नागपुरात बसून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत .. : सचिन पायलट

नागपुरात बसून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत .. : सचिन पायलट  

वेब टीम जयपूर : शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधे बसून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे,” अशा तिखट शब्दांत राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली. जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना सचिन पायलट यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे.” भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपावर टीका करताना पायलट म्हणाले, “आत्ताच्या काळात तुम्ही ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहात. इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपामध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे.”

शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हा इतकाही क्लिष्ट नाही की तो केंद्र सरकार सोडवू शकत नाही. तुम्हाला फक्त इतकचं सांगायचंय की आम्ही यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) अंतर्भाव करतो आहोत आणि तिन्ही कायदे मागे घेत आहोत. केंद्रानं हे समजून घ्यायला हवं की काही कायदे मागे घेतल्याने कुठलंही नुकसान होणार नाहीए. जर केंद्र सरकारनं कायदे मागे घेतले तर आम्ही त्यांचे आभार मानू पण ते हे कायदे मागे घेणार नाहीत कारण ते हटवादी आहेत. कायद्यात सुधारणा करणे, ते मागे घेणे किंवा माफी मागणं ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे नेत्यांची उंची वाढते, ही लाज वाटण्याची बाब नाही.



Post a Comment

0 Comments