३ महिन्यानंतर बाळ बोठे अखेर जेरबंद

 ३ महिन्यानंतर बाळ बोठे अखेर जेरबंद  

वेब टीम नगर :  यशस्वीनी महिलाब्रिगेडच्या  रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली. हैद्राबाद येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे निघाले आहे. त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देणार असल्याचे सांगण्यात आले.


सुमारे साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देता होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना तो सापडत नव्हता. शेवटी हैद्राबाद भागात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी बोठे याच्यासह तिघांना तेथून ताब्यात घेतले. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे.

बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बोठे याच्यासोबत त्यांनाही अटक होत आहे. आरोपीला घेऊन पोलिस नगरकडे निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या भागात ही कारवाई सुरू होती. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी ही कामगिरी केली. याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती स्वत: पोलिस अधीक्षक पाटील देणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments