व्हाट्सएप च्या ह्या लिंक पासून सावधान

 व्हाट्सएप च्या ह्या लिंक पासून सावधान 


वेब टीम नगर : करोनामुळे बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. मात्र याच बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते.

मात्र हा फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती दिली. सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं होतं.

Post a Comment

0 Comments