प्रभाग ९ ची पोटनिवडणुक भाजपाने न लढता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा

प्रभाग ९ ची पोटनिवडणुक भाजपाने न लढता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा

: सुवेंद्र गांधी यांची पत्रकाद्वारे मागणी

वेब टीम नगर : महानगरपालिका प्रभाग ९ मध्ये लवकरच पोट निवडणूक होणार आहे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने न लढण्याचा निर्णय घेत उमेदवार न देता शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना या प्रभागातून नगरसेवक होण्यासाठी पाठींबा द्यावा. स्व.अनिल राठोड यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या कडे पत्रकाद्वारे केली आहे.

          सुवेंद्र गांधी यांनी पाठवलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता. सर्वसामन्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रभाग ९ मधील पोट निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नेये अशी माझी वैय्यक्तिक मागणी आहे.

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व स्व.अनिल राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना  स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरु झाला. दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता तरी सुमारे २५ - ३० वर्ष दोघांनी भाजपा सेना युतीत बरोबर काम केले होते. खासदार  म्हणून निवडून येण्यात अनिल राठोड यांनी सहकार्य केले तर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी दिलीप गांधी यांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. पदांच्या माध्यमातून दोघांनी शहराच्या व जिल्ह्याच्या विकासास हातभार लावत सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. हे विसरून चालणार नाही.

          राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व.अनिल राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकी साठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या कडेही करणार आहे.

Post a Comment

0 Comments