नगर टुडे बुलेटीन ०३-०१-२०२१

 नगर टुडे बुलेटीन ०३-०१-२०२१ 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 श्रीगणेशाची महाआरती करून नववर्षाचे स्वागत : हरिभाऊ डोळसे       

वेब टीम नगर : हिंदू संस्कृतीही जगात महान आहे.हिंदू नववर्ष हे गुढी पाडव्यापासून सुरू होत असते.त्यामुळे युवकांनी हिंदू संस्कृती प्रमाणे आपले आचरण केले पाहिजे.जेष्ठांनीही त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. इंग्रजी महिन्याचे वर्ष असल्याने त्याचे स्वागत करणे ठीक आहे.परंतु त्यानिमित्त होणारा धांगड धिंगाणा, डीजे,दारु पिणे,मोकाट दुचाकी फिरवणे असे बिभत्स प्रकार होत आहेत.ही आपली संस्कृती नव्हे. त्यासाठी युवकांवर चांगले संस्कार व्हावेत व त्यांच्यात नववर्षा बाबत जागृती व्हावी यासाठी 31 डिसेंबरला रात्री बारा वाजता श्री गणेशाची आरती करून तरुणाईला सुबुद्धी दे.अशी प्रार्थना केली  असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे यांनी सांगितले.                            

    माळीवाडा येथील श्री शिव गणपती मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर संपर्क समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे यांच्या हस्ते नवीन वर्षानिमित्त श्री गणेशाची महाआरती करण्यात आली.या प्रसंगी डॉ.चंद्रकांत केवळ,ओंकार भोज,अँड अनिल कुल्लाळ,चेतन डोळसे,ओंकार कराळे,अर्जुन परदेशी,आप्पा खताडे,साईराज डोळसे,निकिता डोळसे आदींनी दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.        

 पुढे बोलताना हरिभाऊ डोळसे म्हणाले की हिंदू धर्मात शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने केली जाते.नवीन वर्षाची सुरुवात श्रीगणेशाच्या आशीर्वादाने होतेे म्हणून दरवर्षी या मंदिरात नवीन वर्षानिमित्त दरवर्षी भाविकांच्या वतीने आरती करण्यात येते.असे विश्व हिंदू परिषदेचे मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रक्तदानाचा समाजाला चांगला उपयोग होईल : मुकेश साठये  


वेब टीम नगर  :  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, या रक्तदानाचा समाजाला चांगला उपयोग होणार आहे. तसेच जनमानसात रक्तदानाबद्दल जनजागृती होणार आहे. असे प्रतिपादन जनकल्याण रक्तपेढीचे प्रशासकिय अधिकारी मुकेश साठये यांनी केले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर शाखेच्या वतीने येथील जनकल्याण रक्तपेढी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी ते बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, पत्रकार सूर्यकांत नेटके, जयंत देशपांडे, श्रीराम जोशी, सुदाम देशमुख, सचिन चोभे, मकरंद घोडके, , जनकल्याण रक्तपेढी चे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिलीप दाणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढिकर, सोनाली खांडरे यांच्यासह रक्तदाते यावेळी उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर वर्षाच्या सुरुवातीलाच राबविलेला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सध्याची रक्ताची टंचाई लक्षात घेता. या रक्तदानापासून अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. अशी प्रतिक्रिया जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढिकर यांनी व्यक्त केले. यावेळी उद्योजक अमोल गायकवाड, मंजुषा गायकवाड, अजय चव्हाण, मनोज कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्रे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. तसेच या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

जनकल्याण रक्तपेढी राबवित असलेल्या या सामाजिक उपक्रमास सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रमाणपत्र, चहा, बिस्किटे, फ्लेक्स प्रिंटिंग, पुस्तके तसेच कापडी पिशव्या भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी रक्तपेढी प्रशासनास सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विनायक नेवसे यांची अमेरिकेतल्या  जागतिक विमा परिषदेसाठी निवड

      वेब टीम नगर : जगातील विमा क्षेत्रात चांगले काम करणार्‍या विमा प्रतिनिधींची अमेरिका (कॅलिफोर्निया)येथे एम.डी.आर.टी. ही विमा परिषद भरत असते. यासाठी नगरमधील विनायक नेवसे यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे. अमेरिका येथे जगातील नामांकित विमा प्रतिनिधींची परिषद होते. सदर एमडीआरटी (मिलियन डॉलर राऊंड  टेबल) या नावाने होते.

