नगरटुडे बुलेटीन 10-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 10-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा न्यायालयात पालकन्यायमुर्ती एस. व्ही. गंगापुरवाला यांचे हस्ते ई-सेवा केंद्राचे आभासी उद्घाटन

वेब टीम नगर : येथील जिल्हा न्यायालयत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा नगर जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापुरवाला यांच्या हस्ते ई-सेवा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. कार्यक्रमाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेटे, सरकारी अभियोक्ता ॲड. सतीश पाटील, सेंट्रला बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भुषण ब-हाटे आदी जिल्हा न्यालयातून ऑनलाइन सहभागी झाले होते.

न्याय सर्वासाठी या तत्वाला पाठबळ देण्याकरिता व सर्वोच्च न्यायालयाध्या ई-समिती मार्फत ज्या काही सेवा पुरविल्या जातात त्या सर्वसामान्यांना प्राप्त व्हाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ई-समितीने जिल्हा न्यायालय स्तरावर व उच्च न्यायालय स्तरावर ई-सेवा केंद्र सुरु करण्याची संकल्पना मूर्त रुपात आणून नगरच्या जिल्हा न्यायालयात ई-सेवा केंद्र स्थापन केले आहे.

जिल्हा न्यायलयात सुरु झालेल्या ई सेवा केंद्राच्या माध्यमातून पक्षकरांना खटल्याची स्थिती, पुढील सुनावणीची तारीख इतर तपशीलाबद्दल माहिती मिळणार असून पक्षकरांना प्रमाणित प्रती मिळविण्यासाठी ई-प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा. ई-माध्यमाद्वारे याचिका दाखल करण्याची सुविधा, ई-मुद्रांक, ई-देयक ई-प्रणालीद्वारे खरेदीसाठी सहाय्य. आधार आधारित ई-स्वाक्षरी मिळविण्याकरिता सहाय्य. ॲन्ड्रॉईड आणि आयओएससाठी ई-न्यायालयाचे ॲप प्राप्त करण्यास सहाय्य आणि त्या ॲपची प्रसिध्दी. न्यायाधीन बंदी व त्यांचे नातेवाईक यांची ई-भेट (मुलाखत) घडवून आणण्याकरिता सहाय्य. रजेवर असाणाऱ्या न्यायाधीशांबाबत चौकशी व माहिती. जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समिती व सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडून मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य कसे प्राप्त करुन घेता येईल याबाबतचे मार्गदर्शन. दूरसंच प्रणालीद्वारे न्यायालयीन सुनावणीची व्यवस्था आणि आयोजन करण्याची पद्धत समजवून सांगणे. ई-मेल,व्हाट्सॲप किंवा इतर उपलब्ध ई-माध्यमाद्वारे न्यायालयीन आदेश व निर्णयाच्या प्रति संबंधीत पक्षकारांना उपलब्ध करुन देणे. आदी महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहेत.

 कार्यक्रमात न्यायमुती एस. व्ही. गंगापुरवाला यांनी मोलाचे मार्गदर्शन करत या ई सेवा प्रणालीचा जास्तीतजास्त पक्षकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच जिल्हा प्रधान व सत्र न्यायधीश श्रीकांत आणेकर, व ॲड. सुभाष जे.काकडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, यांनी केले. तर जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आर.एस.पी. समादेशकांनी जनतेला मदतीचा आधार दिला

पोलीस उपमहानिरीक्षक दिघावकर : कोरोनाच्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणार्‍या समादेशकांचा देवदूत म्हणून सन्मान

वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण (से.स.) आर.एस.पी. अधिकारी यांनी कोरोनाच्या संकटकाळात पोलीस विभाग व प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासह समाजसेवा केली. कोरोनाच्या संकटकाळात उल्लेखनीय योगदान देणार्‍या मनीलाल शिंपी (कल्याण, ठाणे जिल्हा समादेशक), सोमनाथ बोंतले (अहमदनगर जिल्हा समादेशक), जालिंदर झिंजाड (पुणे जिल्हा समादेशक), सिकंदर शेख (अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष), कैलास कानवडे, राजेंद्र देशमुख (उपसमादेशक अहमदनगर) यांचा महाराष्ट्र राज्य आर.एस.पी. चे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते देवदूत या सन्मान पत्राने गौरव करण्यात आला.

 प्रतापराव दिघावकर म्हणाले की, महाराष्ट्रात आर.एस.पी. अधिकारी, शिक्षकांनी जे कार्य केले, ते पोलीस विभागाला आणि प्रशासनाला खूप मोलाचे ठरले आहे. निस्वार्थ भावनेने सेवा देऊन शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणिकपणे बंदोबस्त करताना गरजू आणि उपासमारीने होरपळलेल्या जनतेला मदतीचा आधार दिला. अन्नदान, रेशन वाटप, औषध आणून देणे, घरापर्यंत किराणामाल पोचवणे अशी अनेक कामे केली. ही खूप मोलाची सेवा ठरली असल्याचे सांगितले. आर.एस.पी. कडून राष्ट्र निर्मितीचे आणि आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य घडत आहे. एक पैसाही मानधन भेटत नसले, तरीही चेहर्‍यावर आत्मविश्‍वास आहे. नवीन काहीतरी करण्याची प्रत्येकात उर्मी आहे, अशा शब्दात त्यांनी आर.एस.पी. अधिकार्‍यांचे कौतुक केले.

पोलीस उपमहानिरीक्षक दिघावकर यांचा आर.एस.पी. चे महासमादेशक अरविंद देशमुख यांनी सन्मान केला. अहमदनगर जिल्हा आर.एस.पी. टीम तर्फे दोन्ही पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास भोकनळ, मुख्याध्यापक कैलास कानवडे, शिवाजी सावंत, अनंत किनगे, जितेंद्र सोनवणे, अनुराधा माने आदिंसह आर.एस.पी. अधिकारी शिक्षक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय महिला आयोगातून चंद्रमुखी देवी यांची हकालपट्टी करा

भारतीय महिला फेडरेशनची मागणी

वेब टीम  नगर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी बलात्कार करून मारून टाकलेल्या बदांयू येथील अंगणवाडी सेविकेच्या घरी भेट देताना केलेल्या वक्तव्याचा अहमदनगर भारतीय महिला फेडरेशनसह संघटनांनी अत्यंत तीव्र निषेध केला आहे.

चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, जर ती महिला एकटी न जाता बरोबर घरातल्या एखाद्या मुलाला घेऊन गेली असती तर तिच्यावर असा प्रसंग ओढवला नसता. ज्या महिला आयोगाने स्त्रियांच्या अधिकाराचे रक्षण करायचे त्याच महिला आयोगाच्या सदस्या जाहीरपणे गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करून उलट त्याच्या दुष्कृत्याची जबाबदारी पीडितेवर टाकून मोकळ्या होत आहेत हे खरोखर लाजिरवाणे आहे. त्यांच्या या वक्तव्याचा हेतू मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सत्तेत स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या भयानकतेवर पडदा घालण्याचाच आहे, हे स्पष्ट आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य सरंजामी आणि पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रचार करीत आहेत, हे धक्कादायक आहे. त्यांना ताबडतोब महिला आयोगातून काढून टाकावे अशी भा.म.फे.ने मागणी केलेली आहे.

या वक्तव्याचा भारतीय महिला फेडरेशनने अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला आहे.

भारतीय महिला फेडरेशन अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षा डॉ.कमर सुरूर, उपाध्यक्षा शोभाताई शिंदे, सेक्रेटरी कॉ.भारती न्यालपेल्ली, सहसेक्रेटरी कॉ.सगुना श्रीमल, कॉ.निर्मला खोडदे, कॉ.सुजाता वागसकर, कॉ. उज्वला वाकळे, संगीता कोंडा, रेणुका अंकाराम, भाग्यलक्ष्मी गडड्म यांनी संयुक्त पत्रक काढुन हकालपट्टीची मागणी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अध्यक्षपदी प्रा.बाळकृष्ण सिद्दम, सचिवपदी डॉ. रत्नाताई बल्लाळ तर खजिनदारपदी जयंत रंगा यांची निवड

वेब टीम नगर: पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विश्‍वस्तांची सभा शनिवार दि.९ जानेवारी रोजी संस्थेचे उपाध्यक्ष विलास पेद्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्दम यांची अध्यक्षपदी, डॉ. रत्नाताई बल्लाळ यांची सचिवपदी तर जयंत रंगा यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

 संस्थेच्या उपाध्यक्षपदी विलास पेद्राम व सहसचिव म्हणून विनायक गुडेवार यांची फेरनिवड करण्यात आली. सर्व पदाधिकार्‍यांचे संस्थेचे जेष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, शंकर सामलेटी, महेंद्र बिज्जा, सविता कोटा या विश्‍वस्तांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोटा, श्री मार्कंडेय विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पाडूंरंग गोणे, श्रमिकनगरच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, मुख्याध्यापक शशिकांत गोरे, प्रा.बत्तिन पोट्टयन्नाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, तसेच संस्थेच्या सर्व शाखांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज चेंबर्समध्ये महावितरणने अनाधिकृतपणे  उभे केले विजेचे खांब

गाळेधारकांचा आरोप : विजेचे खांब त्वरीत काढून घेण्याची मागणी

वेब टीम नगर : कोठला येथील राज चेंबर्स या अपार्टमेंटच्या दुकानांसमोरील पार्किंगमध्ये अचानकपणे विजेचे खांब रोवल्याने येथील स्थानिक गाळेधारकांनी सदर विजेचे खांब काढून घेण्याच्या मागणीचे निवेदन महावितरण कार्यालयात दिले. यावेळी अन्सार सय्यद, अ‍ॅड. सुनिल मुंदडा, सीए संजय नावंदर, अमजद खान, मुनाफ बागवान, पी.टी. देशमुख, इंजि. जहीर शेख, सादिक सय्यद आदींसह राज चेंबर्स मधील व्यावसायिक उपस्थित होते.

कोठला येथील राज चेंबर्समध्ये अनेक वर्षापासून गाळेधारक विविध व्यवसाय करीत आहे. तर काहीचे कार्यालय सुध्दा आहे. दि. ७जानेवारी रोजी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी अनाधिकृतपणे गाळेधारकांना कोणतीही कल्पना न देता अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुकानांसमोर वीजेचे खांब रोवले व त्यावर वीजेच्या ताराही जोडल्या. शहरात सर्व ठिकाणी विशेष करून अपार्टमेंटमध्ये विजेचे खांब न लावता केबल टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु राज चेंबरमध्ये अशा पध्दतीने विजेचे खांब रोवल्याने येथील व्यावसायिकांना अडथळा व धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

 राज चेंबर्स या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये विजेचे खांबाने भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन महावितरण कार्यालयाने अनाधिकृतपणे लावलेले वीजेचे खांब त्वरीत काढून घेण्याची मागणी राज चेंबर्सच्या अपार्टमेंट मधील गाळेधारकांनी केली आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे

पो.नि.सुनिल गायकवाड : पोलिस स्थापना दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर 

    वेब टीम  नगर :  सिद्धार्थनगर येथे महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने सामाजिक समता विचारधारा फौंडेशन अहमदनगर, तोफखाना पोलिस स्टेशन आणि आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   प्रमुख पाहुणे तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि.सुनिल गायकवाड होते.  यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, संस्थेचे अध्यक्ष  सुनिल मुरलीधर भोसले आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

     याप्रसंगी पो.नि.सुनिल गायकवाड म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला त्याची झळ पोहचली आहे. अनेकांच्या नोकरी, व्यवसाय गेल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समाता विचारधारा फौंडेशनच्यावतीने गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचा राबविलेला उपक्रम त्यांना दिलासा देणार आहे. अशा उपक्रमातून सामाजिक समता निर्माण होत असते. गरजवंतांना सेवा देऊन आपण समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

     प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुनिल मुरलीधर भोसले म्हणाले, फौंडेशनच्यावतीने वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. कोरोनानंतर आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून गरजूंना त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असते. फौंडेशनच्यावतीने असे उपक्रम नेहमीच राबवू, असे सांगितले

     याप्रसंगी सिद्धार्थनगर येथील सफाई कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक,  शाळकरी मुलांच्याही तपासणी करण्यात आली.     कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभीषण चव्हाण, मंगल काटकर, सिद्धेश वैराळ, कैलास जगधने, मारूती ससाणे, अनिल मांडलिक , गणेश शेकटकर, सावित्राबाई भोसले, श्रेया घोरपडे, सुहानी भोसले, शितल घोरपडे, श्रृती घोरपडे, यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन

    वेब टीम  नगर : नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे हे नगर येथे आले असता त्यांची भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी. करोसिया आदिंसह शहरप्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते.

    याप्रसंगी खा.सदाशिव लोखंडे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून सदर स्थलांतराणाबाबत आपण दिल्ली येथील भाजपाचे वरिष्ठ नेते शाम जाजू यांची भेट घेऊन त्यांच्यासह संरणक्षमंत्री ना.राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्‍न त्यांच्यापुढे मांडू.  शाम जाजू हे नगरचेच असल्याने ते या प्रश्‍नांबाबत सहनभूतीपूर्वक विचार करतील. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदारांसह याबाबत  गांभीर्याने विचार करुन स्थलांतरणास स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्‍वासन दिले.

     याप्रसंगी दुर्गेश गाडेकर यांनी खा. लोखंडे यांना व्हीआरडीई संदर्भात माहिती देतांना सांगितले की, वरिष्ठ पातळीवरुन व्हीआरडीई हलविण्याचे दिलेले संकेत हे नगरकरांसाठी मोठे हानिकारक ठरेल, त्याचप्रमाणे नगरमधून मोठा रोजगार स्थलांतरीत होईल. नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसणारा आहे. स्थानिक व्यवसायिकांना फटका बसेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थावरही परिणाम होईल. एकदरीत नगरच्या बाजारपेठेवर विपरित परिणाम होईल. गेल्या २०-२५ वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झाले असल्याने कौटूंबिक वाताहात होईल. अहमदनगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. याबाबत शिष्टमंडळाने शिवसेना खासदार व संरक्षण समितीचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनाही याबाबत निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनसे पाठबळ देणार 

 सुमित वर्मा : पिंपळगांव माळवीतील शिवयोद्धा फौंडेशनचे पदाधिकारी मनसे विद्यार्थी सेनेत दाखल

   वेब टीम नगर : पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ग्रामीण भागातही लक्ष घालून तेथील युवकांना एकत्र करुन गावपातळीवरील प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनानंतर सध्या ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाविषयी ग्रामीण भागात अजून म्हणावी तशी जागृती नाहीय. शाळा-कॉलेजचे प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय योजनांची माहिती युवकांना होत नसल्याने यापासून ते वंचित राहत आहेत. या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन ते सोडविणे गरजेचे आहे.  मनसेने नेहमीच आपल्या ठोस भुमिकेमुळे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यामुळेच गावातील युवक आता मनसेमध्ये दाखल होत आहेत. या युवकांना योग्य दिशा देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनसे पाठबळ देऊन गावपातळीवरील प्रश्‍न सोडण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

     पिंपळगांव माळवी येथील शिवयोद्धा फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी मनसे विद्यार्थी सेनेत जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संकेत जरे, फौंडेशनचे अध्यक्ष आदेश गायकवाड, भाऊसाहेब गव्हाणे, वैभव झिने, विशाल पाचारणे, शिवाजी गायकवाड, परमेश्‍वर गरड, बजरंग रणसिंग, हरिष गायकवाड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष आदेश गायकवाड म्हणाले, आम्ही शिवयोद्धा फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय राहून गावपातळीवर कार्य करत होता. आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेमध्ये राहून गावाचा विकास साधाणार आहोत. राजकारणापेक्षा गावाचे प्रश्‍न मार्गी लावण्यास आपले प्राधान्य राहिल. जिल्हा पातळीवरील पदाधिकार्‍यांनी आमच्या भुमिकेला पाठिंबा देऊन सहकार्य करणार असल्याचे यापुढील काळात ग्रामीण भागात काम वाढवून, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हीआरडीईच  काय कोणताही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जावू देणार नाही : खा.डॉ.श्रीकांत शिंदे

    वेब टीम  नगर - नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी. करोसिया आदि उपस्थित होते. सदर निवेदन मंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले.

    यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करुन हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगून  खा.संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करु, असे आश्‍वासन दिले. हा प्रश्‍न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्‍न असल्याने महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही.  या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करणार असल्याचे खा.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले

     याबाबत नगरमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी खा.श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून व्हीआरडीई स्थलांतराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे येथे शिष्टमंडळास येण्यास सांगितले होते, त्या अनुषंगाने काल ठाणे येथे शिष्टमंडळाने खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  गणेश खैरे यांना पीएचडी पदवी प्रदान

वेब टीम नगर : पेमराज सारडा महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी पीएचडी साठी मार्गदर्शन केलेले विद्यर्थी गणेश खैरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. गणेश खैरे यांनी हिंदी विषयात साहित्यिक सुषमा बेदी यांच्या साहित्यांचा मनोविश्लेषणात्मक अध्ययन करत प्रबंध सादर केला होता. यासाठी प्रा.डॉ. अमरजा रेखी यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले. डॉक्टरेट पदवीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गणेश खैरे नगरला येवून प्रा. रेखी यांचे आशीर्वाद घेवून केलेल्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल आभार मानले. यावेळी अजित रेखी हे उपस्थित होते.

       यावेळी डॉ.अमरजा रेखी म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सहकार्या मुळे गणेश खैरे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. सारडा महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करतांना आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यातील गणेश खैरे हे डॉक्टरेट मिळवलेले पहिले विद्यार्थी आहेत. विविध महाविद्यालयातील अजून सहा विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 रोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतील

 आ. डॉ. सुधीर तांबे : १७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण !

वेब टीम संगमनेर : कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शैक्षणिक साधनांसाठी वंचित असतांना रोटरी क्लबने दिलेले रोटरी ई - लर्निंग डिजिटल स्कूल टॅब दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी ई- लर्निंग डिजिटल शैक्षणिक ३०० टॅब वितरणाचा कार्यक्रम बुधवार दि. ७ रोजी मालपाणी लॉन्स येथे पार पडला, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.संजय मालपाणी, रोटरी क्लब पुणे नॉर्थचे कुमारजी शिनगारे, मनिषा कोणकर , रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा, सचिव योगेशजी गाडे, प्रकल्प प्रमुख सुनील कडलग ,ओंकार सोमाणी, डॉ. प्रमोद राजुस्कर, नरेंद्र चांडक उपस्थित होते. यावेळी सर्व १७ शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधिक शिक्षिका वृषाली कडलग ,वैशाली हासे , श्रीकांत बिडवे यांनी टॅबचा स्वीकार केला. विद्यार्थी दत्ता कडलग याने मनोगत व्यक्त केले.

आपल्या भाषणात  आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी रोटरी क्लबच्या स्थापनेपासून क्लबने संगमनेरसाठी कशा प्रकारे योगदान दिले हे सांगितले. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोटरीद्वारे केल्या जाणाऱ्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच देशभरातील साक्षरतेचा प्रसार झपाट्याने होत आहे. रोटरी क्लबचा वाटा त्यामध्ये मोठा आहे असे गौरोद्गार काढले, रोटरी क्लब, पुणे नॉर्थ येथून आलेल्या सर्व क्लब सदस्यांचे त्यांनी स्वागत केले. रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात रोटरी च्या समाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रकल्प प्रमुख सुनील कडलग यांनी कार्यक्रमा मागचा हेतू विषद केला. डॉ. प्रमोद राजुस्कर व नरेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले

 डॉ. संजय मालपाणी म्हणाले की, आपल्या मदतीद्वारे समाजातील प्रत्येक गरजवंताची गरज पुर्ण करायला मिळेल या भावेनतून रोटरी क्लब, संगमनेरतर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जातात यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सामावून घेतला जाईल याची काळजी घेतली जाते. रोटरी क्लब सदस्य  हे आधी करुन दाखवतात मग समाजाकडून ते करण्याची अपेक्षा ठेवतात. या टॅब वितरणाद्वारे रोटरीने उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या मुलांपर्यंत ही मदत पोहचवून संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी क्रांती आणली आहे. हेच विद्यार्थी भविष्यात संगमनेरचे नाव जगात उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व त्यांच्या पालकांनाही रोटरी क्लबचा नक्कीच अभिमान वाटेल. 

पुण्याहून खास आलेले या कार्यक्रमाचे पाहुणे कुमार शिनगारे यांनी शिक्षणासाठी गरजेच्या गोष्टींवर रोटरी क्लब लक्ष देत असून हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. आमच्या या प्रयत्नाला शासन स्तरावरुनही मदत होणे अपेक्षीत आहे अशी मागणी केली. रोटरी जिल्हा ३१३१ व ३१३२ यांनी एकूण एक कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पाद्वारे १५०० शैक्षणिक टॅब वितरित केले असल्याचे त्यांनी सांगितले.  

याप्रसंगी कॉम्पकीन या शैक्षणिक प्रणाली निर्मिती कंपनीचे संचालक बीरेन धरमसी उपस्थित होते. प्रकल्पासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दानदात्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषणकुमार नावंदर व संजय कर्पे यांनी केले तर आभार रो. योगेश गाडे  यांनी मानले.

ना.थोरात ,आ. तांबे यांच्याकडून १० लाखाचा निधी 

या कार्यक्रमास उपस्थित असलेले आ.डॉ. सुधीरजी तांबे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पाच लाख तर महसूलमंत्री ना.  बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकून दहा लाख निधी रोटरी ई - लर्निंग डिजिटल स्कूल टॅब साठी जाहीर केला आहे. संगमनेर रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनीही या प्रकल्पासाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या निधीमध्ये रोटरी  इंटरनॅशनल ५० लाख रुपये रुपयांचे योगदान देणार असून हा निधी एकूण ६० लाखांचा होणार आहे. त्यातून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक प्रकाशवाट निर्माण होणार आहे. या टॅब मध्ये कॉम्पकीन कंपनीचा इयत्ता पहिली ते सातवीचा अभासक्रम समाविष्ट आहे.

  शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारा रोटरीचा हा डिजिटल स्कूल टॅब प्रकल्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी आपण रोटरी व शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी मिटींग घडवून आणू , असाही मानस आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी

पीपल्स हेल्पलाईनची तमसतंत्र निब्बानची घोषणा

वेब टीम नगर :  सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने तमसतंत्र निब्बानची घोषणा करण्यात आली आहे. या तंत्राने उन्नतचेतनेचा प्रचार व प्रसार करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 स्वातंत्र्यानंतरचे ७३ वर्ष उलटून देखील भारतात सर्वसामान्य व्यक्ती दु:खी आहे. सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार व अनागोंदी वाढल्याने त्यांना जीवन जगणे कठिण झाले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र शिक्षणाने वरच्या स्तरावर गेलेल्या लोकांनी सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. तर स्वत:चे हित साधल्याने समाजात भ्रष्टाचार व अनागोंदी पसरली आहे. माणसामध्ये तमसचेतना फोफावत असताना शेतकरी, अल्पसंख्यांक, घरकुल वंचित व बेरोजगार या अनागोंदीचे बळी ठरत आहे. परिणामी समाजात दारिद्रय गरिब-श्रीमंताची दरी पसरत आहे. यासाठी तमसतंत्र निब्बान हा एकमेव पर्याय असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक व्यक्तीवर आई-वडील व समाजाकडून संस्कार घडत असतात. ज्या व्यक्तीत स्वार्थ, अप्पलपोटेपणा व कष्ट न करता दुसर्‍याचे मिळवण्याचा प्रयत्न सुरु असतो त्यामुळे तमसचेतना वाढत जाते. राज्यकर्ते मंडळी जात, पैशाचा वापर करून मागच्या दाराने सत्तेत येऊन समाजाची लूट करतात. हे लूट करणारे लोक आनंदी राहत नाही. तर त्यांचा लोभ देखील कमी होत नाही. धर्मांध व तमसचेतनेच्या आहारी गेलेले व्यक्ती दुसर्‍यांना दु:ख देण्याचे कार्य करतात व स्वत: देखील सुख हिरावून बसतात. धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ काढून स्वत:चे हित पाहतात. मनुष्याचे जीवन भौतिक व मानसिक दृष्ट्या सुखी होण्याची गरज असून, ते तमसतंत्र निब्बानाने साध्य होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर मधील व्ही आर डि ई बंद होणार असल्याने असंख्य कुटुंबे होणार उध्वस्त 

शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

वेब टीम नगर : संपूर्ण भारतात नगरचे नाव व्ही आर डी  ई  मुळे परिचित आहे . परंतु आता हि संस्था नगरमधील आपले युनिट बंद करून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहे .त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेली २००० हजार कुटूंबे उध्वस्त होणार आहे .तसेच याचा बाजारपेठ व अर्थ व्यवस्थावर मोठा परिणाम होणार आहे .तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून केंद्र सरकार च्या संरक्षण खात्याशी संपर्क साधून हि संस्था या ठिकाणाहून जाऊ नये यासाठी मार्ग काढण्यात यावा 

असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,माजी महापौर भगवान फुलसुंदर ,संजय शेडगे ,दत्ता कावरे ,सचिन शिंदे ,प्रशांत गायकवाड़ ,शाम नळकांडे ,विजय पठारे ,दत्ता जाधव ,संतोष गेनपा ,संग्राम कोतकर ,मुना भिगारदीवे ,संतोष तनपुरे ,बापूसाहेब बनकर ,अनिल निकम ,विशाल गायकवाड़ ,स्वप्नील ठोसर ,अक्षय नागपुरे आदी उपिस्थत होते 

केंद्र सरकारने जो स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे तो मागे घेण्यात यावा व हजारो कुटूंबे उध्वस्त होण्यापासून वाचवण्यात यावीत हि मागणी करण्यात आली . यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले कि या विषयावर लवकरच एक बेठक घेण्यात येईल. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळवून शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचे नांव उंचावले 

शिक्षणाधिकारी रामदास हराळ : स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड

वेब टीम नगर : येथील शिक्षिका स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ व मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, राजलक्ष्मी कुलकर्णी, छाया शेळके, लिना धसे, मोहिनी कुलकर्णी, नफीसा शेख, समीना खान, अंजुम खान, सोनवणे, चंद्रलेखा तिपोळे, सोहेल शेख, बापूसाहेब गायकवाड, राम पोटे, प्रविण उकिर्डे, पालवे आदि उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी रामदास हराळ म्हणाले की, अहिरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळवून शिक्षण क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचे नांव उंचावले आहे. जिल्ह्यात अनेक गुणवत्तापुर्ण शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात देखील शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांनी अहिरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक उपक्रमशील शिक्षक असल्याने गुणवत्तेचा आलेख वाढत असून, याचे श्रेय शिक्षकांना जात असल्याचे स्पष्ट केले. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार व महेंद्र हिंगे यांनी आपल्या मनोगतामध्ये अहिरे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालय येथील शिक्षिका असलेल्या स्वाती अहिरे यांना एकेएस एज्युकेशन अवॉर्ड२०२० चा ग्लोबल टीचर अवॉर्ड ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे नुकताच प्रदान करण्यात आला. यामध्ये ११० देशातील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यामधील दिडशे शिक्षकांपैकी अहिरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अहिरे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदि विविध क्षेत्रात केलेले कार्य, कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने दिलेले शिक्षणाचे धडे, विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये विविध कला-कौशल्य गुण विकसित करण्यासाठी शालेय स्तरापासून राज्य स्तरापर्यंत घेण्यात आलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘मिस इंडिया’ म्हणून निकिता पोटे हीची निवड

   वेब टीम नगर : येथील नामवंत माध्यम तज्ञ व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.विजयकुमार पोटे यांची पुतणी तसेच मुंबई पोलिसमध्ये असणारे संजयकुमार पोटे यांची कन्या कल्याण येथील निकिता संजयकुमार पोटे यांची राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस इंडिया’ म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच गोवा येथे मिस इंडिया ग्लोबल २०२० टॅलेंटिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने आयोजित स्पर्धेत निकिता हीने राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

     गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निकिताने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. अंतिम फेरीत ती पहिल्या पाच स्पर्धकांमधून प्रथम चमकली, आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार आहे. यापूर्वी तिला इंडियाज् नेस्ट टॉप मॉडेल वेस्टर्न झोन-2019 (महाराष्ट्र) म्हणूनही गौरविण्यात आले. गेल्या वर्षीच्या स्टिलीया इंडिया ती पश्‍चिम क्षेत्राची विजेती आहे.

     टॅलेंटिका ग्लोबल मिस इंडिया स्पर्धेसाठी तिला शिवा शरद क्रित, शुभम वर्मा, आई सौ.सविता पोटे आदिंचे मार्गदर्शन लाभले. केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना.रामदास आठवले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वसंत जगधडे, जि.प. प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका  सुनिता पोटे, ज्येष्ठ समाजसेवक व्यसनमुक्ती चळवळ निसार मास्टर, नरेंद्र पोटे, दादासाहेब पोटे, शिवाजी कांबळे आदिंनी अभिनंदन केले आहे.  तिच्या या यशाने कल्याण व नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

     निकिता ही कल्याण येथे राहत असून, तिचे वडिल मुंबई येथील कांजुर मार्ग पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेत. निकिता ही शिवाजीराव एस जोंधळे पॉलिटेक्निकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा विद्यालय, कल्याण येथे झाले आहे. तिचे आजोळ शेवगांवचे आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments