नगरटुडे बुलेटीन ०५-०१-२०२१

 नगरटुडे बुलेटीन ०५-०१-२०२१ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करण्याचे महान कार्य सावित्रीबाईनी केले

किरण काळे  : शहर जिल्हा काँग्रेसचा क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न  

वेब टीम नगर : तत्कालीन सनातन्यांचा विरोध झुगारून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे महान कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केले. त्यामुळेच एकविसाव्या शतकातील महिलांना आज शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

सावित्रीबाई जयंती दिनी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या महिला शिक्षण दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि शिक्षक काँग्रेस, महिला काँग्रेसच्या विशेष पुढाकारातून आयोजित क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी काळे बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान यावेळी काळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, डॉ.रिझवान अहमद, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, शिक्षक काँग्रेसचे नेते प्रसाद शिंदे सर, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, कौसर खान, उषा भगत, जरीना पठाण, डॉ.जाहिदा शेख, सेवादलचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, अन्वरभाई सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष चिरंजीव गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

काळे यावेळी म्हणाले की, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष शिक्षक, प्राध्यापक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 

ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, सावित्रीबाईंनी रूढीवादी प्रतिकूल परिस्थितीत धाडसी पाऊल उचलल्यामुळे स्री शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना समान अधिकार मिळाले. नलिनी गायकवाड म्हणाल्या की, महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवत स्वतःला घडवले.त्याचबरोबर समाजाला देखील दिशा दिली.

यावेळी प्रशांत जाधव, प्रवीणभैय्या गीते पाटील, अमित भांड, प्रमोद अबुज, रवी चांदेकर, निजामभाई जहागीरदार, ॲड.चेतन रोहोकले, अनंतराव गारदे, शंकर आव्हाड, उमेश शिंदे, नितीन शेलार, अजय मिसाळ, आसाराम पालवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद शिंदे यांनी केले. नलिनी गायकवाड यांनी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. आभार चिरंजीव गाढवे यांनी मानले.

क्लेरा ब्रुसला ऐतिहासिक दर्जा द्या - काळे

सावित्रीबाई फुले यांनी नगर शहरातील क्लेरा ब्रूस हायस्कूलमध्ये काही दिवस राहून शैक्षणिक पद्धतीचे अध्ययन केले होते. या घटनेचा संदर्भ देत जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी क्लेरा ब्रुस हायस्कूलला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्याची मागणी यावेळी बोलताना केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षण दिनानिमित्त फिरोदिया प्रशालेत ई-वाचनालयाचा प्रारंभ- मुख्याध्यापक विजय कदम

वेब टीम नगर : सावित्री बाई फुले यांनी  मुलींसाठी ज्ञानाची दारे खुले केले आणि मुलींना  शिक्षण सुरु करण्यासठी अथक प्रयत्न घेतले. शिक्षणाची महत्वाकांक्षा मुलींमध्ये रुजविण्याचे महान कार्य सावित्री बाई फुले यांनी केले आणि त्यांचे कार्य हे समाज परिवर्तनाचे आहे, असे मत श्री.कदम यांनी व्यक्त केले.

          तसेच ३ जानेवारी हा   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  शिक्षण दिन म्हणून प्रशालेत साजरा करण्यात आला . या प्रसंगी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ज्ञानात भर पडावी, शिक्षणाबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीम.छायाताई फिरोदिया, अ.ए. सोसायटी विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनातून प्रशालेत ई-वाचनालयची सुरुवात करण्यात आली . त्याद्वारे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्याना विविध गोष्टींच्या पुस्तकातून ज्ञान मिळविण्यासाठी सुलभता निर्माण होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रशालेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. 

         या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कदम,पूर्व प्राथमिक वर्गाच्या इनचार्ज सौ.मिनाक्षी सोनवणे यांनी सर्व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

         कार्यक्रमाचे आयोजन विशाल तांदळे , प्रसाद शिंदे, पराग विलायते, शरद कातोरे तसेच सर्व शिक्षक, पूर्व प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका , सेवकवृंद यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाकळे  स्पोर्ट्स अकॅडमीमूळे नगरच्या वैभवात भर  

 महापौर बाबासाहेब वाकळे : अद्यावत  चार बॅडमिंटन कोर्टचे  पूजन 

वेब टीम नगर :  सदृढ  व आरोग्यदायी शरीरासाठी खेळ मग तो कोणताही असो त्याचे महत्व अनन्यसाधारण असून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रोज किमान एक तास तरी व्यायामासाठी  काढावा जेणे करून आपले आयुष्य या माध्यमातून आनंददायी वं अधिका - धिक मौल्यवान होण्यास मदत होईल असे मत  महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले. 

 .नगरच्या बालिकाश्रम रोडवर एल अँड  टी रिक्रिएशन क्लब  जवळ व पूर्णा हॉटेलं समोर अद्यावत अश्या चार बॅडमिंटन  होवा कोर्टची संदीप व सतीश दत्तात्रय वाकळे  पा. या भावंडानी निर्मिती केली असून कोर्टवर ८ एम. एम. चे रबर मॅट अंथरण्यात आले असून त्यावर ४ एम .एम चे होवाचे आवरण देण्यात आले आहे .राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी असे कोर्ट वापरण्यात येते. संचालक संदीप व सतीश यांच्या मातोश्री सुमनताई दत्ताञय वाकळे  यांच्या हस्ते .विधिवत औपचारिक कोर्टाची पूजा करण्यात आली. या प्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पहिला नारळ वाढवून  हे कोर्ट खेळाडूंसाठी खुले करण्यात आले.

यावेळी  प्रशिक्षक विजय पवार ,  शीतलताई वाकळे . शिवाजी राव डोके ,रामानंद राय,धीरज सिंग ,श्रीकांत सावंत ,विकास आंब्रे ,संदीप पिंपरकर,,राहुल मोटे, विकास मोटे किरण बोरूडे ,,राहुल गांधी ,राहुल ,महेश ,सुरज वाकळे .व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील मध्यवर्ती भागात विषेशतः  सावेडी येथील क्रीडाप्रेमींसाठी हे संकूल जवळ असून अतिशय अद्यावत देखील आहे .संदीप व सतीश वाकळे यांनी या कोर्ट विषयी माहिती देतांना सांगितले की हे कोर्ट नवोदित व प्रोफेशनल खेळाडूंसाठी उपलब्ध ठेवण्यात आले असून दिवसभर  खेळासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-.सुविधा येथे उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. उदयोन्मुख खेळाडूंसाठी ज्यांना येथे बॅडमिंटनचे प्रशिक्षण हवे असेल त्यांच्या साठी रोज दुपारी ४ नंतर   प्रशिक्षक विजय पवार  सराव घेणारं असून इच्छुकांनी मो .नं .९८२३२३४०३९ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे .

या व्यतिरिक्त या कोर्टच्या शेजारीचं जिमचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच क्रीडा प्रेमींसाठी ते सुरु होईल,या व्यतिरिक्त भविष्यात फुटबॉल .स्केटींग रींग ,हॉलीबॉल खेळ या परिसरात सुरु करण्यात येणार आहे. क्रिकेटसाठी टर्फ विकेटची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती दिली व आमच्या या स्पोर्ट्स अकॅडमीला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले .विजय पवार यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पारायणाने मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होतात 

 हभप रामदास महाराज क्षीरसागर : तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने पारायण सोहळ्यास प्रारंभ

   वेब टीम नगर :  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन श्री संताजी महाराजांच्या आशिर्वादाने ट्रस्टच्या वतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजात जागृती होत असून, समाजाला दिशा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. अध्यात्म हा प्रत्येकाचा स्थायीभाव असतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अखंड गाथा पारायणाने आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होतात. ट्रस्टच्या वतीने खंड पडू न देता सुरु असलेला हा पारायण सोहळा भाविकांची आध्यात्मिक भूक भागविणारा आहे. सध्या भैतिकसुख असूनही, मनुष्य दु:खी आहे, या दु:खातून बाहेर काढण्याची ताकद अध्यात्मात आहे.  भगवंताचे नामस्मरणातून आत्मशुद्धी होत असल्याने प्रत्येकाने पारायण केले पाहिजे, असे प्रतिपादन हभप रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.

     तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पारायण सोहळ्याचे उद्घाटन हभप रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ट्रस्टच्या उपाध्यक्षा निता लोखंडे, विश्‍वस्त प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, सागर काळे, गोकूळ कोटकर, विजय दळवी, कृष्णकांत साळूंके, वसंत शिंदे, किसनराव क्षीरसागर, बाबूराव लोखंडे आदि उपस्थित होते. दिपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन, प्रतिमा पूजन, ग्रंथपूजन करण्यात येऊन तुकाराम महाराज अखंड गाथा पारायणास प्रारंभ करण्यात आला.

     यावेळी उपाध्यक्षा निता लोखंडे म्हणाल्या, सालाबादप्रमाणे यंदाही संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाथा पारायणाचे दि.४ते १० रोजी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दररोज पारायण, नामजाप, हरिपाठ होऊन सोमवार दि.११ रोजी काल्याचे किर्तन होऊन संताजी महाराजांच्या मूर्तीची पूजा व आरती होऊन पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे पालखी मिरवणुक, महाप्रसादच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन पार पाडले जाणार आहेत. तरी समाजातील बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

     याप्रसंगी प्रकाश सैंदर म्हणाले, यावर्षी समाज मंदिरातील तुळजाभवानी देवी मूर्तीला ५० वर्ष पूर्ण झाले असून, त्यानिमित्त संपूर्ण गाभार्‍यात गोल्डन कोटींग पॉलिश, पितळे मेटल बसविण्यात आले आहे. यावर एम्बॉसिंग करुन सुंदर नक्षीकाम केले आहे. या कामी दामोदर नाळके व आशिष नाळके यांचे सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे मंदिरातील चेहरा-मोहरा बदलला आहे. मंदिराच्या कार्यात समाज बांधव योगदान देत असून, त्यामुळे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमास अध्यक्षा सुनंदा नागले, सचिन शेंदूरकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर आदिंसह ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद सप्ताह यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद शिंदे यांनी केले तर आभार गोकूळ कोटकर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिला  शिक्षिका सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवत आहेत 

नगरसेविका सुवर्णा जाधव : महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने महिला शिक्षिकांचा सन्मान

    वेब टीम नगर : ज्या काळात स्त्रीयांनी शिक्षण घेणे पाप मानले जात, अशा रुढी-परंपरेच्या जोखडात जगणार्‍या समाजात स्त्रीयांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना तेवढ्याच ताकदीने साथ देणार्‍या सावित्रीबाई फुले या आजच्या स्त्रीयांचे खरे प्रणेते आहेत. आजच्या शिक्षिका या सावित्रीबाईंनी सुरु केलेल्या स्त्री शिक्षिकेचा वारसा पुढे चालवत आहेत. शिक्षक पिढी घडविणारा, समाजाला दिशा देणारा असतो. शिक्षणातूनच एक सुदृढ समाज निर्माण होत असतो. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हे ब्रीद त्याकाळी सत्य होते आणि आजही सत्य आहे. घरातील एक मुलगी शिकली तर कुटूंब आणि पुढील अनेक पिढ्या या शिक्षित होत असतात. स्त्री शिक्षणाची सावित्रीबाई फुले यांनी दिलेली देणगी महिलांसाठी एक वरदान रुपी आहे. स्त्री शिक्षणाचा हा दिवा तेवत ठेवण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले.

     अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमिव महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रा.डॉ.स्मिता भुसे, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेनप्पा, नगरसेविका सुप्रिया जाधव, पुष्पा बोरुडे, मंगलताई लोखंडे, प्राची कळमकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल, डॉ.अमोल जाधव, मंगल जाधव, स्नेहल जाधव, अंजली जाधव आदि उपस्थित होते.

     यावेळी महिला शिक्षका ज्योती नागवडे, माधुरी कांडेकर, प्रतिभा हराळ, नंदा हासे, अनुराधा आचार्य, मनिषा गांगर्डे, सुनिता काटे, आशा ढोले, मंगल भुजबळ, निर्मला व्यवहारे, सुनंदा करपे, सुरेखा नजान, कल्याणी टिक्कल, मंगल पवार, अनिता बेरड, संगीता देशपांडे, विद्या झरकर, रोहिणी आडेप, मंदाकिनी उंडे, शिल्पा गायकवाड, कल्पना पंडित, कविता लिंगायत आदिंसह आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुषमा पडोळे यांचा फेटाबांधून, स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

     याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी  स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.  त्यांच्या या कार्याने समाजात मोठे परिवर्तन घडले आणि स्त्रीया शिकल्या व आपल्या कर्तुत्वाने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. फुले दाम्पत्यांचे कार्य आपणा कायम प्रेरणादायी राहील. समता परिषदेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक विविध उपक्रम राबविले जात असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षक दिन साजरा करण्याच्या केलेल्या घोषणेनुसार या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

     या कार्यक्रमात प्रा.स्मिता भुसे म्हणाल्या, ज्या काळात मुलींना शिक्षण देणे हा धर्मद्रोह मानला जात होता, त्या काळात मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्या त्यागाची प्रचित म्हणून आज स्त्रीया समाजात सन्मानाने जीवन   जगत आहेत. असे सांगून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचे विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले.

     कार्यक्रमास सरस्वती हॉस्पिटल, शहर शिवसेना यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा.पारुनाथ ढोकळे, विशाल गायकवाड, बबलू लोळगे, लालू गोरे, आदेश जाधव, विकास सपाटे, भगवान काटे, ईश्‍वर नागवडे, नवनीत गायकवाड, प्रशांत गांगर्डे, सोमनाथ नजन, विजय कांडेकर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले तर आभार डॉ.अमोल जाधव यांनी मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे 

 डॉ.रेश्मा चेडे : चेडे  हॉस्पिटल व मखदुम सोसा.च्या महिलांसाठीच्या शिबीरास प्रतिसाद

वेब टीम नगर :  संसारासाठी पती-पत्नी दोघेही आज नोकरी-व्यवसायामध्ये काम करुन हातभार लावत आहेत. यात पत्नीची गृहिणीची भुमिकाही महत्वाचे असल्याने अनेक जबाबदार्‍या या स्त्रीयांवर पडत असतात. नोकरी, व्यवसाय, घर, मुले अशा विविध जबाबदार्‍या सांभाळतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे सुरुवातीच्या छोट्या-छोट्या दुखण्याचे कालांताराने मोठ्या आजारात रुपांतर होत असते. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहून आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास महिलांचे आरोग्य सुदृढ राहू शकते. फास्ट फूड, अवेळी जेवण, ताण-ताणव यामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारे वेळकाढूपणाने नंतर जास्त त्रास होतो. त्यासाठी सुरुवातीपासून उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो. मुळव्याध उद्भवू नये यासाठी काही पथ्य पाळल्यास त्याचा त्रास कधीच जाणवणार नाही, असे प्रतिपादन डॉ.रेश्मा चेडे यांनी केले.

     सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चेडे अ‍ॅक्सिडंट अ‍ॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने मोफत मूळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन शिबीरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, रुग्णमित्र नादीर खान, आरिफ सय्यद, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, संगीतप्रेमी अमिन धाराणी, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान, डॉ.वाजिद अली, बाळकृष्ण सुरकुटला, अमिर अली धाराणी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.संतोष चेडे म्हणाले, स्त्री शिक्षणातील सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांसाठी वरदान ठरले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

     प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मखदुम सोसायटीच्या उपक्रमांची माहिती देऊन या शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गायकवाड यांनी केले तर आभार निकिता वाबळे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी कोमल म्हस्के, शैला समुद्रे, राजेंद्र अडागळे, रजिया सय्यद, सुशिला धोंडे, अनिता कदम आदिंनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कृतीतून भगवंताची सेवा होईल, असेच कार्य केले पाहिजे

 प्रकाश महाराज बोधले : जेऊर येथे श्री दत्तजयंती निमित्त श्रीमद् भागवत कथा उत्साहात 

    वेब टीम  नगर : आपल्या अनेक संतांनी देवच्या विविध रुपाचे दाखले दिले आहे. आपल्या कार्यातून भगवतांची सेवा करावी,  आपले सत्कर्मच आपले प्रारब्ध आहे. आपले सत्कर्मच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जात असते. त्यामुळे कृतीतून भगवंताची सेवा होईल, असेच कार्य केले पाहिजे. मोहरुपी जीवनात अनेक सुख-दु:खाचे प्रसंग येतात. भगवतांच्या नामस्मरणातून आपली जीवननैय्या पार होत असते.  महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्वल परंपरा आहे. महानुभव, नाथ, वारकरी, समर्थ, दत्त संप्रदाय. ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करतात. गाणगापूर, गिरनारपर्यंत विविध अवतारांची विस्तृत माहिती आपल्या किर्तनातून वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी उपस्थित भाविकांना दिली.

     जेऊर येथे श्री सिद्धनाथ बहुउद्देशीय संस्था, श्रीपाद सेवा मंडळ व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने श्री दत्तजयंती निमित्त श्रीमद् भागवत कथा नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. काल्याच्या किर्तनप्रसंगी भाविकांना वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी संबोधित केले यानंतर काल्याची हंडी फोडण्यात आली. याप्रसंगी हभप अनिल महाराज वाळके (प्रदेशाध्यक्ष), हभप सुदाम महाराज दारकुंडे (नगर तालुका कोषाध्यक्ष), हभप अतुल महाराज आदमाने, ओमप्रकाश जाधव (दत्त मंडळाचे अध्यक्ष), हभप विश्‍वनाथ शिंदे महाराज, सुभाष पवार, डॉ.बापू तवले, भानुदास मगर, संपत काळे, नामदेव तवले, गोरक्षनाथ वाणी, बाळासाहेब बेलेकर, राजेंद्र बनकर आदि उपस्थित होते.

     या सप्ताहादरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पं.स.सदस्य गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, अनिल दिवेकर, संजीव पवार, राजेंद्र पवार, बंडू पवार, अंकुशराव जामदार, बंडूनाना दिवेकर, पांडूरंग सुपेकर, दादासाहेब जामदार, नानासाहेब पवार, डॉ.समर रणसिंग आदिंनी हजरे लावली.

     या सप्ताहा दरम्यान भागवताचार्य अतुल महाराज आदमाने यांनी श्रीमद् भागवत कथेचे निरुपण केले. तसेच हभप महादेव महाराज शिरसाठ, हभप प्रकाश महाराज, हभप कृष्ण महाराज गागरे, सुनिल महाजन आदिंचा भक्तीरसाचा कार्यक्रम झाले. तसेच हभप अनिल महाराज वाळके यांचे हरिकिर्तन झाले. यावेळी हभप रोहिदास महाराज जाधव सौ.कलावती जाधव यांचा हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

     सप्ताह यशस्वीतेसाठी शिवाजी जाधव, ओम जाधव, कल्याण जाधव, सोमनाथ शिंदे, राजू पेहेरे आदिंसह श्री सिद्धनाथ बहुउद्देशिय संस्था, श्रीपाद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सप्ताहादरम्यान जेऊर पंचक्रोशितील भाविक श्रीमद् भावगत कथेचा लाभ घेतला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांनीच महिलांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा : धनंजय जाधव

    वेब टीम  नगर : सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे आहे, ज्या काळात मुलींना शिक्षण देणे वर्ज्य  मानले जात होते. त्या काळात त्यांनी समाजाचा विरोध डावलून मुलींना शिक्षण दिले. त्यामुळेच आज महिला मानाने जगू लागल्या. त्यांच्या या त्यागाची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे. प्रत्येकाने समाजात काम करतांना महिलांना मानाचे स्थान दिले पाहिजे. महिलांनीही महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेऊन उन्नत्ती साधावी, असे प्रतिपादन साई द्वारका ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले.

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना माजी नगरसेवक धनंजय जाधव, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राजाभाऊ एकाडे, भारत जाधव, नितीन डागवाले, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी दत्ता गाडळकर म्हणाले, महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील कार्य आजही दिशादर्शक असेच आहे. महाराष्ट्र शासनाने ३ जानेवारी हा महिला शिक्षिका दिन म्हणून जाहीर केला आहे. लक्षात घेता आता त्यांना भारतरत्न किताब देऊन गौरव करण्यात यावा, अशी सर्वांचीच मागणी आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहराचे नांव बदलण्याची भाषा करणार्‍या खासदाराने जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले? 

साहेबान जहागीरदार : पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्याचे ढोंग करणार्‍या लोकप्रतिनिधीने शहराचा इतिहास समजून घ्यावा

वेब टीम नगर : अहमदनगर शहराचे नांव बदलण्याची भाषा करणारे खा. सदाशिव लोखंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले? ते सांगावे. एका लोकप्रतिनिधीने बेरोजगारी, कोरोनाचे संकट, शेतकरी प्रश्‍न आदि ज्वलंत प्रश्‍न सोडून अशा पध्दतीने चुकीचे विधान करणे हे हास्यास्पद असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  खा.  लोखंडे यांना टोला लगावला आहे.

अहमदनगर शहराचे नांव बदलण्याची मागणी करुन खा. लोखंडे यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. तर अहमदनगर शहराच्या नामांतरावरुन सुरु करण्यात आलेले जातीयवादी राजकारण खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात कणखर भूमिका घेऊन राज्याला योग्य दिशा  दिली. त्यांचा चेहरा व पक्ष पाहून नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत लोखंडे यांना दुसर्‍यांदा खासदार  होण्याची संधी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहराचे नांव बदलण्यावरुन कोणी राजकारण करु नये, असे बजावले असताना शिवसेनेचे खासदार यांनी हा चुकीचा मुद्दा उपस्थित करुन दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम केले आहे. आपल्या मतदार संघात किती वेळ थांबून जनतेचे प्रश्‍न सोडविता? याचे उत्तर देखील त्यांनी द्यावे. नागरिकांची जिल्हा नामांतरची नव्हे तर विकासाची भावना असून खासदारांना ही भावना कशी कळली नाही? केंद्रात जाऊन खासदार लोखंडे भाजपची भाषा बोलू लागले असल्याचा आरोप जहागीरदार यांनी केला आहे.