     विनायक नेवसे यांना एलआयसीचे विकास अधिकारी गुरुनाथ पवार, वरिष्ठ शाखाधिकारी निरंजन महाबळ, उपशाखा अधिकारी शिवा पटनाईक,विकास अधिकारी तुषार देशमुख , आदिंचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महेश सुरसे, धनंजय जाधव, दत्ता जाधव, सुनिल बनकर, शाम मुळे, सागर थोरवे, स्वप्नील मांढरे ,रावसाहेब गोरे ,संतोष जपे ,अमित देऊसकर, देवेंद्र आगरकर आदिंसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

     विनायक नेवसे यांनी विमा क्षेत्रात आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. एलआयसीच्या विविध योजनांचे तंत्रशुद्ध माहिती, बारकावे, मिळणारे लाभ आदिंची संबंधितांना देऊन जास्तीत जास्त विमा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे उद्दिष्टय ते पूर्ण करत असतात. तसेच आपल्या सहकार्यानाही याबाबत मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे. विनायक नेवसे हे निवृत्त नायब तहसिलदार भगीरथ परसराम नेवसे यांचे चिरंजीव आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगार कार्यालय तत्पर

चंद्रकांत राऊत : सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने सुरक्षा रक्षकांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वाटप

    वेब टीम  नगर : कामगारांच्या कल्याणासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असतात. त्यांना विमा संरक्षण, सुरक्षित साधनांचे वाटप, भत्ता, ओळखपत्र अशा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असतो. सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने नोंदणीकृत कामगारांच्या सुरक्षेतेसाठी सुरक्षा साहित्याचे वाटप करुन त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. कामगारांनीही काम करतांना काळजी घ्यावी, सुरक्षित साधनांचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले.

     सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने कामगारांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, निरिक्षक सुनिल देवकर, उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे, सचिव मधुकर केकाण, भैरु कोतकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, कामगारांच्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी संघटना काम करत आहे. आज गणवेश व सुरक्षा साधनांचे वाटप करुन त्यांना एक प्रकारे सुरक्षा प्रदान केली आहे. अशाप्रकारचे उपक्रम संघटनेच्यावतीने नियमित राबविले जातील, असे सांगून कामगारांनीही सुरक्षा मंडळाचे सभासद होऊन नियमांचे पालन केल्यास त्याचा लाभ त्यांनी नक्कीच मिळेल, असे सांगितले.

     याप्रसंगी निरिक्षक सुनिल देवकर यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन गेल्या काही दिवसांपासून टप्याटप्प्याने सुरक्षा रक्षक कामगारांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वाटप  करण्यात येत होते. आज या उपक्रमाचा समारोप होत आहे. पुढील काळातही कामगारांसाठी कार्यालयाच्यावतीने उपक्रम राबवू असे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंदराव सांगळे यांनी केले तर मधुकर केकाण यांनी आभार मानले. याप्रसंगी नोंदणीकृत सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दगंधची दिनदर्शिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल :  ॲड. कॉ. सुभाष लांडे पाटील.

वेब टीम नगर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून शब्दगंध ने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. ही दिनदर्शिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन ॲड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद च्या वतीने येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, प्रा. सीताराम काकडे, डॉ. महेश वीर, डॉ. जे.टी. शेंडगे, पत्रकार संदिप रोडे, ॲड. भूषण ब-हाटे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शब्दगंध परिवाराने शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त २ सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके भेट देऊन नवा पायंडा पाडला. वाचनालये जगवणे व तेथील वाचकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देणे. अवघड होऊन बसले आहे अशा काळात शब्दगंध ने राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. 

प्रा. सिताराम काकडे म्हणाले की, राजेंद्र उदागे हा माणसांवर प्रेम करणारा माणूस आहे त्यांच्यामध्ये मोठा दातृत्व गुण आहे. 

संदिप रोडे म्हणाले की, कुठलाही गाजा वाजा न करता, मुक्त हाताने अन्नदान करणारा अवलिया म्हणजे राजेंद्र उदागे आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे आणि गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा व निखळ मैत्री जपणारा माणूस म्हणजे राजेंद्र उदागे.

श्रीनिवास बोज्जा म्हणाले,  राजेंद्र उदागे यांचे मन त्यांच्या नावाप्रमाणेच राजसारखे आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात उपेक्षित, वंचित घटकांना रात्रंदिवस अन्नदान करण्याचे काम त्यांनी केले. तण, मन, धनाने समाजसेवा केली. त्यांच्या हातून भविष्यकाळात देखील अशाच प्रकारचे कार्य घडो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

शब्दगंध चे संस्थापक सुनिल गोसावी म्हणाले की, कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे गेली ९ महिने आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो. आता कोरोना महामारीचे संकट काही प्रमाणात का होईना कमी झालेले आहे. त्यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वाना एकत्रपणे संवाद साधता यावा म्हणून शब्दगंध दिनदर्शिकेचे प्रकाशन, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयांना मोफत पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. यावेळी वसंत डंबाळे, स्वाती पाटील, पी. एन.डफळ, प्राचार्य जोशी, व इतर  अनेक कवींनी आपल्या शुभेच्छा पर कविता सादर केल्या. 

कार्यक्रमास  कवी चंद्रकांत पालवे, डॉ. अनिरुद्ध पाटील, डॉ. अखिल धानोरकर, अस्लम शेख, माधव सावंत, स्वाती पाटील, मीरा करंजीकर, इंदुमती सोनवणे, बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. अनिल गर्जे, दादा ननावरे, ओमप्रकाश देंडगे, प्रा. डॉ. वसंत जोशी, मीना गायकवाड, अर्चना झोपे, संस्कृती रासने, विनायक पवळे, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, कवयित्री ऋता ठाकूर, दशरथ शिंदे, कुंडलिक ढाकणे, कॉ. नानासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

शब्दगंध चे खजिनदार भगवान राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अशोक कानडे, डॉ.राजेंद्र फंड, इंजि. किशोर डोंगरे, बबनराव गिरी, प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी  परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत

 शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा

    वेब टीम  नगर : मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अंतर्गत असलेले आयुर्वेद-अमरधाम रस्ता, आरटीओ ऑफिस येथील रस्ता तसेच शहरातील कलेक्टर कचेरीसह शहरातील विविध भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन मनपा उपायुक्त पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे आदि उपस्थित होते.

     उपायुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील रस्त्यासह शहरातील रस्त्यांवरुन जवळ-जवळ 3 ते 6 लाख नागरिक ये-जा करत असतात. या दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकीस्वारांचे अनेक छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत. बर्‍याच महिन्यांपासून रस्त्यांची ही दुरावस्था आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्‍वसनाचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार जडत आहेत. यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विविध विभागांच्या समन्वयातून या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध शासकीय विभागात सन्मवय नसल्याने एक रस्ता तयार करतो, तर दुसरा खोदतो, अशी परिस्थिती आहे. काही कामानिमित्त रस्ते खोदलेच तर संबंधित कंत्राटदारांना तातडीने रस्ते करण्यास सांगावे. पुढील काही दिवसात रस्त्याची कामे हाती न घेतल्यास शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असे म्हटले आहे.

     याप्रसंगी उपायुक्तांशी विविध विषयांवर चर्चा होऊन रस्त्यांबाबत लवकरच कार्यवाही करु, असे आश्‍वासन देण्यात आले. यावेळी बाळकृष्ण चांदणे, सरपंच सचिन चांदणे, गणेश शेकटकर, विनोद चोपडा, किरण वाघ, शुभम ठोकळ आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तमाशा कालावंतांच्या मागण्यांसाठी सोमवारी 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.

वेब टीम नगर  : अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषदेच्या वतीने लोकनाट्य तमाशा कलावंत, फड मालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. ४ जानेवारी पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष हसन शेख पाटेवाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र शासनाने लोकनाट्य तमाशा क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख असलेला सुधारित शासन निर्णय काढावा, लोकनाट्य तमाशा मंडळास कायमस्वरूपी अनुदान मिळावे. पोलीस प्रशासनाकडून ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी विनाअट मिळावी. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या विविध समित्यांमध्ये जेष्ठ तमाशा कलावंतांची निवड व्हावी, कोरोना महामारी व लॉक डाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तमाशा कलावंतांना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत शासनाने करावी. राज्यातील लोककलावंतांच्या उन्नतीसाठी तमाशा  सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.  या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार परिषदेने व्यक्त केला आहे.

कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या लोकनाट्य तमाशा चे कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, महसूल मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनेक वेळा निवेदने दिली. मात्र पोकळ आश्वासहनांच्या पलीकडे तमाशा कलावंतांच्या पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे परिषदेने आपले आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक करण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही. असा निर्धार अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, अध्यक्ष आविष्कार मुळे, व सचिव मोहित नारायणगावकर, उपाध्यक्ष शेषराव गोपाळ, मयूर महाजन, सुनिल वाडेकर, हसनशेख पाटेवाडीकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ नोव्हेंबर २०२० रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याबाबत जो शासन निर्णय काढण्यात आला. त्यात लोकनाट्य तमाशा क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे पोलीस प्रशासन लोकनाट्य तमाशा सादर करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे सांस्कृतिक विभागाने लोकनाट्य तमाशाचा स्पष्ट उल्लेख असलेला सुधारित शासन निर्णय काढावा. यासह वरील मागण्या परिषदेने शासनाकडे केल्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खा.सदाशिव लोखंडे यांच्या अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीस दीनदयाळ परिवाराचा पाठींबा : वसंत लोढा

वेब टीम नगर :अहमदनगर चे नामांतर अंबिकानगर करावे या खा.सदाशिव लोखंडे यांच्या मागणीस दीनदयाळ परिवाराने जाहीर पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इमेल द्वारे निवेदन पाठवून अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी केली आहे. या संदर्भात सर्व पक्षीय समविचारींची बैठक लवकरच खा.सदशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

       निवेदनात म्हंटले आहे की, अहमदनगरचे नाव अंबिकानगर व्हावे ही अनेक वर्षापासुंची नगरकरांची मागणी आहे. केडगावची अंबिकादेवी ही नगर शहराची कुलदेवता आहे. आता लोकप्रतिनिधी असलेले खा.सदाशिव लोखंडे यांनीही नामांतराची मागणी कल्याने या मागणीला जोर आला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याच प्रमाणे नगरचे नामांतर व्हावे यासाठी राज्य सरकारने अंबिकानगर या नामांतर मागणीचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा.

निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, प्रा.मधुसूदन मुळे, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, सचिन पारखी, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सदाभाऊ शिंदे,  सोमनाथ चिंतामणी आदींच्या सह्या आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चीनी मांजा विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाही का होत नाही? :  डॉ परवेज अशरफी

वेब टीम नगर : अहमदनगर शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चीनी मांज्याला बंदी शासनाने मागील ५ - ६ वर्षा पासून घातली असतांना देखील अहमदनगरच्या बाजारात चीनी मांजा खुलेआम विकला जात आहे. चीनी मांज्याला बंदी असून अद्याप संबंधीत अधिकारीने कोणतीही कारवाही केल्याचे दिसून आले नाही. दरवर्षी राज्यात या चीनी मांज्यामुळे अपघात होत असल्याचे वृत्तपत्रात वाचायला मिळते जसे सामान्य जनतेचे वाचण्यात येते तसे अधिकारींचे पण वाचण्यात येत असावे परंतु कोणीही कारवाही करण्याचे विचार करीत नाही. ज्याप्रकारे चीनी मांजा बाजारात विकला जात आहे त्यावरून आसे वाटते की या व्यापार्यंना अधिकारीनची आणी कर्मचारींची पाटबळ असावे असा गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात असेही लिहिले आहे की चीनी मांज्याने कोणाचा गळा कापला गेला, कोणाचा गाडी चालवत असतांना मधे मांजा आल्यामुळे अपघात झाले आणी व्यक्ती मरण पावला. तर कोणाचा मंज्याने श्वास नलिका कापली गेली. तर सामान्य नागरीका बरोबर आकाशात उडणारे पक्षी देखील घायाळ होत आहे आणी मरत आहे. यामुळे निसर्गाला देखील नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशे अनेक अपघात होत असतांना सुद्धा प्रशासन याची दखल घेत नसल्याने सामान्य जनतेला असे वाटते की चीनी मांजा बाजारात मांजा व्यापारी आणी प्रशासन यांचा संगनमताने विकला जात असावे. चीनी मांजा कुठे विकला जातो याची माहिती असून सुद्धा कारवाही होत नसल्याने विशेष वाटते.

निवेदनात चीनी मांजा विकणारे व्यापारी, तसेच चीनी मांजा वापरणारे नागरिक व या सर्व प्रकरणावर डोळेझाक करणाऱ्या अधिकारी आणी कार्माचारीन वर कायदेशीर कारवाही करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष, असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष,फैझान इनामदार, मुसैफ शेख, सलमान खान, समीर बेग, फिरोज शेख, आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवाधिकार अभियानाच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी राजू धोत्रे यांची निवड                     
                          

वेब टीम नगर :  मानवाधिकार अभियानाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी राजू धोत्रे यांची निवड करण्यात आली व मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष अँड. संतोष गायकवाड व जिल्हा अध्यक्ष अनिल गंगावणे, प्रदेश उपाध्यक्ष संध्याताई मेढे, रूपाली वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना राजू धोत्रे म्हणाले की सामाजिक कार्याची असलेली तळमळ युवकांमध्ये असलेल्या जनसंपर्क याची दखल घेत जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नाला शासन स्तरावर सोडवण्यासाठी या मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले व या निवडीबद्दल जे विश्वास माझ्यावर दाखवल्याबद्दल मी माझ्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही व तळागाळापर्यंत मानवाधिकार अभियानाचे नाव व काम  घेऊन जाण्याचे कार्य करून जेथे मानव अधिकारांचे हनन होऊन अन्याय अत्याचार होत असेल तेथे मी पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहून तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून युवकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी कटिबद्ध राहील व मानवाधिकार अभियान च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटना बळकट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मानवाधिकार अभियानाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व मित्र परिवारकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                      

 विश्वजीत कासार , त्यांच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करा    

 वाळकी ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी                                 

  वेब टीम नगर : वाळकी (ता.नगर) येथील ओमकार भालसिंग यांच्यावर खूनी हल्ला करणारा विश्वजीत कासार व त्याचे साथीदार सुनील अडसरे, शुभम लोखंडे, सचिन भामरे, इंद्रजीत कासार यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत मुलाची आई लता भालसिंग व वाळकी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  सदर आरोपींवर अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जालना जिल्हा व इतर ठिकाणी खंडणी, खून, दरोडा, अपहरण, जबरी मारहाण, फसवणूक यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे तसेच त्यांना नगर जिल्हा न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दहा वर्षे शिक्षा सुनावली होती व ते हायकोर्टातून जामिनावर मुक्त आहे परंतु त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये कोणतेही बदल झालेले नाही विश्वजीत कासार हा त्याचे टोळीचा मुख्य मोरक्या असून तो त्याचे इतर साथीदारांसह गुन्हे कायम करतो व केलेल्या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे त्यांच्यापासून समाजास व आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप त्रास होत आहेत व आम्हाला आमचे जीवन धोक्याचे वाटते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कास्ट्राईबची ऑनलाईन सेवा शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार 


एन.एम. पवळे : सर्व तहसिल कार्यालय व जिल्हा परिषदेचे सर्व विभागाशी जोडण्यात आलेल्या

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ

वेब टीम नगर : शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे अनेक न्याय हक्काच्या मागण्या सोडविण्यात आल्या आहेत. शासन स्तरावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु आहे. ही ऑनलाईन सेवा सर्व कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार असून, सर्व कर्मचारी व विभाग एकमेकाशी जोडले गेले असून, असंघटित कामगारांना देखील एकत्रित आणण्याचे कार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ राज्य अध्यक्ष पवळे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद येथील कास्ट्राईबच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राज्य उपाध्यक्ष सयाजी खरात, राज्य सहसचिव निवृत्ती आरु, नाशिक विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सरचिटणीस सुहास धीवर, कार्याध्यक्ष वसंत थोरात, अतिरिक्त सचिव गुलाबराव जावळे, महिला जिल्हाध्यक्षा नंदा भिंगारदिवे, परिचारिका जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, कार्यााध्यक्ष मायाताई जाधव, सचिव मनिषा साळवे, शहराध्यक्ष दत्ता रणसिंग, जय हिंद सोसायटीचे उद्मले, श्याम थोरात, सोमनाथ शिंगाडे, बुध्दानंद धांडोरे, आरिफ शेख, इरफान शेख आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष के. के. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व विविध कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे कार्य केले जात आहे. या ऑनलाईन सेवेद्वारे सर्व तहसिल कार्यालय, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले गेल्याने कर्मचार्‍यांची सोय होणार आहे. तसेच बांधकाम कामगार, गवंडी, मजुर, सुतार, पेंटर आदि असंघटित कामगारांची नोंदणी यामध्ये करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय व असंघटित कामगारांचे प्रश्‍न सुटण्यास देखील मदत होणार असल्याचे सांगून, डीसीपीएस व नोकर भरतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या नंदा भिंगारदिवे, ज्योती पवार, मनीषा साळवे यांनी कोरोनाच्या संकटकाळात उत्तम कार्य केल्याबद्दल कास्ट्राईबच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धीवर यांनी केले. आभार ज्योती पवार यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महापालिकेकडून आजी-माजी सैनिकांना  बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजनेचा लाभ मिळावा

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन : आजी-माजी सैनिकांना कर माफीसाठी या योजनेचा लाभ देण्याचे उपायुक्तांचे आश्‍वासन

वेब टीम नगर : महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिक, वीर पत्नी व शहिद जवानाच्या कुटुंबीयांना मालमत्ता करातून सुट मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजनेची अहमदनगर महापालिका हद्दीत तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन फाऊंडेशनच्या वतीने मनपाचे उपायुक्त संतोष लांडगे यांना देऊन, सदर प्रश्‍नी माजी सैनिकांनी सविस्तर चर्चा केली. उपायुक्त लांडगे यांनी मनपाच्या वतीने कर माफीसाठी आजी-माजी सैनिकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, शिवाजी गर्जे, संजय पाटेकर, महादेव शिरसाठ, भाऊसाहेब देशमाने, निळकंठ उल्हारे, संतोष शिंदे, सुनिल गुंजाळ आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने 18 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रात मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू केली आली आहे. या योजनेद्वारे आजी-माजी सैनिक, वीर पत्नी व शहिद जवानाच्या कुटुंबीयांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय होऊन सुमारे तीन महिने झाले असून, तरी देखील अहमदनगर महापालिकेमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने संरक्षण दलातील सर्व आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, शहिद जवानांच्या कुटुंबीयांना ग्रामविकास विभाग व नगर विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय व आदेश विहित करण्यात आलेले आहे. नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या आजी-माजी सैनिक, वीर पत्नी व शहीद कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात आलेली नाही. या शासन निर्णयाची तातडीने दखल घेऊन मा. बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजनेचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर कर माफीचा लाभ मिळण्यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका दाखवली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सैनिक कल्याण मधून घरपट्टी माफीचा दाखला घेऊन, नगर- औरंगाबाद रोड येथील महानगरपालिकेच्या कर विभागात जमा करण्याचे आवाहन आजी-माजी सैनिक, वीर पत्नी व शहिद जवानाच्या कुटुंबीयांना जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment

0 Comments