नगर बुलेटीन
जादा घेतलेले बिले परत न करणार्या हॉस्पिटलवर कारवाई करावी
मनसेच्यावतीने मनपात झोपून आंदोलन
वेब टीम नगर : नगर शहरातील कोरोना पेशंटकडून जादा रक्कम घेतलेल्या हॉस्पिटलने जादा घेतलेली रक्कम परत न केल्याने संबंधित हॉस्पिटलवर इतके दिवस उलटून देखील महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आल्यामुळे हॉस्पिटल चालकांना महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित पदाधिकारी पाठीशी घालतांना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने आज मनपा आयुक्तांच्या दालनात झोपून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनोज राऊत, अॅड.अनिता दिघे, अशोक दातरंगे, पोपट पाथरे, गणेश शिंदे, तुषार हिरवे, अमोल बोरुडे, रतन गाडळकर, गणेश मराठे, दिपक दांगट, संकेत व्यवहारे, अभिनय गायकवाड, आकाश कोल्हार, आकाश पवार, इंजि.विनोद काकडे आदि उपस्थित होते.
यावेळी सचिव नितीन भुतारे म्हणाले की, करोना काळातील करोना रुग्णांवरील वाढीव बिलाची रक्कम परत करण्याचे आदेश महानगरपालिकेने शहरातील १३ हॉस्पिटलला दिले होते व वाढीव बिलाची रक्कम सदर रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. सदर रक्कम रुग्णांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत जमा करावी. अन्यथा महानगरपालिका कारवाई करणार असलयाचे पत्र सदर १३हॉस्पिटलला दिले. परंतु आजपर्यंत ४८ लाख रुपये एवढी मोठी रक्कम परत करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले असताना २ महिने उलटून देखील फक्त १ लाख ७१ हजार रुपये ३ हॉस्पिटलने परत केले असून अजून जवळपास ४७ लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे असताना देखील खाजगी हॉस्पिटलनी उपजिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे भुतारे यांनी सांगितले.
याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, संबंधित हॉस्पिटलकडून सदर रुग्णांचे पत्ते सापडत नसल्याचे कारण देण्यात येत आहे. तर मनपानेच शहरात रिक्षा फिरुन याबाबत आवाहन करावे, तसेच स्थानिक वृत्तपत्रांत त्याबाबत जाहीर करावे, असे सांगितले.
यावेळी आयुक्त म्हणाले की, आम्ही वेळोवेळी हॉस्पिटलशी संपर्क ठेवून आहोत, त्यांना याबाबत आधीही नोटीसा पाठविल्या आहेत. आता त्यांना शेवटची नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये जर संबंधित हॉस्पिटलकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, तर संबंधित हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करु, असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्टेट बँकेच्या नगर क्षेत्रिय कार्यालयाने राज्यात अव्वल स्थान पटकवावे
महाप्रबंधक सुखविंदर कौर : स्टेट बँकेच्या विविध सुविधांचा शुभारंभ
वेब टीम नगर : आज भारतीय स्टेट बँक प्रतेक क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहे. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी करोना लॉकडाऊन काळात मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळत चांगली सेवा दिली आहे. आता सर्व काही पूर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांपर्यत बँकेच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे पोहचण्यासाठी अधिकारी व कर्मचारी योगदान देत आहेत. ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा स्टेट बँक पूर्ण करत आहे. नगरच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम केले जात आहे. याहून अधिक चांगले काम करून या कार्यालयाने राज्यात अव्वल स्थान पटकवावे, यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी केले.
भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर या नगर जिल्हा दौऱ्यावर आल्या असता शहरातील स्टेट बँकेच्या नगर, सावेडी व एमआयडीसी शाखांना व एमआयडीसी मधील क्षेत्रिय कार्यालयास भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. क्षेत्रिय कार्यालय व्यवस्थापक राजीव गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुंबईचे मुख्य प्रबंधक रजनिश वर्मा, ग्राहक सेवेचे मुख्य प्रबंधक महेंद्र मोहिते, व्यवस्थापक नवल अग्रवाल, मनोज शहा, नगर शाखेचे व्यवस्थापक अजय कुमार, सुहास भिडे, मनपाचे सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते विविध सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. यात नगर शाखेच्या कार्यालयात कर्ज मंजुरी प्रक्रीया केंद्राच्या नूतन कार्यालचे उद्घाटन झाले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थींना मंजूर झालेल्या एक लाख रुपयांच्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सामाजिक उपक्रमांतर्गत विविध फळझाडांचे रोपण सुखविंदर कौर यांच्या हस्ते झाले. शहरातील मोठ्या उद्दोजकां बरोबर झालेल्या बैठकीत त्यांच्या प्रश्नांचे व समस्यंचे निरासरण महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी करून सर्व उद्दोजक बँकेला करत असलेल्या सहकार्या बद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला.
