नगरटुडे बुलेटिन 04-04-2021

नगरटुडे बुलेटिन 04-04-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षकांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान

बाबासाहेब बोडखे :  शिक्षक, शिक्षकेतरांच्या पाल्यांना सर्व स्तरावर निशुल्क शिक्षणाचा लाभ पूर्ववत कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला स्मरणपत्र

१६ मार्चचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

 वेब टीम नगर : राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना सर्व स्तरावर निशुल्क शिक्षणाचा लाभ पूर्ववत कायम ठेवण्यासाठी विहित दराने अर्थसाह्य या विषयाबाबत निर्गमित करण्यात आलेला दि. १६ मार्चचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करुन देखील त्यावर अद्यापि निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार नागो गाणार, मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे, अध्यक्ष उल्हास वडोदकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना स्मरणपत्र पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राज्यातील अनुदानित, अशासकीय माध्यमिक शाळातील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या फक्त दोन पाल्यांना प्राथमिक शिक्षकांच्या पाल्याप्रमाणे शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इयत्ता पहिली ते पदव्युत्तर स्तर) १९९५-९६ या शैक्षणिक वर्षापासून निशुल्क शिक्षण देण्याबाबत शासन निर्णय दि.१९ ऑगस्ट १९९५ रोजी निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयाचा प्रशासनाने जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून, शिक्षकांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी निशुल्क शिक्षणाचा अर्थ ठराविक शासकीय दराप्रमाणे शुल्कात सवलत देणे असा घेऊन शिक्षकांच्या पाल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला. यामुळे शिक्षकांना न्यायालयात जावे लागले. न्यायालयाने शिक्षकांच्या पाल्यांची बाजू उचलून धरली व निशुल्क शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या रकमेची प्रतिपूर्ती याचा अर्थ घोषित केला. न्यायालयाने दि.११ एप्रिल २०१८ रोजी दिलेल्या निर्णयातील अर्थ बदलण्यासाठी शासनाने दि.१६ मार्च २०२१ चा शासन निर्णय निर्गमित करुन शिक्षकांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले गेले. तर सदर प्रश्‍नी निवेदन देऊन दखल घेतली गेली नसल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे.

दि.१६ मार्च २०१९ शासन निर्णय अन्वये दि.१९ ऑगस्ट १९९५  मध्ये केलेली दुरुस्ती व सुधारणा शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणारी असून, शिक्षकांच्या सन्मानाला संपुष्टात आणणारी असल्याचा आरोप करुन या धोरणाचा शिक्षक परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दि.११ एप्रिल २०१८ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना सर्व स्तरावर निशुल्क शिक्षणाचा लाभ पूर्ववत कायम ठेवण्यासाठी दि.१६ मार्च २०२१ चा शासन निर्णय तात्काळ रद्द घोषीत करावा, निशुल्क शिक्षणाचा दि.१९ ऑगस्ट १९९५ चा शासन निर्णय न्यायालयाच्या निर्णयानुसार सुधारित करून कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगार अर्बन बँकेला ६ कोटीचा नफा

चेअरमन अनिलराव झोडगे : लवकरच ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार करणार

    वेब टीम  भिंगार : मागील शतकाहून अधिक काळापासून समाजिभिमुख कामकाज करुन शहर वासियांची बँकिंग सेवा करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला सरत्या वर्षाअखेर ६ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे बँकेला सतत ‘अ’वर्ग मिळत असून, रिझर्व्ह बँकेने ‘ए’ग्रेड दिलेली आहे. आधुनिक बॅकिंग सेवेबरोबरच सर्व खातेदार, कर्जदारांशी असलेल्या सौहार्दपूर्ण कामकाजामुळे बँक सातत्याने प्रगती करत आहे. लवकरच ठेवींचा ३०० कोटींचा टप्पा बँक पार करणार आहे. सध्या 150 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. खातेदारांचा बँकेवरील विश्‍वास संचालक मंडळाचे विश्‍वासपूर्ण काम व कर्मचार्‍यांचे असलेले सहकार्य यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असल्याचे अध्यक्ष  अनिल झोडगे यांनी सांगितले.

     याप्रसंगी उपाध्यक्ष  किसनराव चौधरी म्हणाले, बँकेचे अध्यक्ष  स्व.गोपाळराव झोडगे यांच्या निधनानंतर सप्टेंबर २०२० पासून बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा अनिल झोडगे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी सर्वांशी मिळून मिसळून बँक प्रगतीपथावर कशी राहिल, यासाठी सर्व संचालकांच्या मदतीने प्रयत्न केले आहेत.

     बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जानविणीवेतून, सभासदांचे हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, खेळास प्रोत्साहन देणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, वृक्षारोपन करणे इत्यादी सामाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगिण प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळ सर्वश्री रमेशराव परभणे, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे, संदेशराव झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथराव जाधव, श्रीमती तिलोतमाबाई करांडे, श्रीमती कांताबाई फुलसौंदर, नामदेवराव लंगोटे, रामसुख मंत्री, राजेंद्र बोरा आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अवयव दानातून इतरांचे जीवन समृद्ध व्हावे

 जालिंदर बोरुडे : प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनचा उपक्रम

   वेब टीम  नगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी अर्पण केले. रयतेला जुलमी राजवाटीपासून सुटका करुन स्वराज्याची निर्मिती केली. अशा थोर राजांचा इतिहास आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याच प्रेरणेने फिनिक्स सोशल फौंडेशन कार्य करत आहे. मोफत नेत्र शिबीराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेऊन या चळवळीत अनेकांना सहभागी करुन घेत आहोत. आपल्यानंतर आपल्या अवयवांचा इतरांना उपयोग होऊन त्याचे जीवन समृद्ध होऊन कायम स्मरणात राहावे, असे हे कार्य आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीदिनी सत्कार्य घडावे या हेतूने रिक्षा संघटनेने सामाजिक दायित्व जपून राबविलेला उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असाच आहे, असे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.

     प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण, फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अमोल पतंगे, लक्ष्मण बोरकर, अतुल वाघ, कैलास ढवळे, सचिन कोतकर, बब्बू सय्यद, दादा येणारे, बाबासाहेब चन्ने, बबलू शेख, नागेश बागल आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण म्हणाले, फिनिक्स फौंडेशनचे सामाजिक कार्यातून समाजातील वंचित घटकांसाठी काम होत आहे. या कार्यात आपलाही छोटासा हातभार लागवावा, या हेतूने आज अवयव दानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिलेले आहे. संघटनेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम सहभागी होऊन अशा उपक्रमात सहभागी झालो आहोत, असे सांगितले.

     याप्रसंगी संतोष बिचकुल, प्रशांत शिंदे, शेख सुलतान, शेख कलिम, शहारुख पठाण, जमिर पठाण, बाबासाहेब धिवर, राजेंद्र बोरुडे,  आदि उपस्थित होते. याप्रसंगी अमोल पतंगे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. शेवटी बाबासाहेब धिवर यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली आहे 

 सुरेश वाबळे : स्थैर्यनिधी संघ ‘सहकार मित्र’ पुरस्काराने सन्मानित

वेब टीम नगर : जिल्ह्यातील पतसंस्थांना पाठबळ देवून संकट मुक्त करणाऱ्या अहमदनगर जिल्हा स्थैरनिधी सहकार संघाच्या कामाची दखल घेवून सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा  पुरस्कार स्थैर्यनिधी संघाला मिळाला. ही मोठी अभिमानास्पद बाब असून या पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली आहे, असे प्रतिपादन स्थैरनिधी सहकार संघाचे अध्यक्ष  सुरेश वाबळे यांनी केले.

स्थैर्यनिधी संघाला नुकताच डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा  पुरस्कार मिळाला आहे. डोंबिवली येथे रा.स्व.संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोट्याखाणी कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष  सुरेश वाबळे व उपाध्यक्ष  वसंत लोढा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधीचे संचालक शिवाजीराव कपाळे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उ.म.कर्वे, उपाध्यक्ष सौ.नं.श.कुलकणी, मुख्यव्याव्साथाप्क गो.गी परांजपे आदी उपस्थित होते. रोख ५१ हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            यावेळी सतीश मराठे यांनी नगर जिल्ह्यात राबलेला स्थैर्यनिधीचा उपक्रम राज्यातील बँकिंग क्षेत्राला मागर्दर्शक आहे, हा उपक्रम पूर्ण राज्यात राबवावा, असे सांगून स्थैर्यनिधीचे कौतुक केले.

सहकारी क्षेत्रातील आर्थिक संस्थांविषयी विश्वास निर्माण करणा-या आणि वृद्धीसाठी आधार ठरू शकेल असे आपल्या संस्थेचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे. म्हणूनच यावर्षीचा "सहकार मित्र पुरस्कार आपल्या संस्थेला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे, असे अध्यक्ष उ.म.कर्वे यांनी सांगितले.काका कोयटे म्हणाले, नगर जिल्ह्यात काही पतसंस्था अडचणीत आल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी व निर्माण झालेले गढूळ वातावरण बदलण्यासाठी या स्थैर्यनिधी संघाची स्थापना केली होती. आता या संस्थेचे मोठे स्वरूप झाले आहे.

            वसंत लोढा म्हणाले, स्थैर्यनिधी संघाला प्रथमच हा एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. सहकार चळवळीला भूषणवाह असा हा पुरस्कार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जनता महाविद्यालयात भित्तिपत्रक स्पर्धा उत्साहात 

 वेब टीम चिचोंडी पाटील: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे च्या रूई छत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे नवनिर्वाचित खजीनदार मुकेश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर हे होते. संस्थेचे खजीनदार मुकेश मुळे, प्राचार्य डॉ सुरेश बाबर, उपप्राचार्य डॉ. डी.एस तळुले , विज्ञान विभागप्रमुख रविराज सुपेकर, प्रा प्रियंका पठारे आदी मंचावर उपस्थित होते. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय रविराज सुपेकर यांनी करून दिला.  संस्थेच्या नवनिर्वाचित खजीनदार पदी निवड झाल्याबद्दल मुकेश मुळे यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. 

     यावेळी स्वर्गीय माधवरावजी मुळे बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विज्ञान शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी देण्यात येणारे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण प्राप्त करून मुलीमध्ये प्रथम आलेल्या कावेरी कोतकर व मुलांत प्रथम आलेल्या योगेश बोरूडे याना देण्यात आला.  कार्यक्रमाचे उदघाटक मुकेश मुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ बाबर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

    यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूगोल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेंद्र गोरे यांनी केले. प्रा  प्रियंका पठारे यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments