्रकारचे निर्णय किंवा कुठलाही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट यांच्या विश्‍वस्त मंडळाशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नये, अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वाभिमानी मराठा महिला प्रदेशाध्यक्षपदी अर्चना धुळे-रोहोकले

   वेब टीम नगर : स्वाभिमानी मराठा महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली.  याप्रसंगी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील कावरे, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, नाशिक विभाग अध्यक्ष दिपक शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रिधें, जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे आदि उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे कामकाज आणखी वाढविण्यासाठी राज्यात विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्चनाताई विनोद धुळे-रोहोकले यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.

     यावेळी संस्थापक अध्यक्ष म्हणाले, स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने राज्यभर विविध आघाड्यांवर काम सुरु असून, युवक, महिला, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून संघटना विविध प्रश्‍नांसाठी लढा देत आहे. यामध्ये अनेकजण उत्फुर्तपणे सहभागी होत असून, चांगल्या कार्यामुळे संघटनेच्या माध्यमातून प्रश्‍नही सुटत आहेत. संघटनेचे काम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती करुन संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यादृष्टीने महिला प्रदेशाध्यक्षपदी  अर्चनाताई धुळे-रोहोकले यांचे संघटनेतील कामकाज पाहता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली, असल्याचे सांगितले.

     नियुक्तीनंतर अर्चनाताई धुळे-रोहोकले म्हणाले, संघटनेच्या कार्यात आपण योगदान देत आहोत. संघटनेच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण सहभागी होत आहेत. आता संघटनेने आपल्यावर दिलेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांबरोबर घेऊन पार पाडू. महिलांसाठी लघु उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे सांगितले.

    अर्चनाताई धुळे-रोहोकले यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी

वेब टीम नगर : करोनाच्या संकटात गेल्या वर्षापासून नगरच्या बूथ हॉस्पिटलने सामाजिक जाणीवेतून रुग्ण सेवा केली आहे. आताही आलेल्या दुसऱ्या लाटेत त्यांचे हे कार्य अविरतपाने चालू आहे. या कार्यात खारीचा वाटा उचालाच्या दृष्टीने पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भरीव मदत केली आहे. आपण सर्व एकत्र येत नियमांचे पालन करून या करोना विरोधात लढा देवू, असे प्रतिपादन पंजाबी समाजाचे नूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी यांनी केले.

पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने बूथ हॉस्पिटलला करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रोख आर्थिक मदत, पौष्टिक खाद्यपदार्थ व शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देण्यात आले. पंजाबी समाजाचे नूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी व सिंधी समाजाचे नूतन अध्यक्ष महेश मद्यान यांच्या हस्ते बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक मेजर देवदान कळकुंबे यांच्या कडे सर्व मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राकेश गुप्ता, जयकुमार रंगलाणी, मानक भटलाई, सुनील बजाज, मन्नु कुकरेजा, कुमार ग्राबा, मनोज खूबचंदाणी, कानू गोपलाणी, अनिल सबलोक, पंजाबी सेवा समितीचे उपाध्यक्ष हितेश ओबेरॉय, संजय धुप्पड, पियुष जग़्गी, मोहित पंजाबी, डॉ.महेश तिवारी, डॉ. अभिजीत केकान आदी उपस्थित होते.

यावेळी महेश मद्यान म्हणाले, करोनाच्या पर्दुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण झाले असताना सर्वसामान्य करोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करून बूथ हॉस्पिटलने मोठे सामाजिक दावित्व निभावले आहे. त्यांच्या या सेवा कार्याला पंजाबी व सिंधी समाजाचे कायम पाठबळ राहील.

मेजर देवदान कळकुंबे यांनी पंजाबी व सिंधी समाजाने दिलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानून सर्व दानशूरांनी  बूथ हॉस्पिटलला मदत करावी असे आवाहन केले.



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून दुकाने उघडण्याची परवानगीची मागणी

संतोष वर्मा : शासनाचा निर्णय व्यापारी वर्गावर अन्यायकारक व बाजारपेठेचे कंबरडे मोडणारा  

वेब टीम नगर : शासनाने सोमवार दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक घोषित केलेल्या लॉकडाऊन मध्ये संपर्ण बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याच्या दिलेला आदेश हा व्यापारी वर्गावर अन्यायकारक असून बाजारपेठेचे कंबरडे मोडणारा आहे. दिवसभर दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा व दिवसातील काही तास बाज्र्पेठेतील दुकाने उघडी ठेवण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

            सराफ सुवर्णकार व्यापारी संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दिनांक ५/४/२०२१ रोजी सायंकाळी संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन संदर्भात एक आदेश शासनाने दिला आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा, दुकाने, दिनांक३० एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद राहतील असा आदेश आपण दिला आहे. अचानक पणे असा आदेश देताना आपण महाराष्ट्रातील कुठल्याही व्यापारी प्रतिनिधीशी किंवा व्यापारी संघटनेशी चर्चा न करता अचानक आदेश दिला आहे. अचानकपणे लादलेला हा निर्णय अन्यायकारक असून  या प्रकारामुळे राज्यातील सर्व व्यापारी बांधव अडचणीत सापडले आहेत. आधीच करोनामुळे बाजारपेठेचे कंबरडे मोडले आहे. त्यात अचानकपणे उद्भवलेल्या या गोष्टीमुळे संपूर्ण व्यापार व पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येणार आहे.

ग्राहकांच्या ऑर्डरची डिलिव्हरी करणे, दुकानातील कामगार व कारागीर यांचे पगार देणे, तसेच बँकांचा कर्ज हप्ता भरणा यासाठी कुठलाही वेळ आपण व्यापारी वर्गाला दिलेला नाही. दुकाने बंद राहिली तर हे कामे करणे शक्य नाही. कामगारांना वेळेत पगार झाला नाहीतर या सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. तरी वरील सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व्यापारी बांधवास दिवसातील काही तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. आम्ही व्यापारी राज्य शासनाचे करोना संदर्भात असलेले सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याने दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी देण्यात यावी ही नम्र विनंती आपणास करत आहोत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------





Post a Comment

0 Comments