नगरटुडे बुलेटीन 06-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 06-01-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गावा-गावात मनसेचा झेंडा उभारणार

सचिन डफळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

    वेब टीम  नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच झगडत असते. मनसेच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गीही लागतात. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील प्रश्‍नांनाही मनसेने प्राधान्य दिले आहे. शेतमालाचे भाव, शेतीसाठी वीज, अशा अनेक प्रश्‍नांसाठी मनसेने लढा दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनाही मनसेच आपले प्रश्‍न सोडवून शकते, त्यामुळेच अनेक युवक मनसेमध्ये दाखल होत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरु झाली असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे आता गावपातळीवर काम करुन ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांनी अलटून-पालटून गावाची सत्ता उपभोगली आहे, परंतु गावातील परिस्थिती काही बदलली नाही. त्यामुळे युवकांना बरोबर घेऊन मनसेच्या गावा-गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे. नवीन पदाधिकारी हे गावागावात मनसे झेंडा उभारतील, असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी देवीदास कुलट, निंबळक विभाग अध्यक्षपदी निलेश सातपुते, नगर शेतकरी सेना तालुकाध्यक्षपदी देवीदास ढगे आदिंची नियुक्ती करुन जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व सचिव नितीन भुतारे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ढवळे, निलेश सातपुते, रवी कळमकर, निलेश कुलट, सतीश हारदे, अक्षय गाडेकर आदि आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्यावतीने नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच ठोस भुमिका घेऊन प्रश्‍न तडीस लावले आहेत. आता ग्रामीण भागातही प्रश्‍नांवर लक्ष केंद्रीत करुन युवकांना दिशा देण्याचे काम मनसे करेल. नवीन पदाधिकारी हे आपआपल्या भागातील प्रश्‍नांसाठी लढणारे आहेत, त्यांना पक्षाच्यावतीने ताकद देऊन पक्षात तरुणांना सामावून घेणार असल्याचे सांगितले.

     यावेळी चंद्रकांत ढवळे यांनी सर्वांचे स्वागत करुन आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुरस्काराने संस्थेच्या लौकिकात भर

नामदेवराव गाडिलकर : मनिषा वसंतराव बनकर सावित्री-फातिमा पुरस्काराने सन्मानित

    वेब टीम  नगर : महात्मा फुले एज्युकेशन संस्थेच्या सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्यध्यपिका  मनिषा वसंतराव बनकर यांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून   सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल, विचारधारा आणि जिज्ञासा अकादमी यांच्यातर्फे सावित्री- फातिमा पुरस्कराने गौरवण्यात आले, त्याबद्दल महात्मा फुले एज्युकेशन संस्थेच्यावतीने त्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव बेलेकर, सचिव नामदेवराव गाडीलकर, सुदाम मेहेत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     याप्रसंगी संस्थेचे वसंतराव बेलेकर म्हणाले, गत 24 वर्षे त्या या संस्थेमध्ये अविरत सेवा करत आहेत, अतिशय उपेक्षित, घरातील मुले अल्प उत्पन्न व गरजू गटातील आणि असाक्षर पालकांच्या मुलांना घडविण्याचे काम त्यांनी केले. विविध नवोपक्रम, अनेक स्पर्धा तसेच शाळाबाह्य स्पर्धेत, स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्यस्तरा पर्यंत बक्षीसास पात्र झाले आहेत.  त्यांच्या नियोजनबद्ध  मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थी सर्वांगीण विकास हे एकच ध्येय डोळ्या समोर ठेऊन त्या शालेय प्रशासनाबरोबर अध्यपणाचे पवित्र कार्य करत  आहेत.

     याप्रसंगी सचिव नामदेराव गाडिलकर म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. शिक्षकही या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग देत विद्यार्थ्यांची प्रगती साधत आहेत. मनिषा बनकर या मिळालेल्या पुरस्काराने संस्थेच्या लौकिकात भर पडली असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी केशवराव गाडीलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, मुक्ताताई गाडीलकर, चंद्रकला शिंदे, दोन्ही विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.  मनिषा बनकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. पारस कोठारी यांची सामाजिक जाणीवेतून वैद्यकीय सेवा कौतुकास्पद : ब्रिजलाल सारडा

वेब टीम  नगर : हिंद सेवा मंडळाचे सर्व पाधाधिकारी व संचालक शैक्षणीक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रातही उत्कृष्ठ कार्य करत आहेत. मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी यांनी गेल्या ३५ वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देत सेवा दिली आहे. हिंद सेवा मंडळाच्या संस्था व पेमराज सारडा महावियालयातील विद्यार्थांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी डॉ.पारस कोठारी गेल्या २५ वर्षापासून विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबवत आहेत. डॉ.पसार कोठारी यांच्या कडून सामाजिक जाणीवेतून होत असेलेली वैद्यकीय सेवा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.

हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष व भाईसथ्था नाईट स्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी यांनी वैद्यकीय सेवेची ३५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, पेमराज सारडा महाविद्यालयाचे अध्यक्ष  ॲड. अनंत फडणीस, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, सहाय्यक सचिव बी.यू. कुलकर्णी, सचिन मुळे, डॉ. सुजय कुमावत, डॉ. सहदेव मेढे, सुवर्णा देव व कैलास बालटे आदी उपस्थित होते.

       सत्कारास उत्तर देतांना डॉ. पारस कोठारी म्हणाले, हिंद सेवा मंडळा माध्यमातून अनेक वर्षापासून सर्वसामान्य विद्यार्थांना ज्ञानदान करत शैक्षणिक सेवा करता येत आहे. आयुष्यातील आतापर्यंतच्या वाटचालीत हिंदसेवा मंडळाचे मोठे योगदान आहे. वैद्यकीय सेवा देतांना सामाजिक दृतीकोन ठेऊन प्रॅक्टीस करत आहे. मंडळाच्या पदाधिकाऱयांनी  आज केलेला सन्मान माझ्या कार्याला प्रेरणा देणारा आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवराष्ट्र सेनेच्या दलित आघाडी जिल्हाध्यक्षपदी अनिल शेकटकर

    वेब टीम  नगर :  शिवराष्ट्र सेना पक्षाची पदाधिकार्‍यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांसह पक्षाच्या वाटचाली विषयी चर्चा झाली. प्रारंभी लालटाकी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या बैठकीस पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, व्यापारी आघाडी प्रमुख विजय पितळे, ओबसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, युवा प्रमुख संभूराजे नवसुपे आदि उपस्थित होते. याप्रसंगी पक्ष विस्ताराच्यादृष्टीने दलित आघाडीची स्थापना करुन जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांची नियुक्ती करुन पत्र देण्यात आले.

     याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. याच विचारातून शिवराष्ट्र सेना या पक्षाची स्थापना केली आहे. यासाठी विविध स्तरातील लोकांचे संघटन करुन समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून होत आहे. पक्षाच्या विविध आघाडीच्या माध्यमातून काम सुरु असून, पक्ष विस्तार होत आहे. आता दलित आघाडीची निर्माण करुन त्या माध्यमातून  दलितांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रधान्य देणार आहोत. जिल्हाध्यक्षपदाची अनिल शेकटकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी या पदाच्या माध्यमातून समाजातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देऊन त्याचे प्रश्‍न सोडवावेत. आम्ही सर्व त्यांच्या बरोबर राहू, असे सांगितले.

     निवडीनंतर अनिल शेकटकर म्हणाले, शिवराष्ट्र पक्षाचे समाज हिताचे कार्य पाहता आपण शिवराष्ट्र पक्षात सहभागी झालो असून, पक्षाच्यावतीने दलित आघाडी जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे पार पाडू. तसेच समाजातील लोकांच्या अडचणी सोडविण्यास आपले प्राधान्य असेल.

     याप्रसंगी बाळकृष्ण जगधने, सरपंच तुजारे, संदिप चांदणे, प्रा.जयवंत गायकवाड, सुनिल भोसले, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय घोडके, गणेश शेकटकर, विनोद घोरपडे, किरण वाघ, मयुर परदेशी, शुभम ठोकळ, किरण घोरपडे, प्रशांत क्षीरसागर, संतोष ठोकळ आदि उपस्थित होते. अनिल शेकटकर यांचे निवडीनंतर अनेकांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संसार सांभाळून कवितेचा छंद जोपासणे कौतुकास्पद

चंद्रकांत पालवे : रोहिणी उदास यांच्या दोन कविता संग्रहाचे प्रकाशन

    वेब टीम नगर : कवयित्री रोहिणी उदास यांच्या कवितांमधून अंत:प्रेरणेचे झरे कायम झरत असतात. त्यांच्या प्रसन्नचित्र स्वभावाने कवितासुद्धा आनंददायी होतात. भवतालात घडणार्‍या अनेक सत्य घटनांना त्या स्पष्ट करतात. निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांविषयीचा अभिमान त्या कवितेत व्यक्त करतात. संसार सांभाळून कवितेचा छंद जोपासणे कौतुकास्पद आहे, असे सांगून कवी चंद्रकांत पालवे यांनी  शुभेच्छा दिल्या.

कवयित्री रोहिणी शिरीष उदास यांच्या ‘तुझा विसर न व्हावा’ व ‘भवताल वेचतांना’ या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच मर्यादित मान्यवरांच्या उपस्थित  झाले. याप्रसंगी कवी चंद्रकांत पालवे, लेखक सदानंद भणगे, नंदलाल जोशी, सर्वोत्तम क्षीरसागर, शिला हककुंडे, पुष्पा चिंताबर, सरिता उदास, सुरेखा रुपमांगद, शरद गोडबोले, अ‍ॅड. चौधरी, सुषमा जोगळेकर, अमिता जोशी, भणगे, तांबडे आदि मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी लेखक सदानंद भगणे म्हणाले, कवितेला वयाचे कुठलेही बंधन नसते. ती एक उर्मी, स्फुर्ती असते. अशा अर्थपूर्ण, भावपूर्ण वैचारिक कविता आजकाल वाचायला मिळत नाही. त्यांच्या कविता गेय स्वरुपाच्या असून मनाला भुरळ घालतात. ‘तुझ्या विसर न व्हावा’ या संग्रहातून परमेश्‍वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. ते मानवाने मान्य करुन भक्तीभाव व मनी ठेवावा, असे त्या वेळोवेळी सांगतात.

     कवयित्री रोहिणी उदास मनोगतात म्हणाल्या, ‘स्वानंद’ वाचन मंडळातल्या माझ्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्या प्रोत्साहामुळे माझ्यातली कवयित्री घडत गेली. भवताल वाचण्याची आणि वेचण्याची एक नवी दृष्टी मिळाली, त्यामुळे कविता आकारत गेली.

     यावेळी काही भक्तीकाव्यांना चाली देऊन शुभांगी गोडबोल यांनी गोड आवाजात गाऊन दाखवल्याने कार्यक्रम आणखी बहारदार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष उदास यांनी केले तर आभार शिरिष उदास यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन  गुणवत्तेच्या, अध्यापनच्या कक्षा रुंदावाव्यात 

शिक्षणाधिकारी हराळ : बुद्धीबळ  प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या  शिक्षकांचा सत्कार

वेब टीम नगर : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व आंग्लभाषा तत्वज्ञ (औरंगाबाद) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार्‍या प्रोजेक्ट चेस प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या शहरातील शिक्षकांचा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ व मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार यांच्या हस्ते इटीएफचे प्रमाणपत्र वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्यसचिव महेंद्र हिंगे, प्रशिक्षिका स्वाती अहिरे, राजलक्ष्मी कुलकर्णी, छाया शेळके, लिना धसे, मोहिनी कुलकर्णी, नफीसा शेख, समीना खान, सोनवणे , तिपोळे, सुहेल शेख, अंजुम खान, बापूसाहेब गायकवाड, राम पोटे, प्रविण उकिर्डे आदि उपस्थित होते.

 इयत्ता ९ वी व १० वीच्या वर्गावर इंग्रजी विषय अध्यापन करणार्‍या शिक्षकांना चेसचे प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान व भाषिक कौशल्ये विकास यांचा समावेश या प्रशिक्षणात करण्यात आला. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवताना शिक्षकांना अध्यापन कक्षा रुंदवण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प 3 वर्षासाठी राबविण्यात आला. नगर मनपा  ब्लॉकअंतर्गत जवळ जवळ ७५  माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ वी व १० वीच्या वर्गावरील शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 शिक्षणाधिकारी रामदास हराळ म्हणाले की, बदलत्या युगाच्या प्रवाहाबरोबर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांनी देखील प्रशिक्षण घेऊन आपल्या गुणवत्तेच्या व अध्यापनच्या कक्षा रुंदवाव्यात. शिक्षण व अध्यापनाची परिभाषा बदलत असून, त्या दृष्टीने शिक्षकांनी देखील बदल स्विकारुन नवीन आव्हानांना सामोरे जाऊन संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.  

मोठ्या कष्टाने तीन वर्षाच्या कालावधीत सर्व शिक्षकांनी चेसचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या चेस प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र निवडश्रेणी व वरीष्ठ श्रेणीसाठी ग्राहय धरण्यात यावे, अशी मागणी बाबासाहेब बोडखे यांनी केली. तर यशस्वीपणे प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले. या प्रशिक्षणासाठी साठे सर, पठाण सर, मनपाचे माजी प्रशासनाधिकारी संजय मेहेर, पालवे आदिंचे सहकार्य लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱयांना निवेदन 

आरोग्य कर्मचार्‍यांना कार्यमुक्त न करता सरकारच्या भरती प्रक्रियेत सामील करुन घेण्याची मागणी

वेब टीम नगर : सरकारी आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना २९ डिसेंबर रोजी कार्यमुक्तीचे आदेश काढले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना सेवेतून काढून न टाकता, या कोरोना योध्दांना सरकारच्या भरती प्रक्रियेत सामील करुन घेण्याची मागणी केली. तर सदर मागणीचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, युनियनचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, भारती भोसले आदि उपस्थित होते.

जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शासनाच्या वरिष्ठ स्तरावर सदर प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. २९ जुलै रोजी झालेल्या कोरोनाच्या साथ रोगाच्या भरतीमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती. परंतु पाच महिन्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या या कोरोना योध्दांना कामावरुन कमी करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

कोरोनाचे संकटकाळात सेवा करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, जागतिक पातळीवर साथ रोगाची तीव्रता पाहता कोरणाचा दुसरा प्रकार येण्याची भिती असून, भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी हे आरोग्यसेवक प्रमाणिकपणे सेवा देतील म्हणून त्यांना कामावरुन कमी करु नये, जोपर्यंत जागतिक आरोग्य संघटना जाहीर करत नाही तोपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यसेवकांना कामावरून कमी करू नये, जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कुठल्याही भरतीत या कोरोना योध्दांना सामावून घ्यावे, सरळ सेवा भरती मध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्‍या अशा कोरोना योध्दांना प्राधान्यक्रम देण्यात यावा, कुठल्याही कर्मचार्‍यांचा कोरोनाच्या कामाचा भत्ता मिळालेला नसून, तो मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या पाहता कोरोनाची लस देण्यासाठी मोठा मनुष्यबळ लागणार आहे. या आरोग्य कर्मचार्‍यांचा विचार करुन त्यांना टीम लीडरची संधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 दोन माजी सैनिकांना हक्काच्या पेन्शनचा पुर्ण परतावा व वाढीव पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा


जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश : 30 वर्षापासून मिळत होती कमी पेन्शन

वेब टीम नगर : सामाजिक कार्यासह आजी-माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करणार्‍या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने दोन माजी सैनिकांना त्यांच्या हक्काची पेन्शनचा पुर्ण परतावा व वाढीव पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील तीस वर्षापासून प्रलंबीत असलेला प्रश्‍न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात यश आले आहे.  

देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील माजी सैनिक संपत कोरके व बापु साबळे यांची १९९० पासून पेन्शन कमी येत होती. सुमारे ३० वर्षे कमी पेन्शन त्यांना मिळाली. त्यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनकडे सदर प्रकरणी तक्रार मांडली व संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केली. फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी मागील एक महिन्यापासून या माजी सैनिकाची पेन्शनची कमी आलेली रक्कम मिळण्यासाठी देवदैठण येथील सेंट्रल बँक शाखेत पाठपुरावा सुरु केला. यासाठी पेन्शन प्रकरणाचे तज्ञ श्रीमंत जाधव (औरंगाबाद) यांनी विशेष मार्गदर्शन लाभले. कोरके यांना मागील थकीत रक्कम ४लाख ४१ हजार रुपये मिळाले आहे. तर दरमहा १८०० रू पेन्शन वाढली आहे. त्याचप्रमाणे बापू साबळे यांना २ लाख४५ हजार रुपयांची थकित पेन्शन मिळाली आहे.

दोन्ही माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे विशेष आभार मानले. माजी सैनिकांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, निवृती भाबड, संतोष मगर, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, शिवाजी गर्जे, संजय कौठाळे, संतोष शिंदे, महादेव शिरसाठ, भाऊसाहेब देशमाने, विठ्ठल लगड, संजय पाटेकर, भरत खाकाळ, कुशल घुले, बन्सी दारकुंडे, महादेव शिरसाठ आदिंसह संघटनेच्या सदस्यांनी प्रयत्न केले. तसेच माजी सैनिकांना पेन्शन  मिळण्यासाठी सहकार्याची भूमिका घेणारे सेंट्रल बँक रिजनल ऑफिस अहमदनगर व देवदैठण श्रीगोंदा शाखेतील पदाधिकारींचे फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती संभाजी महाराज कि जय घोषणेची दहा हजार पत्र  थोरातांना  पाठवणार 


नितीन भुतारे : मनसे चा अल्टिमेटम २६ जानेवारी पर्यंत पत्र पाठवणार 

वेब टीम नगर :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद चे नामांतर संभाजी नगर करा. अशी मागणी केली असुन त्या मागणीला मनसे नगर जिल्ह्याचा पाठिंबा आहे. हि मागणी जोर धरत असतांना  कॉंग्रेस चे प्रदेशअध्यक्ष्य तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर करायला कॉंग्रेस चा विरोध आहे अशी भुमिका घेतली असल्यामुळे जो महाराजांच्या नावाला विरोध करेल त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण  सेना सोडणार नाही. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल केले त्या औरंगजेबाच्या मागे कॉंग्रेस तसेच हे महाविकास आघाडी सरकार राहत असेल तर यांना सत्तेत राहण्याचा कुठलाच अधिकार नाही.  मतांच्या राजकारणा साठी जर कॉंग्रेस छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत असेल आणी तो विरोध नगर जिल्ह्यातुन बाळासाहेब थोरात करीत असतील तर मनसे शांत बसणार नाही. हिन्दु धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्याचे  नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष्य सुहास दशरते यानी जो २६ जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्टिमेटम  दिला. तो पर्यंत आज  ५ जानेवारी पासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयघोष पोस्टकार्ड वर लिहुन जिल्ह्यातून जवलपास दहा हजार पत्र बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर च्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहीती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे . 

या पत्र पाठवण्याचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ , ,नितीन भुतारे  गजेन्द्र राशिनकर,अशोक दातरंगे, अॅड अनिता दिघे , परेश पुरोहित,गणेश मराठे,संकेत व्यवहारे, अंबादास गोटीपामुल उपस्थीत होते

मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ  उपजिल्हाअध्यक्ष  मनोज राऊत, शहर अध्यक्ष गजेन्द्र राशिनकर तसेच अॅड अनिता दिघे , विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे पदाधिकारी आपल्या हाताने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जय घोष पोस्टकार्ड वर लिहुन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविणार आहेत.तरी सर्वानी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर व्हावे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्व हिंदु जनतेने सहभागी होउन पाठिंबा द्यावा असे अवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे.

पत्र पाठवण्याचा पत्ता 

  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संपर्क कार्यालय,यशोधन नवीन संगमनेर रोड, कारखाना परिसर, संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनेश भालेराव यांचा सन्मान

अथलेटिक्स असोच्या सहसचिवपदी तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोचे  प्रतिनिधी म्हणून निवड 

वेब टीम नगर : अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सत्कार केला.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध  झाली. नगर येथील दिनेश भालेराव  यांनी अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचा असणारा अनुभव लक्षात घेऊन त्यांना सहसचिव पदाची पुन्हा एकदा पुणे विभागातून संधी मिळाली आहे. नगर येथील वाडीया पार्क मैदानावरील ट्रॅक रेसर्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय प्राविण्यप्राप्त खेळाडू घडवण्याचे कार्य मार्गदर्शक दिनेश भालेराव यांनी केले आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर निवड होणारे दिनेश भालेराव हे पहिलेच प्रतिनिधी असून त्यांच्या रूपाने नगरच्या वैभवात भर पडली आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी कबड्डीचे राज्य मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव, सचिन काळे, विशाल गर्जे, नंदकुमार रासणे, दिपाली बोडखे, गौरव परदेशी, बाळासाहेब पवार उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रक्तदानाने एका गरजवंताला जीवदान दिल्याचे पुण्य मिळते

अ‍ॅड. धनंजय जाधव : जालिंदर बोरुडे यांनी ७२ वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी

वेब टीम नगर  :  नेत्रदान, अवयवदान सारख्या चळवळीत सक्रीयपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते  जालिंदर बोरुडे यांनी गेल्या पस्तीस वर्षात ७२ वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. बोरुडे यांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. गरजू व वंचित घटकातील रुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदूशस्त्रक्रिया शिबीरसह विविध आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना आधार देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न सुरु आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना आधार देण्यासाठी त्यांनी विविध आरोग्य शिबीर देखील घेतले.  

नुकतेच माळीवाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात रक्तदान करुन त्यांनी विक्रमी रक्तदानाचा आकडा गाठला. अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत जालिंदर बोरुडे यांनी मोठे योगदान दिले आहे. गरजू रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले रक्तदान प्रेरणादायी आहे. रक्तदानासारखे पुण्याचे कार्य दुसरे कोणते नसून, रक्तदानाने एका गरजवंताला जीवदान दिल्याचे पुण्य मिळत असल्याची भावना माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी ही जालिंदर बोराडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केल्याचे सांगितले. दिपक खेडकर, बाबासाहेब पटवेकर, राजेंद्र एकाडे, गणेश बनकर, नितीन डागवाले आदिंसह युवक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments