स्लमडॉग मिलेनियरच्या अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

 स्लमडॉग मिलेनियरच्या अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल   

वेब टीम मुंबई : ऑस्कर विजेता चित्रपट स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेता मधुर मित्तलच्या विरोधात मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याच्यावर मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ही घटना १३ फेब्रुवारीला घडल्याचं बोललं जात आहे. मधुरनं एक्स गर्लफ्रेंडच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणी कोणालाही अद्याप अटक झालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार मधुरच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात मारहाण करून जखमी करणे आणि लैंगिक शोषण करण्याच्या आरोपांवरून एफआरआय दाखल करण्यात आला  आहे. मधुरच्या विरोधात तक्रार करणारी पीडित तरूणी आणि मधुर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भेटले होते. त्यानंतर काही दिवसांतच मधुरनं दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरूणीनं ही घटना घडण्याच्या २ दिवस अगोदरच म्हणजे ११ फेब्रुवारीला मधुरसोबतचा संपर्क संपवला होता.

वकीलानं सांगितलं की, मधुर खूप रागात होता आणि अचानक तो पीडित तरुणीच्या रुममध्ये आला. तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे, मधुरनं पीडित तरुणीचा गळा पकडत तिच्या कानशिलात लगावली. तिचे केस आणि कान खेचत तिच्या डोळ्यांच्या खाली ठोसा लगावला. तक्रारीत या सर्व गोष्टींना लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे. वकिलानं सांगितलं की, या सर्व मारहाणीत पीडितेचा चेहरा, गळा, छाती, पाठ, कान आणि डोळ्यांखाली दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुर मित्तलच्या विरोधात छेडछाड, लैंगिक शोषण, लैंगिक हल्ला यासाठी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून मधुर मित्तलकडून या घटनेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Post a Comment

0 Comments