स्टेट बँकेचे कर्ज मंजुरी प्रक्रिया केंद्र कार्यालयचे नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आल्याने आता सर्व प्रकारचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना अधिक वेगाने व सुटसुटीत पद्धतीने कर्ज मंजुरीची प्रक्रिया होणार असल्याने वेळाची बचत होणार आहे. ग्राहकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी केले.
एमआयडीसी मधील क्षेत्रिय कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापकांच्या बैठकीत महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन करत सूचना केल्या. पुढील काळात ग्रामीण भागावर अधिक लक्ष देवून बँकेच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील सर्व खातेदार कर्जदार यांना अधिकाधिक सहकार्य करून कर्ज वसुलीलाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या. तसेच शहरी भागातील छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक कर्जदार यांनाही जास्तीत जास्त सहकार्य बँकेच्या अधिकारी व कर्मचारींनी करावे, आवाहन केले.
बैठकीच्या प्रास्ताविकात क्षेत्रिय कार्यालय व्यवस्थापक राजीव गुप्ता यांनी कार्याची सविस्तर माहिती दिली. बँकेचे सर्व शाखा व्यवस्थापक उत्कृष्ठ काम करत असल्याने त्यांनी नमूद केले. या बैठकीत स्टेट बँकेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ठ ग्राहक सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापकांना महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य प्रबंधक महेंद्र मोहिते यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी प्रियदर्शनी क्लबचा खारीचा वाटा : गीता गिल्डा
वेब टीम नगर : नावा प्रमाणे जनकल्याणासाठी कार्य करणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने खारीचा वाटा उचलत मदत करत आहे. जीवनदान देणाऱ्या या सेवा कार्यात सर्व नागरिकांनी रक्तदान करून सामील व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला अत्याधुनिक इन्यूबेटर कम ओव्हन मशीन देण्यात आले. अहमदनगर प्रियदर्शनी क्लबच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.उत्तम शिंदे यांच्या कडे हे ओव्हन मशीन सुपूर्द केले. यावेळी उपप्रांतपाल अॅड. अभय राजे, सचिव देविका रेळे, खजिनदार शशी झंवर, रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ठे, प्रकाश स्मार्त आदी उपस्थित होते.
रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.उत्तम शिंदे यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी क्लबने जनकल्याण रक्तपेढीला केलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एनपीएचे निकष संस्थेच्या हिताचे
डॉ.अभय मंडलिक : बँक असो.च्यावतीने एनपीए, व्यवस्थापन ज्ञानसत्र
वेब टीम नगर : वित्तीय संस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एनपीएचे निकष संस्थेच्या हित संरक्षणाच्या दूरदृष्टीने कडू औषध असले तरी विविध स्तरावरील प्रयत्न जारी केल्यास एनपीए प्रमाण कमी होवून नफा क्षमता वाढून संस्थेचे आर्थिक स्थैर्य भक्कम होईल, असे मत देवगिरी नागरी सहकारी बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय मंडलिक यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील अधिकार्यांसाठी आयोजित एन.पी.ए., नॉन बँकिंग अॅसेट, निर्लेखन इत्यादी विषयांवर ज्ञानसत्रात ते मार्गदर्शन करीत होते. संगमनेर मर्चंट को-ऑप बँकेचे असिसंट जनरल मॅनेजर विजय बजाज या सहभागी प्रशिक्षणार्थीच्या हस्ते ज्ञानसत्राचे अभिनवरित्या उद्घाटन झाले.
पुढे बोलतांना डॉ.मंडलिक म्हणाले, कर्जवसुलीची जटिल समस्या सर्व कायदेशीर तरतुदींचा उपयोग करुन योग्या वातावरण निर्मितीतून सोडवून मागता क्षणी ठेवी परत करण्याची ठेवीदारांशी असलेली वचनबद्धता सदासर्वदा कायम ठेवून संस्थेची विश्वासर्हता वृद्धीसाठी मोलाचे ठरेल, असे ते म्हणाले.
दिवसभराच्या ज्ञानसत्रात डॉ.मंडलिक यांनी वसुली चिंतन, थकबाकी प्रमाण वाढण्याची कारणे, कर्ज वाटपातील खबरदारी, थकबाकीदाराचे मन वळवून कर्ज वसुली, सहकार कायदा, सिक्युरिटायझेशन अॅक्ट मधील विविध तरतुदी, वसुलीची कार्य पद्धती, जप्तीची कारवाई, विविध कायदेशीर मार्ग, पर्याय, आदि बाबींचा प्रश्नोत्तरे व संवादाच्या माध्यमातून उपस्थितांशी उहापोह केला. जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील कर्ज वसुली विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए.गिरीष घैसास यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मोहंमद रफि यांच्या वाढदिवसा निमित गाण्याची महेफील
वेब टीम नगर : कोविड-१९ च्या कारणांने सभागृह व सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहे. अशा वेळी सार्वजनिक भावनेतुन अँड. अमीन धाराणी व अँड. गुलशन धाराणी या दामपतयांनी म्युझिकल स्टार्स फेसबुक पेज या माध्यमातून ऑनलाईन गाण्यांची मैफिल मागील काही महिन्यापासून आयोजन करत आहे. व त्यामध्ये स्थानिक व बाहेरील हौशी कलाकारांना वाव देत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गायक मोहंमद रफि यांच्या वाढदिवसा निमित गुरुवारी वार दिनांक २४ डिसेंम्बर २०२०रोजी रात्री ८ वाजता म्युझिकल स्टार्स फेसबुक पेजवर महान गायक मोहंमद रफि यांच्या वाढदिवसा निमित गाण्याची मैफिली आयोजित करण्यात आली आहे.
ज्यामध्ये सुनील भंडारी, सुभाष पाटोळे,किरण उजागर, समीर खान, ॲड. गुलशन धाराणी,निता माने, अमीन धाराणी हे गीत सादर करणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिकांनी सामील व्हावे. असे आवाहन ग्रुप एडमिन ॲड. अमीन धाराणी व योगेश गोंडलिया यांनी केले आहे. पेजवर लाईव्ह येण्यासाठी ७०४०११९९८८ या नंबर वर संपर्क साधावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युनियन बँक ऑफ इंडिया व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने
पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज वितरण
वेब टीम नगर : अहमदनगर महाविद्यालय जवळील युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या क्षेत्रीय कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महापालिकेचे उपायुक्त दिनेश सिनारे व युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनिलकुमार जदली यांच्या हस्ते सर्वसामान्य नागरिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले.
या कर्ज वितरण मेळाव्यात सचिन राऊत, अवधेश ठाकूर, बँकेचे प्रबंधक संदीप वाळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली म्हणाले की, कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकर्यापण गेल्या. साधन सामुग्री उपलब्ध करुन स्वत:च्या व्यवसाय थाटण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन सरकारने गोरगरिबांसाठी कर्ज प्रक्रिया चालू केली आहे. हे कर्ज घेऊन पूर्णपणे व्यवस्थित फेड केली असता पुढच्या वेळेस अधिक कर्ज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपा उपायुक्त दिनेश सिनारे यांनी या योजनेचा जास्तीत जास्त गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तर बँकेच्या सर्व पदाधिकार्यांना या कर्जाचे वाटप व्यवस्थितपणे करुन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी युनियन बँकेचे क्षेत्रीय उपप्रमुख विजया सारधी, मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर साळुंखे, मनोज कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सदाफळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन शिरसाठ, समीर शेख, मुशीर खान, अच्युत देशमुख यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाजार समितीचे बंद गेट तात्काळ उघडण्याच्या खा सदाशिव लोखंडे यांचा आदेश: वसंत लोढा यांची माहिती
वेब टीम नगर : गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे असा आदेश सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा.सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून केले आहे, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली.
वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठवलेले पत्र त्यांना देऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनीग्रामपंचायत च्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर रस्तेसुरक्षा समितीची स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी
डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यापाऱ्यांना दिले.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, बाजार समितीचे गेटची एक बाजू मागील तीन वर्षापासून बंद करण्यातआलेली आहे. सदर गेट बंद असल्याने व्यापारी, नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे रास्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधकरिना पत्र देऊन आदेश दिले आहेत.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील, व्यापारी विपुल शहा, वसंत कापरे, छबुराव हराळ, प्रफुल्ल बांठिया, चिराग शहा, दिलीप गांधी, स्वीय सहायक शिवाजी दिशाकर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन आधार सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला यश
जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर लगेच रुजू करून घेण्याचे आश्वासन
आमरण उपोषणाला स्थगिती.
वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले होते. व पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत अद्यापही कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने भूजल सर्वेक्षण कार्यालय च्या आवारामध्ये अमरण उपोषण चालू करण्यात आले आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. मनोज घुगे व डॉ. केव्हारे हे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आंदोलन करत्यांना म्हणाले की सुरक्षारक्षकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास तयार आहे यावेळी कामगार सहाय्यक आयुक्त राऊत, निरीक्षक देवकर,संघटनेचे पदाधिकारी दीपक गुगळे, अमित गांधी, अजय सोळंकी, शहानवाज शेख, संतोष उदमले, सचिन फले, किरण जावळे, शहाबाज शेख, फारुख शेख, मच्छिंद्र गांगुर्डे, मुसेफ शेख व 17 सुरक्षारक्षक उपस्थित होते तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक अविनाश घुले, धनंजय जाधव, सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे आदी.
दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत १७सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी ७ महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे १ कोटी ३० लाख ७४ हजार एवढा निधी मागे गेला. सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे. सर्व सुरक्षारक्षक यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरी देखील त्यांना हजर करुन न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनता म्हंटले आहे. तरी तातडीने जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली होती. (आर डब्ल्यू एस -३४८७)
0 Comments