नगरटुडे बुलेटीन 25-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 25-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स ब्रदर्सच्या वतीने

जीएसटी धोरणातील किचकट पद्धती सुधारण्यासाठी ना. शरद पवार यांना निवेदन

किचकटपणा, अवाजवी विलंब शुल्क व दंड वसुलीच्या तुघलकी पद्धतीमुळे व्यापारी वर्ग पाठोपाठ कर सल्लागार त्रस्त

वेब टीम नगर : जीएसटी धोरणातील किचकट पद्धतीमुळे कर सल्लागार आणि व्यापारी त्रस्त झाले असून, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स ब्रदर्सच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. खा. पवार एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शहरात आले असता त्यांना सदर मागण्याचे निवेदन अ‍ॅड. रोहिडा पुरुषोत्तम, कर सल्लागार आनंद लहामगे, सुनील कराळे,  सुनील फळे, अ‍ॅड. प्रसाद किंबहुणे, सुनील सरोदे यांनी दिले.

जीएसटी आणि इतर कर पद्धतीमधील किचकटपणा, क्लिष्टता आणि अवाजवी विलंब शुल्क व दंड वसुलीच्या तुघलकी पद्धतीमुळे व्यापारी वर्ग पाठोपाठ कर सल्लागार आणि सीए पूर्णतः त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेत अहमदनगर डिस्ट्रिक टॅक्स ब्रदर्स व कर सल्लागार संघटनेने कर पद्धतीत सुटसुटीतपणा आनावा, विलंब शुल्क कमी करावे, फाईल अपलोड करण्यास पुरेसा वेळ द्यावा अशा मागण्या केल्या आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करून कर पद्धतीतील क्लिष्टता दूर करण्याबाबत पवार यांना साकडे घालण्यात आले आहे.

रात्रंदिवस काम करून जीएसटीच्या फाईल कराव्या लागतात. त्यातही पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याने फाईल अपलोड करताना तासनतास घालावे लागतात. फाईल लेट झाल्यास त्याचा व्यापार्‍यांना दंड भरावा लागतो. त्यामुळे कर सल्लागार आणि व्यापार्‍यांमध्ये ही वादावादीचे प्रसंग उद्भवतात. या सर्व अडचणीमुळे कर सल्लागार मोठ्या मानसिक दडपणाखाली काम करत आहे. केंद्र सरकार करपद्धतीत दररोज नवनवीन बदल करत असल्याने कर सल्लागार हैराण झाले आहे. देशाची करपद्धती सोपी व सुटसुटीत होण्याऐवजी त्याचे तीन तेरा वाजले आहे. अशा या किचकट पद्धतीला व्यापारीवर्ग अगोदरच वैतागले असताना आता कर सल्लागार व सीए वर्गात असंतोष आहे. कोरोना सारख्या महामारीशी दोन हात करताना व्यापारी व जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाची करपद्धती सोपी करण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांकडून अवाजवी विलंब शुल्क व दंड वसूल केला जात आहे. जीएसटी कर प्रणालीत वारंवार होणारे बदल थांबवून, ही किचकट पद्धत सुरळीत होण्यासाठी केंद्रस्तरावर व अर्थमंत्र्यांशी पाठपुरावा करुन हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत गंधाक्ते यांची नियुक्ती

वेब टीम नगर : स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत गंधाक्ते यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा युवक अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी गंधाक्ते यांच्या निवडीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवकांना संघटित करुन संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असून, ही चळवळ बळकट करण्यासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याची भावना प्रशांत गंधाक्ते यांनी निवडप्रसंगी व्यक्त केली. या निवडीबद्दल संघटनेचे पारनेर तालुकाध्यक्ष निलेश दरेकर, जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून प्रश्‍न सोडविण्याची मागणी

भिंगार छावणी परिषदेतील प्रश्‍नांचे ना. शरद पवारांना निवेदन

वेब टीम नगर : भिंगार छावणी परिषदेतील विविध नागरी प्रश्‍न सुटण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून सदरील प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. शरद पवार यांना दिले. अहमदनगर शहराच्या दौर्‍यावर पवार आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी संपत बेरड, अभिजीत सपकाळ, मच्छिंद्र बेरड, शुभम भंडारी, सुदाम गांधले आदी उपस्थित होते.

भिंगारला एमआयडीसी मार्फत एमईएसला व एमईएस मार्फत छावणी परिषदेला पाणी मिळते. त्यानंतर बोर्डामार्फत नागरिकांना पाणी दिले जाते. सदर पाणीपुरवठा औद्योगिक दराने केला जात असून, त्याचे दर चार ते पाच पट अधिक आहे. भिंगारकरांना घरगुती पाणीपुरवठा दराने पाणी मिळण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित करुन, शहराच्या फेज टू मधून किंवा चाळीस गावच्या बुर्‍हाणनगर योजनेतून पाणी मिळावे, छावणी परिषदेला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा द्यावा, रक्षा मंत्रालय येथून सर्विस चार्ज (फंड) निधी थकीत असल्याने निधी उपलब्ध झाला नसल्याने छावणी परिषदचे कर्मचार्‍यांचे मागील महिन्यांचे वेतन झालेले नाही. निधी नसल्यामुळे स्थानिक प्रश्‍न सुटू शकत नसून, छावणी परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, भिंगार शहरातील नागरिक घरापासून वंचित आहे या नागरिकांना भिंगार विभागात चटई क्षेत्राचे बंधन असल्याने दुसरा मजला बांधता येत नाही. वाढती लोकसंख्या व कुटुंबाचा विचार लक्षात घेऊन एफएसआय वन प्लस थ्री मिळण्यासाठी परवानगी मिळावी, केंद्र सरकारच्या सर्व योजना छावणी परिषदेस लागू करण्यात याव्या, मोकळ्या जागेवर हडको गृहनिर्माण योजना राबवावी, शहराची परिस्थिती लक्षात घेऊन भुयारी गटार योजना कार्यान्वीत करावी, भुईकोट किल्ला हा लष्करी हद्दीत असून पर्यटनाच्या दृष्टीने तेथील काम सध्या बंद आहे. किल्ल्याचे सुशोभीकरण होवून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, शहरातून व्ही.आर.डी.ई. चे स्थलांतर होऊ देऊ नये, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे मध्यभागी असून फार अडचणीत आहे. त्याचे मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे व पोलिसांच्या संख्याबळात वाढ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून, हे प्रश्‍न सोडवण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून सदरील प्रश्‍न सोडविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्व संघटनांची एकत्र महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना

महाराष्ट्रातील प्रमुख ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांची शहरात बैठक

वेब टीम नगर : ग्रामपंचायत कर्मचारींच्या विविध प्रश्‍नांवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख संघटनांची बैठक शहरातील बुरुडगाव रोड येथील भाकप कार्यालयात बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) चे  तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली. तर या कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारींच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, कॉ. मारुती सावंत, कॉ. संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील, अमृत महाजन, सुरेश निकाळजे, शरद खोडदे, शिंदे, सतीश पवार, बाळासाहेब लोखंडे, अनिल शिंदे, अनीस बागवान आदिंसह अहमदनगर, बीड, नागपूर, पुणे, वाशिम, रायगड, नाशिक, बीड, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक), महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघ पुणे-सातारा या संघटनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणविरे, सहसचिवपदी सखाराम दुरुगुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी ए.बी. कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र व्हावळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारींचे वाढलेले किमान वेतन, राहणीमान भत्ता, यावलकर समितीच्या शिफारशी, पेन्शन, ग्रॅज्युटी रक्कम आदी प्रश्‍नावर एकसंघटितपणे आंदोलन केले जाणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बोरुडे यांनी माणुसकीच्या भावनेने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य केले 

ज्ञानेश्‍वर गायकवाड : बारा बलुतेदार महासंघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार

वेब टीम नगर : फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बारा बलुतेदार महासंघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील नाभिक समाजाच्या समाज मंदिरात पार पडलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर (माऊली) गायकवाड, ओबीसी व्हीजेएनटीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शहराध्यक्ष अनिल इवळे, शहर उपाध्यक्ष श्यामराव औटी, अनिल निकम, रमेश बिडवे, राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्‍वर (माऊली) गायकवाड म्हणाले की, फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी माणुसकीच्या भावनेने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य केले. कोरोना व महागाईच्या संकटामुळे अनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. दुर्बल घटकांसाठी आरोग्य चळवळ उभी करुन मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्‍वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेली आरोग्य चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब भुजबळ यांनी समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली असल्याने फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार ठरत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगतापांच्या निवास्थानी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खलबते

२७ जानेवारीला मुंबईत महत्वाची बैठक

वेब टीम नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार आज नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार जगताप द्वियांनी व सचिन जगताप यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून सत्कार केला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. लहू कानडे, आ.आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, राहुल जगताप, शेखर घुले, जेष्ठनेते पांडुरंग आभंग, उदय शेळके, घनश्याम शेलार, नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.

