बँक अधिकारी कर्मचारी यांची दिल्लीगेट व चितळे रोडवर शांततेत निदर्शने

बँक अधिकारी कर्मचारी यांची दिल्लीगेट व चितळे रोडवर शांततेत निदर्शने

दुसर्या दिवशीही  संपामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत

वेब टीम नगर :  युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्स ने बँकांच्या खाजगीकरण विरोधात दोन दिवसांच्या संपाच्या आवाहनाला अहमदनगर शहरात काल शांततेत निषेध कार्यक्रम यशस्वी पणे पार पडल्यावर आज दि. १६ मार्च २०२१  रोजी सर्व कर्मचारी व अधिकारी तितक्याच जोमाने शांततेत कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 आज दिल्ली गेट व चितळे रास्ता या ठिकाणी सदस्यांनी बिघगून कार्यक्रमात भाग घेतला. सरकार बँकांचे खाजगीकरण करण्यावर ठाम असून सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीयीकरणांच्या उद्दिष्टांची पायमल्ली करीत आहे याचा निषेध या प्रसंगी करण्यात आला.  भारतातील बँकिंगचा इतिहास पाहता दिसून येते कि  बँक राष्ट्रीयीकरणानंतर अनेक खाजगी बँका बुडीत निघाल्या व त्यांचे सार्वजनिक बँकेत विलीनीकरण करण्यात येऊन सामान्य खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यात आल्या.  अद्याप देशात काही बँका डबघाईस आलेल्या असून त्यांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळने दुरापास्त झाले आहे.  हीच परिस्थिती बँकांच्या खाजगीकरणानंतर बँकांचे हस्तांतरण मोठ्या कारखानदार/उद्योगपतींकडे झाल्यावर निर्माण होण्याची भीती असल्याचे सांगण्यात आले. सरकारचा उपक्रम म्हणून सामान्य व्यक्ती सार्वजनिक बँकेत निर्धास्तपणे आपली मेहनतीची बचत ठेवत असतात.  कारण त्यांना त्याच्या सुरक्षिततेची खात्री आहे. त्याच प्रमाणे सार्वजनिक बँकांमार्फत सर्व स्तरातील लोकांची आर्थिक गरज विविध प्रकारच्या कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 

 बँक खाजगीकरण  हे भारतासारख्या देशाला परवडणारे नाही. कारण खाजगी बँकांची कार्यपद्धती पाहता त्या ठिकाणी सर्वसाधारण व्यक्तीला खाते उघडणे अशक्य तर आहेच त्यांचे विविध सेवा प्रभार, छुपे चार्जेस, कर्ज धोरण, खात्यातील किमान शिल्लक, शाखा विस्तार या व इतर अनेक बाबींमुळे सामान्य जनतेला बँकिंगची सेवा परवडणारे नाही.  त्याचप्रमाणे आज स्वयंरोजगार, छोटे धंदेवाले,  क्षैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, यासारखे कर्ज सहज उपलब्ध होणे अशक्य.  खाजगी बँकांचा उद्देश हा नफा कमविणे असल्याने त्यांचा बँकिंग विस्तार हा मुख्यत्वे शहरी भागात राहणार असून ग्रामीण भागातील काही शाखा बंद करण्याची पाऊले उचलली जातील.  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी निदर्शनास आणून दिले कि सार्वजनिक बँकांमध्ये आज बडे धनाढ्य , कारखानदार, मोठे औद्योगिक घराणे यांचेकडे मोठ्या प्रमाणावर थकीत व बुडीत कर्जाची येणी आहे.  हे कर्जदार ती देणी परत करण्यास आज सक्षम नाहीत. परिणामी बँकांच्या नफ्यातील मोठा हिस्सा हा अश्या कर्जदारांची येणी निर्लेखित किंवा त्यासाठी तरतूद करण्यात वापरण्यात येत असल्याने  बँकांचा निव्वळ नफा हा एकतर कमी दिसतो अथवा बँक तोट्यात असल्याचे दिसून येते.  सरकार अश्या कर्जदारांविरोधात कडक नियम अमलात न आणता व त्यासाठी कठोर कायदे न करता त्यांना पळवाटा मोकळ्या करून देण्यात आहे.  असे असून सुद्धा सरकार सार्वजनिक बँकांचे दायित्व अश्या लोकांकडे सोपवण्याचा घाट घालत आहे. 

 देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची परिस्थिती आहे. खाजगीकरणामुळे बँकांचा विस्तार तर होणे नाहीच, बँकांच्या शाखा बंद केल्यास आहे त्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. कर्मचारी व अधिकारी संघटनांनी वेळोवेळी ह्या बाबी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.  परंतु सरकार त्याकडे सोपस्कार रित्या दुर्लक्ष करीत आहे.  बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हा दोन दिवसांचा संप सरकारचे लक्ष वेधून त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा या उद्देशाने केला आहे.  जर सरकार याकडे दुर्लक्ष करीत आपले धोरण राबवण्यासाठी पाऊले उचलणार असेल तर संघटनांना कठोर पाऊले उचलावी लागतील व त्यात बेमुदत संपासारखे पाऊल सुद्धा उचलले जाऊ शकते.  संघटनांच्या नेत्यांनी याप्रसंगी सामान्य जनतेला आवाहन केले आहे कि त्यांनी खाजगीकरण हे समाजाच्या हिताचे नसून ते जनहितविरोधी आहे हे लक्षात घ्यावे व बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटनेला आपला पाठिंबा देऊन या सामाजिक लढ्यात आपले योगदान द्यावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.  हा संघर्ष देशहिताचा असून बँकांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागण्यांचा काहीही संबंध नाही.  बँक कर्मचारी व अधिकारी हे समाज व देशहितासाठी सदैव तत्पर असून देशाची अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल यासाठी प्रत्नशील आहेत.  

सरकारने  खाजगीकरणावर गांभीर्याने विचार करावा व देशातील बँकिंग व्यवस्था सुदृढ होण्यासाठी सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण न करता सर्व खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी दोन दिवस संपत सहभाग नोंदविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. उल्हास देसाई, कॉ. उमाकांत कुलकर्णी, कॉ. माणिक अडाणे, कॉ. सुजय नाले, कॉ. सुजित उदरभारे, कॉ. अमोल बर्वे, कॉ. आशुतोष काळे, कॉ. राघवेंद्र, कॉ.. संदीप फंड, कॉ.. भलगट, कॉ.. शोभा देशपांडे, कॉ.. आशा राशीनकर, कॉ.. सायली शिंदे, कॉ.. सीमा बोकील, कॉ.. सुमित खरबीकर,कॉ.. विशाल खोबने, कॉ.. विजेंद्र सिंग,कॉ. अजित बर्डे, कॉ. सुनील जगदाळे, कॉ. सुनील घोंगडे, कॉ. संतोष चौधरी, कॉ. प्रकाश कोटा, कॉ. गजानन पांडे, कॉ. मोईन शेख, कॉ. शंतनू सोनावणे, कॉ.. सचिन बोठे  यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments