अर्बन बँक बनावट कर्ज प्रकरणी एका संचालकास अटक

 अर्बन बँक बनावट कर्ज प्रकरणी एका संचालकास अटक 

वेब टीम नगर : बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून ही कारवाई केली. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचे धाबे दणाणले असून अटकेच्या भीतीने अनेकांनी पोबारा केला. बँकेवर सध्या प्रशासक असून त्यापूर्वीच्या विश्वस्त  मंडळाच्या कारकिर्दीतील  यांच्या कार्यकाळातील हा घोटाळा आहे.

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान झालेल्या या प्रकाराबाबत कर्ज उपसमिती सदस्य, बॅंकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.  पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा  या गुन्ह्याचा तपास करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला अटक केली.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने नगर शहरात छापा टाकून संचालक नवनीत सुरापुरिया यांनाही अटक केली आहे. तर काही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले; मात्र तोपर्यंत पोलिस कारवाईची माहिती मिळाल्यामुळे संशयितांनी पोबारा केला.

दरम्यान बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्या त्यांना चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड येथे बोलावले आहे.

Post a Comment

0 Comments