नोकरीचे आमीष दाखवून अनेकांना घातला गंडा

नोकरीचे आमीष दाखवून अनेकांना घातला गंडा 

वेब टीम मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वच क्षेत्रांत बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. अशातच नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना सहज फसविले जात असून यासाठी बड्या कंपन्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचे  समोर आले  आहे. शहापुरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरभरती सुरू असल्याचे मेल पाठवून अनेक बेरोजगार तरुणांना फसवण्यात आले आहे. याबाबत कंपनीच्या तक्रारीनंतर कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापुरजी पालनजीच्या कंपनीची देशभरातील मोठ्या शहरांमध्ये कार्यालये आहेत. मुंबईतील कार्यालयातील सहायक उपाध्यक्षांना एका तरुणाने सप्टेंबर २०२०मध्ये ईमेल पाठवला. यामध्ये कंपनीच्या शिक्का असलेला नोकर भरती प्रक्रिया अर्ज, जाँब अँग्रीमेन्ट तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही असलेली इतर कागदपत्रे या मेलमध्ये जोडण्यात आली होती. ही कागदपत्रे पाठवितानाच मुलाखतीसाठी कधी यायचे, अशी विचारणा त्याने मेलमधून केली होती. हा मेल वाचून सहायक उपाध्यक्षांना धक्का बसला. कोणतीही भरती सुरू नसताना सही शिक्क्याची कागदपत्रे कुणी आणि कशी पाठवली हे कळत नव्हते.

कंपनीत सध्या भरती नसल्याचे सहायक उपाध्यक्षांना या तरुणाला कळविले. मात्र तेव्हापासून एका पाठोपाठ एक मेल येणे सुरु झाले. अशाच प्रकारे अर्ज भरून बेरोजगार तरुण आणि तरुणींना ईमेल पाठविण्यात आले होते. अधिक चौकशी केली असता कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट ईमेल आयडी तयार करून हे कृत्य करण्यात आल्याचे लक्षात आले.

कंपनीची बदनामी होत असताना दुसरीकडे बेरोजगारांची फसवणूक होत असल्याने या प्रकारची गंभीर दखल घेतली. अशा प्रकारचे ई-मेल गेलेल्या तरुणतरुणींशी संपर्क केला असता यासाठी अनेक जणांकडून पैसेही घेतले असल्याचे समोर आले. सहायक उपाध्यक्षांनी या सर्व बेरोजगारांना याबाबत पोलिस तक्रार करण्यास सांगताना कंपनीच्या वतीने कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार केली. फसवणूक झालेल्या बेरोजगारांची माहिती, त्यांनी पैसे पाठविल्याच्या खात्याचा बँक तपशील तसेच इतर माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे.Post a Comment

0 Comments