मुंबईत ८५ टक्के रुग्णाना कोरोनाची लक्षणे नाहीत
वेब टीम मुंबई : पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. रुग्णांची वाढ अशीच चढती राहिली तर विविध निर्बंधांबरोबर शेवटी शासनाला लॉकडाउनचा विचार करावा लागेलं . दरम्यान मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी लक्षणे न आढळणाऱ्या करोनाबाधितांची माहिती दिली आहे. मुंबईत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी जवळजवळ ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत, बुधवारचा विचार करायचा झाल्यास बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले. मात्र या ११०० पैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे चहल यांनी सांगितले आहे.
राज्यातील एकूण ७८ टक्के रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. तर मुबईत सक्रिय रुग्णांची संख्या ४९ टक्के इतकी आहे. मागील काही आठवड्यांची आकडेवारी तपासली असता त्यांपैकी सुमारे ७८ ते ७२ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, अशांना दाखल करून घेऊ नका असे निर्देश महापालिका आयुक्त चहल यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने कोरोनावर उपाययोजनेचा भाग म्हणून नियम कडक केले आहेत. बाहेर फिरताना मास्क वापरणे अनिवार्य असून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
काल बुधवारी मुंबईत ११६७ इतके करोनाच्या नव्या रुग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे सोमवारी आणि मंगळवारची वाढ पाहता बुधवारी रुग्णवाढ जवळपास दुपटीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
0 Comments