          यावेळी खा.शरद पवार यांनी उपस्थित सर्व नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करून परिस्थितीची माहिते घेतली. माहआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी अशी सूचना करून त्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे असे सांगितले. यावेळी शेखर घुले, पांडुरंग अभंग यांनी निवडणुकीच्या सध्य परिस्थीची सविस्तर माहिती दिली.

          जगपात कुटुंबियांच्या वतीने खा.शरद पवार यांचा आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी पार्वती जगताप, जी.प.सदस्य सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ.शशिकांत फटके, डॉ.वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते.

बऱ्याच महिन्यांनी जेष्ठनेते खा.शरद पवार हे नगरला आल्याने आ.अरुण जगताप यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.  यावेळी तोंडाला मास्क लावलेल्या खा.शरद पवार यांनी गाडीतून उतरताच उपस्थित सर्व नेत्यांना तोंडाला मास्क लावण्याची सूचना केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी स्त्रीच असते

डॉ. सुधा कांकरिया : श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा

     वेब टीम नगर : एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी बालिकाच असते. सासरी व माहेरी दोन्हीकडे ती आपल्या सद्गुणांनी, कर्तृत्वानी उजेडाची मानकरी ठरते. त्यामुळे स्त्री जन्माचे प्रत्येकाने स्वागत केले पाहिजे. स्त्री ही कोणत्याही बाबतीत कमी नसते. मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही घर उजळून टाकणारी पणती असते, असे प्रतिपादन  स्त्री जन्माचे स्वागत करा या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.

     राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी सौ.कांकरिया बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे होते.  यावेळी  सहसचिव राजेंद्र झालानी, विश्‍वस्त रश्मी येवलेकर, मुख्याध्यापिका कांचन गावडे, प्राथ.मुख्याध्यापिका योगिता गांधी उपस्थित होत्या.

     पुढे बोलतांना डॉ.सुधा कांकरिया म्हणाल्या की, आज स्त्री भ्रुण हत्येमुळे समाजाची घडी विस्कटली आहे. ती परत नीट बसविण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे. आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यालयात स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हात उंच करून ठरावाला मान्यता दिली. तसेच फक्त कन्या असलेल्या परिवारांचाही सन्मान करण्यात आला. ही अभिनंदनीय बाब आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होत नाही त्या कुटुंबातील आईला दोषी ठरवले जाते. तिच्यावर अन्याय, अत्याचार केला जातो ही बाब थांबविण्यासाठी गुणसुत्राचे विज्ञान प्रत्येक घरात समजावून सांगितले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. दोघांचेही स्वागत करण्याची भूमिका असावी असे त्या म्हणाल्या.

     संस्थेचे उपाध्यक्ष  दशरथ खोसे म्हणाले की, मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुली कुठेही कमी नाहीत. उलट अधिक चिकाटीने, प्रामणिकपणे त्या कार्यरत असतात.  डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्रीजन्माचे स्वागत करा ही चळवळ अनेक वर्षांपासून सुरु आहे. अशा उपक्रमांत मुलींविषयी आदर निर्माण होऊन जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     मुख्याध्यापिका कांचन गावडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन विद्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राजेंद्र झालानी, रश्मी येवलेकर, अरुणा वाघ आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

     सुत्रसंचालन आशा वरखडे यांनी केले तर  आभार उज्वला सूर्यवंशी यांनी मानले. डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थितांना स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ दिली. फक्त कन्या असलेल्या उमादेवी राऊत, रिना अंधारे, मीना पांडूळे, अरुणा वाघ, अर्चना कदम, सुनिता झोडगे, आशा शिंदे आदि परिवारांचा यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments