जलजीवन योजनेतून मुदळ वस्तीला जाणीवपूर्वक वगळले?

 जलजीवन योजनेतून मुदळ वस्तीला जाणीवपूर्वक वगळले?


अहिल्यानगर दि. 22 - एकीकडे शासनाच्या जलजीवन मिशनमधून ‘हर घर जल’चा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे नगर तालुक्यातील अरणगाव येथील मुदळ वस्तीला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. संपूर्ण गावात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे करण्यात आली; मात्र सुमारे 300 नागरिकांची मागास वस्ती असलेल्या मुदळ वस्तीला या योजनेतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असताना या वस्तीतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे. 

गावात जलजीवनचे पाणी, मग मुदळ वस्तीवर अन्याय का?

अरणगावमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे झाली; मात्र मुदळ वस्तीपर्यंत पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित वस्तीचा योजनेच्या अंदाजपत्रकात आणि निविदेच्या कामात समावेश नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील इतर भागांना पाण्याची सुविधा मिळत असताना मुदळ वस्तीतील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

सरपंचांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचे गंभीर प्रश्‍न

मुदळ वस्तीला जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवण्यात आल्याप्रकरणी ग्रामस्थांनी सरपंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. वस्तीचा योजनेत समावेश होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का? वस्तीचा समावेश करण्याची मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष का झाले? या प्रश्‍नांची उत्तरे ग्रामस्थांना हवी आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

टँकर मागायचा तरी अडचण; ‘गाव योजनेत आहे’चे कारण!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे सध्या दुष्काळी परिस्थितीत मुदळ वस्तीला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केल्यास, ‘तुमचे गाव जलजीवन मिशनमध्ये आहे,’ असे सांगून टँकर देता येणार नसल्याचे उत्तर मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, योजनेत गावाचा समावेश असणे आणि प्रत्येक वस्तीपर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पाइपलाइनच नसलेल्या वस्तीला केवळ कागदोपत्री योजनेचा आधार देऊन टँकर नाकारणे कितपत योग्य आहे? पाणीपुरवठ्याची सुविधा प्रत्यक्ष उपलब्ध नसताना नागरिकांनी पाणी आणायचे तरी कुठून, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवूनही उपयोग नाही!

मुदळ वस्तीतील नागरिकांनी या समस्येबाबत ग्रामपंचायतीपासून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पाठपुरावा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत अरणगाव येथे यापूर्वी अर्ज करूनही प्रश्‍न सुटलेला नसल्याची त्यांची तक्रार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी उत्तरे मिळत असल्याने नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. नगर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जलजीवन मिशनच्या संबंधित अधिकार्‍यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. मुदळ वस्तीचा योजनेत समावेश का झाला नाही? मंजूर अंदाजपत्रकात आणि निविदेत या वस्तीचा समावेश होता की नव्हता? नसेल, तर त्यामागचे कारण काय? या प्रक्रियेत कोणाची भूमिका होती? तसेच वस्तीला पाणी मिळू नये यासाठी कोणाचा दबाव होता का, याचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

दुष्काळात तहानलेल्या नागरिकांना आश्‍वासनांचे नव्हे, पाण्याचे टँकर हवेत!

मुदळ वस्तीतील विहिरींचे पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तांत्रिक कारणे, कागदपत्रे आणि योजनेचा दाखला देत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्रलंबित ठेवणे योग्य ठरणार नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सहा प्रमुख मागण्या केल्या आहेत. मुदळ वस्तीतील पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा, जलजीवन मिशनच्या मंजूर अंदाजपत्रकाची व कामाच्या आराखड्याची तपासणी करावी, सुमारे 300 नागरिकांसाठी आवश्यक पाइपलाइन व नळजोडणीच्या कामाला नियमानुसार मंजुरी द्यावी, संबंधित अधिकार्‍यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, पाइपलाइनचे काम पूर्ण होईपर्यंत पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी आणि केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता प्रशासन उत्तर देणार का?

गावातील एका वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. मुदळ वस्तीला योजनेतून वगळण्यामागचे नेमके कारण काय, याची चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करावी. तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून कायमस्वरूपी पाइपलाइनची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ‘हर घर जल’च्या घोषणांमध्ये मुदळ वस्तीचा घसा कोरडाच राहणार का? आता तरी प्रशासनाने जागे होऊन या प्रश्‍नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments