"त्या" रात्री पार्टीत काय घडलं याचा शोध घेताहेत पोलीस

"त्या" रात्री पार्टीत काय घडलं याचा शोध घेताहेत पोलीस 

वेब टीम मुंबई : खार येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीत जान्हवी कुकरेजा या तरुणीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांची ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, पार्टीत सहभागी झालेल्यांच्या जबाबातून वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने नेमके त्या पार्टीत काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहेत. ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का, याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खार येथील 'भगवती हाइट्स' या इमारतीच्या गच्चीवर ३१ डिसेंबरला पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये जान्हवी, श्री, दिया यांच्यासह इमारतीमध्ये राहणारे; तसेच त्यांची मित्र मंडळी उपस्थित होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, अशी माहिती मिळाल्यावर खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीमध्ये श्री आणि दिया यांनी केलेल्या मारहाणीत जान्हवी हिचा मृत्यू झाल्याचे समोर येताच हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. शनिवारी न्यायालयाने दोघांना सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जान्हवीला इतक्या क्रूरपणे का मारण्यात आले, याचा तपास पोलिस करीत आहेत. जान्हवी आणि श्री यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, अशी माहिती पुढे येत आहेत. मात्र श्री याला दियासोबत पाहून तिचा राग अनावर झाला आणि त्यातूनच तिघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे. गच्चीवरील पार्टीतून श्री आणि दिया बाहेर पडताच जान्हवी त्यांच्या मागोमाग आली. शिड्यांवरून खाली उतरत असताना तिघांमध्ये जोरदार झटपट झाली. या वेळी केस धरून डोके आपटल्याने जान्हवीचा मृत्यू झाला. यामध्ये श्री आणि दिया हेदेखील जखमी झाले. श्री याला सायन, तर दिया हिला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेले, अशी माहिती पार्टीतील काहींनी दिली. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती देत असल्याने नेमके काय घडले, याचाच  शोध पोलिस घेत आहेत


Post a Comment

0 Comments