गरीबी ही शिक्षणाला अडसर ठरत नाही 

फक्त शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे -नितीन उबाळे
                           


    वेब टीम नगर,दि. १३ - शिकायला पैसे लागत नाही, युपीएससी उत्तीर्ण होणे अवघड नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. सरकारने अनेक सोयी-सुविधा विद्यार्थ्यांकरीता निर्माण केल्या आहेत. ‘सारथी’ सारखी संस्था स्थापन केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. गरीबी ही शिक्षणाला अडसर ठरत नाही. फक्त शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. शाळेच्यावतीने तुमच्या जीवनाला दिशा देण्याचे काम केले जाते, त्यामुळे शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. 10वी व 12 वी ही जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असल्याने या वर्षात चांगला अभ्यास करुन यश मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी केले.
     केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी श्री.उबाळे बोलत होते. याप्रसंगी मधुकर वारे विद्यालयाच्या प्राचार्या कांचन गावडे, प्रा.सुभाष कडलग, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका वैशालीताई कोतकर, संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी प्रा.सुभाष कडलग म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वेळेचे महत्व ओळखले पाहिजे कोणी कितीही नावे ठेवली तरी थांबायचे नाही. आपले सामर्थ्य दाखवयाचे असते. कोणतेही कारण असू द्या राग येऊ देऊ नका. जेव्हा विद्यार्थी मोठ्या पदावर जातो, तेव्हा शिक्षकांनाही तेवढाच आनंद होत असतो. शाळेतील संस्कार जीवनात मार्गदर्शक ठरत असतात, असे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी  इ.10 वी व इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांची परिक्षांची तयारीसाठी सराव परिक्षा, जादा तास, आवृत्ती, तज्ञांचे मार्गदर्शन, आरोग्य शिबीर आदि माध्यमातून विद्यार्थ्यांची चांगली तयारी करुन घेतली आहे. हे विद्यार्थी या परिक्षेत चांगले यश संपादन करीत अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

     संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शाळेतील अनुभव सांगितले. आदर्श विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले तर आभार गोरक्ष कांडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोपट येवले, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, बाबासाहेब कोतकर, धनंजय बारगळ, गोविंद कदम, एकनाथ होले, दत्तात्रय पांडूळे, रुपाली शिंदे, अच्युत सुतार, आदिनाथ ठुबे आदिंनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments