हॉटेलमधे कार्ड स्वाईप करताय ? ... जरा जपून

हॉटेलमधे कार्ड स्वाईप करताय ? ... जरा जपून 

बिल भरतांना ९५ हजाराचा गंडा 

वेब टीम पुणे : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन त्यातून ९४ हजार ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील  एका  हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे.

डिसेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवडच्या एका हॉटेल मध्ये ही घटना घडली. उमेश देविदास अन्वेकर (वय ३५ , राहणार- पिंपळे गुरव) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  केली होती. अन्वेकर आपल्या अन्य चार मित्रांसोबत चार डिसेंबर रोजी हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल भरण्यासाठी वेटरला डेबिट कार्ड दिले होते. मात्र थोड्यादिवसांनी त्यांतील तीन जणांच्या डेबिट कार्डमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिन्ही कार्डमधून अनुक्रमे, ५० हजार, २५ हजार आणि १९ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाला होता.

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात  हॉटेलच्या डेबिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिनमध्ये ‘स्कीमर’ लावण्यात आल्याचं आढळलं. ‘स्कीमर’मुळे मशिनमध्ये स्वाइप झालेल्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले जाते. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रविवारी हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे. त्याने अजून काही ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले आहे का याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. पण या घटनेमुळे हॉटेलमध्ये बिल भरण्यासाठी डेबिट कार्ड स्वाईप करताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचं स्पष्ट  झालंय.

Post a Comment

0 Comments