अहमद निझामशाहने अहमदनगर शहराची स्थापना केली. शहराला पाचशे वर्षापेक्षा जास्त कालावधीचा मोठा इतिहास आहे. अहमद शहाने हे  शहर विकासात्मक दृष्टया इतके सुंदर बनवला होते  की, कैरो, बगदाद सारख्या शहराशी अहमदनगरची तुलना होत असे. मात्र मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्याचे ढोंग करणार्‍या लोकप्रतिनिधीला हा इतिहास माहित नसणार. जिल्ह्यातील जनता सूज्ञ असून, अशा चुकीच्या राजकारणाला बळी पडणार नसल्याचे जहागीरदार यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 लाईट हाऊसची घरकुल वंचितांसाठी बांधणी करण्याची मागणी

सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्या वतीने : सावित्रीबाई फुले यांना  उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्णा मानवंदना

वेब टीम नगर : भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाइन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकित सावित्रीबाई फुले यांना उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्णा अशी मानवंदना देण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सादर केलेल्या लाईट हाऊसची बांधणी करण्याची मागणी करण्यात आली.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, फरिदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखूबाई बोरगे, शशीकला गायकवाड आदिंसह महिला उपस्थित होत्या.

घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी निंबळक येथील पड जागेवर आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक गुंठ्याचे २३० प्लॉट पाडण्यात आले आहे. प्रत्येकी एक गुंठा भूखंडावर घरकुल वंचितांची घरे बांधण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने मांडलेल्या व नव्याने उपलब्ध असलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा फायदा नगरच्या घरकुल वंचितांना मिळावा. तसेच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे अनुदान सुद्धा मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे एक गुंठा प्लॉट वर दोन घरकुले होऊ शकणार असल्यामुळे बांधकामाचा खर्च फार कमी येऊन मोठ्या संख्येने घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

 स्त्री शिक्षणाची चळवळ साकारत असताना सावित्रीबाई फुले व नगरचे नाते जोडले गेले आहे. त्यांनी नगरला येऊन मिशनरीच्या वतीने मुलींना दिल्या जाणार्‍या शिक्षणाची माहिती घेऊन, पुढी स्त्री शिक्षणाची चळवळ भारतभर पसरवली.  स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी स्त्रीमुक्ती आंदोलन यशस्वी केले. त्यामुळे हा सन्मान त्यांना देण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पूर्वी उन्नतचेतनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदि समाजसुधारकांनी कार्य केले. मात्र सध्या देशात उन्नतचेतनेचा अभाव असल्याने गोर-गरीबांसाठी असलेल्या अनेक योजना मोडीत निघाल्या आहेत. घरकुल वंचितांचा प्रश्‍न देखील रेंगाळत पडला आहे. भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे विकास खुंटला असून, ते फक्त बोलघेवडे ठरले आहे. महात्मा फुले यांच्या काळापासून त्रस्त असलेला शेतकरी भज्ञाकभ्रांत नेत्यांमुळे आजही आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीत जखडलेला असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांनी केला. तर समाजात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले अशा उन्नतचेतनावादी व्यक्तीमत्वांचे विचाराने बदल घडणार असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगारच्या ऊर्जा बाल भवन मधील महिला शिक्षकांचा गौरव

सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थिनींनी वेधले लक्ष

वेब टीम नगर : भिंगार शहर फुले ब्रिगेड व भाजपच्या वतीने स्नेहालय संचलित भिंगारच्या ऊर्जा बाल भवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरी करण्यात आला. बालभवनच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या धडे देणार्‍या महिला शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.  

भिंगार शहर फुले ब्रिगेड अध्यक्ष व भाजप उपाध्यक्ष संतोष हजारे यांच्या यांच्या पुढाकाराने ऊर्जा बाल भवनात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बालभवनच्या प्रकल्प अधिकारी शबाना शेख, ऊर्जा बालभवनच्या  शिक्षिका निलोफर शेख, गुलनाज सय्यद, सुकन्या नायडू, अंजुम शेख, निकिता गवळी आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषा परिधान करुन कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले.

संतोष हजारे म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान व त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाचे स्वागतार्ह आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली फुले ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रीडा संकुल शुल्क निर्धारण निश्‍चिती करणार -क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया

क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार लगाम : पन्नास टक्क्यांपेक्षा शुल्क होणार कमी

वेब टीम नगर : विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित व्हावी, खेळाच्या कौशल्यपूर्ण सरावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तयार होण्यासाठी तालुका ते विभागीय क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली. खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून विविध खेळ संघटना तसेच क्रीडा मंडळांना सशुल्क शासन निर्णयाधिन राहून मैदाने वापरासाठी देण्यात आली. पण अनेक क्रीडा संकुलात खेळाडू हितापेक्षा व्यावसायिकतेला महत्व दिले जात असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत असल्याचे क्रीडा आयुक्त यांचे लक्षात आणून दिले असता सर्व जिल्ह्यातील क्रीडा संकुलात शुल्क निर्धारण निश्‍चित करून खेळाडूंना न्याय देण्याबाबतच्या अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर यांच्या मागणीचा तातडीने विचार करून सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणा बाबत आदेशित केले जाऊन वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल, तसेच मुलींना नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याचे आश्‍वासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी दिले.

क्रीडा आयुक्त यांचे सोबत बालेवाडी पुणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकार्‍यां सोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी क्रीडा आयुक्त बकोरिया बोलत होते. मैदाने,कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणी संदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड-एमपीएड-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती देणे बाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले. खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परीषदेवर ५० टक्के शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावे या मागण्या महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मांडल्या. आठवी पर्यंतच्या खेळाडूंना मैदानावरील प्रवेशशुल्क व फी माफी अमंलबजावणी बाबत सहसचिव विलास घोगरे यांनी बाजू मांडली तर क्रीडा स्पर्धा विषयी महामंडळाचे निवृत्ती काळभोर व फिरोज शेख यांनी काही सुधारणा सूचविल्या. खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्यासंदर्भात दिरंगाई होत असून लवकरात लवकर मैदाने खुली करावीत या बाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. बैठकीत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही करण्या बाबतचे निर्देश क्रीडा आयुक्तांनी दिले.

बैठकीस उपस्थित सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक अनिल चोरमले, सहाय्यक संचालक सुहास पाटील, विजय संतान, अरूण पाटील यांनी शासन योजना व नियमावली या बाबत माहिती दिली. या बैठकीस दत्तात्रय हेगडकर, महादेव फाफाळ, बाबूराव दोडके, शेखर कुदळे आदी उपस्थित होते. फीट इंडिया अंतर्गत शाळांच्या नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून, सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्रीचे शिक्षण झालेल्या क्लेराब्रूस शाळेचे संवर्धन व्हावे 

 कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे : मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन च्या वतीने वारसा सावित्रीचा पुरस्काराने  सन्मान

वेब टीम नगर :  मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जयंती निम्मित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या सहा सावित्रीच्या लेकींनां वारसा सावित्रीचा पुरस्कार देवून जेष्ठ शिक्षण तज्ञ व माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  यावेळी विशेष सरकारी वकील ॲड.मनीषा केळगेंद्रे - शिंदे, मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, संध्याताई मेढे,‌ रुपाली वाघमारे, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, संजय कांबळे, रेव्ह. जे.आर.वाघमारे, अंकम साहेब, जॉन खरात, कमलाकर देठे, प्रतिक बारसे, विठ्ठल महाराज कोतकर, दिलीप काकडे, सत्यशील शिंदे, रवि गायकवाड, दिपक गायकवाड, राजू धोत्रे, राजेंद्र सातपुते, लियाकत सय्यद, डॅा. विजय साळवे, जग्गू गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावित्रीच्या विचारांचा वारसा जपत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना वारसा सावित्रीच्या पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, यामध्ये सेंट सेव्हींअर्स शाळेमध्ये शिक्षिका प्रतिभा दिलीप काकडे, पोलिस विभागामध्ये अनिता किसन गुरवे, पत्रकारिता क्षेत्रात  प्रियांका ज्ञानदेव पुंड, आरोग्य क्षेत्रात सुवर्णा समीर दळवी,  विधीसेवा मध्ये ॲड. बेबी विलास बोर्डे व योगाचे धडे देणाऱ्या योग शिक्षिका ज्योती प्रभाकर शिरसाठ यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी  अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शिक्षण तज्ञ व माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले कि भारतातील आद्य मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. उपेक्षित महिलांचे शिक्षण व अन्याय, अत्याचार, अनिष्ठ रुढींच्या विरोधात अखंड संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आद्य समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पुढे नेले. त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या. तेथेही अध्यापक करीत देवदासी पद्धत बंद करणे, बालविवाहाला बंदी करणे केशवपनाची पद्धत बंद करणे, विधवा विवाहाला असलेल्या बंदीविरुद्ध सामाजिक जागृती करणे इत्यादीच्या परिवर्तनासाठी त्यांनी सामाजिक जागृती केली. त्यांनी समाजप्रबोधन करण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी कविता रचल्या. त्यांच्या काव्याचे विषय सामाजिक आहेत. त्यात जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्व, विधवा विवाह, बालविवाह, शूद्रा अतिशूद्रांसाठी शिक्षण देत होते. सावित्रीबाई समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत गद्य,पद्य, पत्रे, भाषणे आणि गाणी इत्यादींच्या माध्यमातून विचार मांडत होते. उपेक्षित स्त्रिया, कामगार आणि समाजातील खालच्या स्तरातील घटकांना अज्ञान व दारिद्रयाच्या अंधारातून बाहेर काढणे,त्यांना स्वाभिमान व स्वावलंबी बनविणे,त्यांच्यावर होणारे समाजिक अन्याय,अत्याचार दूर व्हावेत, अंधश्रद्धा, रुढी नष्ट होऊन त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून निर्माण व्हावा. यासाठीच सावित्रीबाईंनी देह व लेखणी झिजवली.

त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना फक्त स्त्री शिक्षिका या चाकोरीतून बघण्यापेक्षा तिच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेणे आजच्या स्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे स्त्री शिक्षिका सोबतच इतर क्षेत्रातील महिलांचाहि वारसा सावित्रीचा पुरस्कार देवून गौरव होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत मानवाधिकार अभियान चे अभिनंदन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी सुरवातीचे शिक्षण ज्या मराठी मिशनच्या क्लेराब्रूस शाळेत घेतले त्या शाळेचे संवर्धन व्हावे असे त्यांनी आवर्जून सांगितले व यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशेष सरकारीवकील ॲड.मनीषा शिंदे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे व सावित्रीबाईंनी महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याची दिशा देऊन महिलांना सन्मान दिला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली व या कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. संतोष गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार रुपाली सॅम्युअल वाघमारे यांनी केले. तर पुरस्कार मिळालेल्या महिलांनी सत्काराला उत्तर देत म्हणाले की पुरस्काराने आम्हाला लढण्याचे बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बचत गटामुळे महिलांची प्रगती 

गव्हाणे : नेप्तीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान

वेब टीम नगर : नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर गावात ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या महिला शिक्षिकांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला. पंचायत समिती अहमदनगर अंतर्गत महिला बचत गट कार्यशाळा घेऊन, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

सरपंच सुधाकर कदम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय योगदानाची स्मृती ठेवत त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने राधिका वामन, मंदा कर्डिले, राजश्री कोल्हे आदी महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर गव्हाणे म्हणाले की, महिलांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिला बचत गटांचा मोठा आधार मिळाला. बचत गटामुळे महिलांची प्रगती झाली असून, महिलांनी देखील अनेक व्यवसाय थाटून आर्थिक सक्षम झाले असल्याचे सांगितले. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिनेश निमसे यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, अनुदान विषयी माहिती दिली. यावेळी आकाश महाराज फुले यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. कार्यक्रमास सरपंच सुधाकर कदम, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, शिवाजी होळकर, राजेंद्र होळकर, रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, प्रकाश कांडेकर, नानासाहेब बेल्हेकर, विलास चौरे, शिवाजी खामकर, जिजाबापू होळकर, गणेश फुले, दिनेश राऊत, महेंद्र चौगुले, भानुदास फुले, राजू गवारे, गौरव होले, शाहू होले, अक्षय बेल्हेकर, ऋषिकेश मेहत्रे, सुरज साळुंखे, मिटू होळकर, भोलेनाथ नेमाणे, शुभांगी काकडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे 

पै. नाना डोंगरे : निमगाव वाघात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक किसन वाबळे व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी निळकंठ वाघमारे, दतात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, काशीनाथ पळसकर, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक किसन वाबळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे. स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य झाली.  आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज असून, आजच्या प्रत्येक युवतीने सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन शिक्षणाने आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. पै. नाना डोंगरे यांनी स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments