"स्वयंसिद्धा"
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणारी -अंजली देवकर-वल्लाकट्टी
अलिकडच्या काळात समाजात महिला मुलींना फसवण्याच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. हे कमी होते की काय म्हणून राजकीय क्षेत्रातील फसवणुकीच्या घटना ही चव्हाट्यावर आल्या हे सर्व पाहता समाजात ,राजकीय क्षेत्रात अथवा अन्य क्षेत्रात महिला - मुली सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंजली देवकर- वल्लाकट्टी या क्रीडाक्षेत्रात आणि त्यातल्या त्यात कुस्ती प्रकारात त्यांनी विशेष नैपुण्य मिळवले आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या सुवर्णकन्या ठरल्या. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर त्यांनी जिल्ह्यातील बहुतेक शाळांमध्ये जाऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले महिला दिनाच्या निमित्ताने या मुद्द्यावर त्यांच्याशी केलेली बातचीत .
आजच्या स्थितीत महिला मुलींना सुरक्षित राहण्यासाठी काय करावे असे विचारता अंजली देवकर- वल्लाकट्टी सांगतात की, मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या खास तासिका ठेवायला पाहिजेत. खेळाच्या तासा व्यतिरिक्त प्रशिक्षित शिक्षकांकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत, एक दिवस खास व स्व संरक्षणासाठी असायला हवा. शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात त्यांच्याकडे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण नसल्यास त्यांचे निकाल रोखून धरण्या सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. तरच स्थितीत फरक पडायला सुरुवात होईल मी ही निर्भया प्रकरणानंतर शाळेत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचा बचाव कसा करावा याची प्रात्यक्षिके दाखवली. तुमच्या धारदार नजरेलाही समोरची व्यक्ती घाबरू शकते, कोपर्डीतील मुली अजूनही माझं नाव घेतात, कारण त्यांनाही कोपर्डी घटनेनंतर शाळेत जायला घाबरणार्या मुलींचे मी समुपदेशन केलं. त्यांना सोप्या पद्धतीने स्वतःच्या रक्षण कसे करायचे याचे धडे दिले . अगदी स्वतःच्या पेन्सिल , सेफ्टी पिनांना हत्यार बनवून स्वतःचे रक्षण करायला शिकवले, तुम्ही निर्भीड बना , समोरच्या व्यक्तीच्या डोळे ,नाक आदी नाजूक अवयवांवर प्रहार करून तुम्ही त्यांना घायाळ करू शकता. काही नाही तर तुम्ही आरडाओरडा करून माणसं गोळा करू शकता असं सांगितल्यावर कोपर्डीतील मुली पुन्हा शाळेत जाऊ लागल्या . संगमनेर मध्ये ही माझी स्वसंरक्षणाचे धडे घेतलेल्या एका मुलीने एका सडकसख्याहरीची भरचौकात धुलाई केली . तुमच्यावर प्रसंग उडवल्यावर तुम्हाला किमान पाहता यायला हवं, त्यासाठी व्यायामाची गरज आहे. लाठ्या काठा फिरवंण ,ज्युडो ,कराटे च्या बेसिक प्रशिक्षणासाठी तरी पालकांनी जागरूकपणे पुढे यायला हवं. जिल्हा परिषदेमार्फत आरक्षणाबाबत अभियान चालवले जाते . त्यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो योग्य पद्धतीने होत नाही, स्वसंरक्षणाचे धडे देताना काही साधनांची ने-आण करण्यासाठी ,प्रशिक्षीत शिक्षकांचे नियोजन करण्यासाठी खर्च येतो निधीचा व्यवस्थित विनियोग झाला तर त्या माध्यमातून या कार्याची व्याप्ती वाढवता येईल.
मुली अनेकदा भितीपोटी काही गोष्टी सांगत नाहीत ,मुलींना पालकांनी विश्वासात घ्यायला हवं . एखादा मुलगा माझ्याकडे सारखा पाहतो असं म्हटल्यावर तू हि त्याच्याकडे बघत असशील म्हणून तुला कळलं असे म्हणून अविश्वास दाखवू नये, त्याऐवजी वेळीच गांभीर्याने चौकशी करून संबंधित मुलाला समज द्यायला हवी . अन्याय अत्याचार काही एकदम घडत नाही. नात्यातल्या गिधाडांना ओळखायला शिका. अनोळखी व्यक्ती एकदम अत्याचार करायला धजावत नाही उलट नात्यातील माणसंच किंवा शेजारी माणसंच असे प्रकार करतात . मुलींना ' गुड टच ''बॅड टच 'याबाबतीत घरातील महिलांनी सर्वप्रथम माहिती द्यायला हवी, जेणेकरून स्पर्शातील संधिसाधूपणा त्या समजू शकतील, त्याला विरोध करू शकतील, त्यातील गांभीर्य मुला-मुलींना कळायला लागेल. बऱ्याचदा मुलींनी सातच्या आत घरात असा दंडक अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुलांवर मात्र तशी बंधनं नसतात, त्या ऐवजी मुलांच्या बाबतीतही असे दंडक ठरवायला हवेत किमान मुलाचे मित्र कोण आहेत याची कल्पना पालकांनी घ्यायला हवी. अनेकदा 'संगती संगती दोष:' या न्यायाने अनेक घटना घडल्याचे आपण पाहतो. वास्तविक पाहता आईनेच मुलांवर स्त्रियांकडे चांगल्या नजरेने पाहण्याचे संस्कार करायला हवेत, समोरच्या स्त्रीचा मान राखण्याची शिकवण द्यायला हवी, तसेच मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला तर ती धीरोदात्तपणे प्रसंगांना तोंड देऊ शकेल असे संस्कार करायला हवेत.
कायद्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कोपर्डी प्रकरणाचा अजूनही निकाल लागलेला नाही त्यामुळे गुन्हेगारांना जरब बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षेची कठोरपणे अंमलबजावणी व्हायची अत्याचार करणाऱ्यांचा 'चौरंग' केला जायचा. त्यामुळे गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नसत, आजही काही देशांमध्ये शिरच्छेद केला जातो . तेथे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी आहे. कायद्याबाबत लोकांच्या मनात भीती असायला हवी आज सोशल मीडिया मुळे अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना वाचा फुटते त्यांना अशा पद्धतीने उत्तर देता येऊ शकेल.
महिला सक्षमीकरणासाठी पक्षाच्या व्यासपीठावरून मोठे अभियान चालवण्याचा आमचा विचार आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला तर या घटनांना त्या धीरोदात्तपणे तोंड देऊ शकतील त्याबरोबरच घरच्यांनीही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे . राजकारणातील अशा प्रवृत्तींबद्दल बोलताना अंजली देवकर -वल्लाकट्टी म्हणाल्या, अशा प्रवृत्तींना राजकीयपक्षाची चाड नसते. सर्वच पक्षात अशा प्रवृत्ती फोफावल्या आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे मतदान करतानाच मतदारांनी अशा प्रवृत्तींना बाजूला काढले तर या प्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्याला राजकारणाची जोड मिळाली तर अधिक जोमाने काम करता येते म्हणूनच राजकारणात आले असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
0 Comments