अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग

 अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग 

अहमदनगरचा भुईकोट किल्ला "कोट बाग निजाम"

                      कोट बाग निजाम

अखेर इ. सन.  १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला व अहमदनगरचा भुईकोट किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.  त्यासाठी एक खूप महत्वाची घटना घडली भिंगारचे  रघुराव बाबा देशमुख यांनी किल्ल्याच्या माऱ्याची जागा दाखवली व ब्रिटीशांनी किल्ला  जिंकला.  त्यावेळेला लॉर्ड वेलस्लीने चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहरी केली त्या प्रित्यर्थ ती जागा आजही त्या ठिकाणी तोफा ठेवून जतन केली आहे. 

मुख्य प्रवेश द्वार 

इ. सन १४९१ साली  बेदरचा सेनापती जहांगीर खान अहमदशहा चा नायनाट करण्यासाठी पैठणहून तिसगावच्या  रस्त्याने येऊन त्याने भिंगार जवळ मोठा तळ दिला.  त्यावेळी अहमदशहा  इमामपूर घाटात येऊन राहिला होता.  कारण त्याच्याकडे हल्ला करण्यासाठी पूर्ण सामर्थ्य नव्हते ,तो वेळेची वाट पाहत होता वेळ येताच बादशाही सैन्यावर त्याने हल्ला केला व त्यामध्ये  विजय मिळवला.  ज्या ठिकाणी त्याला बिकट प्रसंगी जय मिळाला त्या  जागेविषयी त्याला खूप अप्रूप वाटले व त्याने त्या यशस्वी जागेवर सुंदर राजवाडा बांधला व बगीचा तयार केलात यालाच  ' कोटबाग निजाम 'असे म्हणतात. 

झुलता पूल 

अहमदशहाने ' बाग निजाम 'भोवती तट  बांधला तो मातीचा होता त्यात त्याने बुरुजही बांधले  होते, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने तो फार कमकुवत होता त्यामुळे त्याला मातीचा किल्ला म्हणत असत असा उल्लेख बर्‍याच ठिकाणी सापडतो.   किल्ल्याचा एक जुना नकाशा 'मुजदे अहमदनगर' या पुस्तकात आहे तो नकाशा कविजंगाने  मोगलांच्या कारकिर्दीत तयार केलेल्या नकाशा वरून घेतला आहे.  या नकाशात  नुसता किल्लाच  नसून शहर, आसपासची गावे मुख्य इमारती दाखवल्या आहेत.  एकूण किल्ल्याला२४ बुरुज आहे मध्यभागात  राजवाडा महाल,  हबशीखाना, मदरसा, गगन महाल, मुल्क आबाद वगैरे सैनिकांच्या इमारती, विहिरी या सर्वांचा उल्लेख दाखवला आहे .' तवारीख मेकरी 'या नावाचे एक पर्शियन पुस्तक हस्तलिखित आहे त्यामध्ये खूप माहिती उपलब्ध आहे त्याचे भाषांतर झाले तर आणखी काही गोष्टी आपल्याला माहिती होतील . 

किल्ल्याच्या दरवाजात उभे राहिले असता डाव्या बाजूला जो पहिला बुरुज आहे त्याचे नाव अरबीबुरुज, नारंगीबुरुज, राजबुरुज, छज्जाबुरुज, दौलतखानी  बुरुज, आतषखानी  बुरुज, शहा बुरुज, रहमानी बुरुज, हुसेनी बुरुज ,कासिमखानी  बुरुज , बंदडी बुरुज, सुभानी बुरुज, युसुफखानी  बुरुज ,जहांगीरखानी , परसखानी बुरुज, दौलतखानी, फतयावर , गावसंजीबुरूज, डवरखान बुरुज, अश्रफखान बुरूज , पोलादखानी बुरूज ,अकबरखानी बुरुज, कमालखानी  बुरुज ,याप्रमाणे या बुरुजांची नावे आहेत हुसेन निजामशहाने अहमदशहाच्या  व स्वतःच्या वेळेच्या प्रसिद्ध हुशार प्रधान व सेनापतींच्या नावावरून बुरुजास   नावे दिली असावीत  असे वाटते . 

भुईकोट किल्ल्याचा एकंदर परिघ एक मैल  ८० यार्ड असून तो दीर्घवर्तुळाकार आहे.  गटाच्या सर्व बाजू खंदक असून त्याची रुंदी ८५ फूट व काही ठिकाणी १८० फूट आहे त्याची खोली १४फुटापासून २० फुटांपर्यंत आहे खंदकाच्या बाहेर चारही बाजूने उंच मातीच्या टेकड्या आहेत, जेणेकरून शत्रु व तटावरील सैंन्य समोरा समोर येऊन शत्रूवर हल्ला करण्यास योग्य होईल किल्ल्यात जाण्याकरता समोर आणखी एक दरवाजा आहे . दोन्ही दरवाजा मध्ये पहारेकऱयांची   जागा आहे पहिल्या दरवाज्यावर दुसरा मजला आहे.  त्यास  बादशाह हवेली असे म्हणतात कदाचित अहमदशहा याठिकाणी बसत असावा .  इतर किल्ल्याप्रमाणेच मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस बुरूज  नसून खंदकावरून जाण्यासाठी पूल बांधले आहेत याप्रमाणे किल्ल्यात जाण्यासाठी इंग्रजी झेड या अक्षराप्रमाणे मुख्य दरवाजा आहे.  किल्ल्यात जाण्यासाठी एकच दरवाजा होता.  परंतु किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या पूर्व बाजूला झुलता पूल बांधला होता. तो युद्ध प्रसंगाच्या वेळी खंदकामध्ये पाण्यात सोडून देण्याची सोय होती.  हा पूल सन  १८३२ मधे ब्रिटिश इंजिनियर कर्नल जेकब यांनी  बांधला होता. 

बाकीच्या  तटबंदीचे दगडी बांधकाम  व दगडी बुरुजांचे  बुर्हाणशहा   व हुसेन निजामशहा यांच्या काळात मजबुतीकरण झाले हुसेन निजामशहाने किल्ल्याभोवती वरील प्रमाणे   खंदक तयार केला. किल्ल्यामध्ये एकंदर सात  महाल होते .  सोन महाल,  गगन महाल ,मुल्क -आबाद ,मीनामहल, रुपमहाल ,बगदाद महल याशिवाय काही मदरसे होते दिलक शाद वगैरे इमारती महालाच्या मध्यभागी होत्या.  त्यातील मदरसे  अहमदशहाच्या वेळेस बांधले असावेत असे वाटते.  अहमदशहाने  किल्ल्यामध्ये पहिली इमारत बांधली त्याला सोनमहाल म्हणतात हा महाल लाल दगडांचा होता. किल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीकरिता चार विहिरी होत्या त्यांची नावे गंगा, जमुना, मछली बाई, शक्करबाई अशी होती त्यापैकी शक्करबाई  ही विहीर चांदबिबीने  बांधली असे म्हणतात . मुसलमानी आमदानीत विहिरींची नावे गंगा-जमुना असल्याने याविषयी थोडे नवल वाटते.   

चांदबिबीच्या काळात मोगली सैन्याने काही बुरुजाखाली सुरुंग लावले होते त्यापैकी एक सुरुंग उडाला व बुरुज पडून तटास   मोठी खिंड पडली त्या ठिकाणी चांदबीबीने शत्रूसैन्याचाहल्ला  स्वतः परतविला व ते खिंडार  एका रात्रीतून बांधून बंद केले . या जागेपुढे बुरूजा  बाहेरच्या बाजूने एका दगडावर एका वाघाचे चित्र आहे.  परंतु वैशिष्ट्य पूर्ण आहे बारकाईने पाहिल्यास तो एक फारसी लिपीमधील  शिलालेख आहे.  त्या लेखातील अक्षरजुळणी इतकी खुबीने केली आहे की त्या अक्षरांचा  आकार वाघासारखा तयार झाला आहे.  चांदबिबीच्या काळामध्ये मलिक अंबर हा हबशी होता तो स्वतःच्या कर्तृत्वामुळे वजीर पदापर्यंत पोहोचला त्याने निजामशाही मध्ये सैनिकांमध्ये हबशी लोकांचा खूप भरणा केला होता कारण ते सैनिक खूप शूर व लढवय्ये होते त्यामुळे त्यांच्या मुख्य दरवाजा जवळ व मुख्य ठिकाणी बंदोबस्त असायचा ,किल्ल्यामध्ये मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला त्यांच्या राहण्याची घरे व हबशीखाना म्हणून इमारत होती तेथे त्यांच्या जेवणाची सोय केली जात असे. 

"कोट बाग निझाम" हा वैभवशाली किल्ला असूनहा केला अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. एव्हढेच नव्हे तर तो आशिया खंडातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे.  

लेखक - नारायण आव्हाड - ९८८१९६३६०३
    

Post a Comment

0 Comments