तक्रारदारांनाच धमकाविणार्‍या त्या पी एस आयची चौकशी करण्याची मागणी

तक्रारदारांनाच धमकाविणार्‍या त्या पी एस आयची चौकशी करण्याची मागणी

छावा क्रांतीवीर सेनेचे उपोषण

वेब टीम नगर : कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्‍या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई न करता तक्रारदारांनाच धमकाविणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या बंद असलेल्या प्रवेशद्वारात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हा संघटक साईनाथ बोराटे, दिपक चांदणे यांनी उपोषण केले. यामध्ये शाहीर कान्हू सुंबे, बबन वाघुले, हरीभाऊ हारेर, लक्ष्मण भवार, राम कराळे, दत्ता वामन आदी सहभागी झाले होते.

एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. तरी देखील अद्यापि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. टाळेबंदी काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी गुंडांना हाताशी धरुन पठाणी पध्दतीने अवाजवी हप्ता वसुली केली. सदर फायनान्स कंपन्यांवर कारवाई होण्यासाठी दि.26 नोव्हेंबर रोजी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. फायनान्स कंपन्यांवर कारवाई संदर्भात चौकशीचे आदेश दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. दीपक चांदणे यांनी 5 डिसेंबर रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून योग्य तपास करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांना योग्य चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले व चांदणे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाठविले. चांदणे यांनी सहा. पो.नि. बोरसे यांची भेट घेतली असता बोरसे यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकाविले व पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना एका पोलीस अधिकारीकडून अशी अपमानास्पद वागणुक मिळणे निंदनीय बाब आहे. बोरसे यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्यापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार व अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. गुन्हेगारांना अभय मिळाले असून, सर्व प्रकरणे दडपले जात आहे. कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्‍या खाजगी एजंटावर कारवाई न करता तक्रारदारांनाच धमकाविणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. बोरसे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे नेमणुकीस व कार्यरत असलेले सहा. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments