नगर बुलेटीन

  नगर बुलेटीन 

कल्याण रोड परिसरातील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी : नगरसेवक सचिन शिंदे

    वेब टीम  नगर : कल्याण रोड परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, पोलिसांची या भागात गस्त वाढविण्यात यावी, या मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांना दिले. याप्रसंगी उत्तमराव राजळे, दिनकर आघाव, शेखर उंडे, बाळासाहेब लवांडे, गणेश जंगम, जयप्रकाश डिडवाणीया, दत्तात्रय शिरसाठ, सतीश गिते, राहुल चौरे, वैद्य आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

     नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरात विद्या कॉलनी, समतानगर, पावन म्हसोबानगर, हॅपीथॅट, आदर्शनगर, आनंद पार्क, सुयोग पार्क, अनुसायानगर, अमितनगर, जाधवनगर, रिया पार्क, श्रीकृष्णनगर, मेवाडनगर, शिवाजीनगर परिसरात अनेक लहान-मोठ्या वसाहत असून, यातील बहुतांशी लोक नोकरदार असल्याने कामानिमित्त बाहेर असतात. याचा फायदा घेत चोरटे हे दिवसासुद्धा घरफोड्या करुन चोर्‍या करत आहेत. रात्री तर हे चोरटे हत्यारांसह वावरतात. त्यामुळे येथील नगारिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या भागास भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

     पुढे असेही म्हटले आहे की, गेल्या काहि दिवसांपासून होत असलेल्या चोरी घटना व चोरटे  सीसीटीव्हीमध्येही दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील काही भागातील नागरिका रात्रीची गस्तही घालत आहेत. पोलिसांचा राऊंड होत असला तरी पोलिसांची आणखी गस्त वाढविण्याची गरज असल्याचे सचिन शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच तोफखाना पोलिसांना सुद्धा निवेदन देण्यात आले. 

`

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नरेश शेळके

   वेब टीम  नगर : नवनागापूरचे माजी उपसरपंच नरेश मोहन शेळके यांची भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडी सेलच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी  निवड करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर,  जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, सरचिटणीस गणेश भालसिंग, प्रविण ढेपे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून नरेश शेळके  पक्षासाठी संघटनात्मक काम करीत असून, संघटन बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. कामगार आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदाच्या माध्यमातून भाजपाचा विस्तार करुन पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. त्याचबरोबर कामगारांच्या प्रश्‍नांसाठी ठोस भुमिका घेऊन केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कामगारांसाठी योजनांचा फायदा त्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

     याप्रसंगी नरेश शेळके म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचे आपण प्रामाणिकपणे काम करत आहोत. आपल्या कामाची दखल घेऊन पक्षाने कामगार आघाडी जिल्हा प्रमुखपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ ठरवू. भाजपा प्रणित केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा लाभ कामगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

     नरेश शेळके यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे,  खा.डॉ.सुजय विखे पा., माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ.बबनराव पाचपुते, आ.मोनिकाताई राजळे, प्रा.भानुदास बेरड, माजी खा.दिलीप गांधी आदिंनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थी बस वाहतुक करणार्‍यांना सरकारने दिलासा देण्याचे काम करावे

 विक्रम राठोड : अ.भा.विद्यार्थी महासंघास जिल्हा विद्यार्थी वाहतूक सेनेचा पाठिंबा

    वेब टीम  नगर : अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्यावतीने राज्य शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांना नगर जिल्हा  विद्यार्थी वाहतूक सेनेच्यावतीने पाठिंबा देऊन विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शहर वाहतुक सेनेचे शहर प्रमुख संजय आव्हाड, अशोक शेळके, रफिक शेख, राजू गहिले आदि उपस्थित होते.

     उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे गेल्या एक वर्षांपासून वाहने जागेवर उभे असल्याने वाहनांसाठी एक वर्षासाठी कर माफी मिळावी. स्कूल बससाठी सहानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कर्जावरील हप्ते व व्याज माफ व्हावे. स्थनिक क्षेत्रात लोक वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. वाहनांना विमा सवलत मिळावी, तसेच जाचक स्कूलबस नियमावली २०११ हा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

     यावेळी विक्रम राठोड म्हणाले, गेल्या ८-९ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने स्कूल बस वाहतुक करणार्‍यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. अजूनही शाळा सुरु झाल्या नसल्याने या वाहन चालकांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून, त्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी संजय आव्हाड म्हणाले, कोरोनामुळे बस वाहतुक बंद असल्याने यावर उपजिविकी असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय जरी बंद असले तरी बँकेचे हप्ते, विमा, पासिंग, आरटीओ वार्षिक कर हे सुरु आहेत. व्यवसाय बंद असल्याने हे कर भरणे शक्य नाही. त्यामुळे किमान यामध्ये सवलत देऊन, या व्यवसायावर अलवंबून असणार्‍यांना अनुदान देऊन दिलासा देण्याचे काम करावे, असे म्हटले आहे.

     सदरील मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनाही देण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बलात्कार करुन हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

मानवहित लोकशाही पक्षाची निवेदनाद्वारे मागणी

     वेब टीम नगर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावात मुकबधीर मुलींवर बलात्कार करुन निघृण हत्या करणार्‍या आरोपींना नवीन कायद्यातंर्गत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गाडे, सरचिटणीस आधाताई ससाणे, शहराध्यक्ष महादेव नेटके, अनिल ससाणे, युवा तालुकाध्यक्ष पांडूरंग शेंडगे,  खंडू शेंडगे, भिमराज वाघचौरे, दिनेश वैरागर, विजय डाडर आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिलोली शहरात दि. ९ डिसेंबर २०२० रोजी गरीब मुकबधीर मुलीवर दोन-तीन नराधमांनी बलात्कार करुन दगडाने ठेचून अमानुष खून केला. या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून नवीन कायद्यांतर्गत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.  सदरच्या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे.

     तरी सदरील घटना अत्यंत निंदनीय आणि धृणास्पद असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. समाजात अशी घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. सदर प्रकार गंभीर असून, तातडीने कार्यवाही व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रयत शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणार

युवा स्फूर्ती प्रतिष्ठान : लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

वेब टीम नगर : कोरोना महामारीमुळे बंद असलेली शाळांची दरवाजे लवकरच उघडणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येवू नये, गरजू विद्यार्थी वर्गास शालेय साहित्याचा खर्च करावा लागू नये या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात तळागळातील विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शालेय साहित्य पुरवण्याचा निर्धार युवा स्फूर्ती प्रतिष्ठान संस्थेने केला आहे. या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निर्मल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड हॉस्पिटॅलिटीचे संचालक डॉ. निरंजन निर्मळ यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या उपक्रमची माहिती दिली. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात असे उपक्रम प्रशंसनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच सातारा येथून सुरवात होणा-या या उपक्रमाच्या शुभारंभास रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा  पवार यांना भेट देण्यात आली.

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या जास्तीत जास्त गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी मोफत गणवेश, शुज व शालेय साहित्य युवा स्फु्र्ती प्रतिष्ठान संस्थेच्या तसेच विविध कंपन्यांच्या रिझर्व फंडातून देण्यात येणार आहे, असे  डॉ. निरंजन निर्मळ यांनी सांगितले.


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना यशस्वी करण्यासाठी

घरकुल वंचितांचा सत्यबोधी सूर्यनामा

नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी 

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील ११ हजार घरकुल वंचितांना तसेच परिसरातील ५ हजार घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तर घरकुल वंचितांचा सत्यबोधी सूर्यनामा करुन सदर प्रस्तावाचे निवेदन घरकुल वंचितांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले आहे. 

इसळक, निंबळक शिवारामध्ये सुमारे चारशे एकर खडकाळ पड जमीन आहे. तसेच वडगावगुप्ता, नागपूर या सलग गावांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पड जमीनी आहेत. या खडकाळ जमीनीवर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प राबवले जाऊ शकतात. शहरांमध्ये असणार्‍या झोपडपट्ट्या विसर्जित करण्यासाठी हा प्रकल्प प्रभावी ठरणार आहे. या भागात रस्ते, वीज व पाणी या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबल स्थानिक स्वराज्य संस्था असणे आवश्यक आहे. हा प्रश्‍न सुटण्यासाठी नगरपालिकेची मागणी करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

देशातील कोणतेही सरकार कोणत्याही घरकुल वंचितांना रेशन कार्डवर फुकट घर किंवा भूमी गुंठा देऊ शकणार नाही. याची जाणीव  झालेल्या बैठकित घरकुल वंचितांना करुन देण्यात आली. त्याचबरोबर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय घरकुल वंचितांना स्वस्तात घरे मिळणार नाही. ही बाब सत्य असल्याचे सर्वांनी मान्य केली. घरकुल वंचितांनी एकत्रित होऊन यापूर्वी घरकुलासाठी प्रयत्न न केल्यामुळे ७३ वर्षात घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही. परंतु आता घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेद्वारे संघटना प्रयत्न करीत असताना राज्य सरकारने मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन दुबळ्या समाज घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पुनम पवार, मनिषा राठोड, लंकाबाई शिंदे, पोपट भोसले, सविता भोसले, श्रध्दा दुग्गल, लतिका पाडळे, फरिदा शेख, शालिनी भिंगारदिवे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

युवकांना नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत 

गजेंद्र राशिनकर : सिव्हिल हडकोतील युवकांचा मनसेत प्रवेश

वेब टीम नगर : सिव्हिल हडको परिसरातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. युवा कार्यकर्ते तथा तांडव ग्रुपचे अध्यक्ष ऋतिक लद्दे आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत दाखल झाले. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सरचिटणीस नितीन भुतारे, मनसे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विनोद काकडे, महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे, अभिनय गायकवाड, संकेत होशिंग, सतीश वडे आदि उपस्थित होते.

सिव्हिल हडको येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी श्याम निंबाळकर, विकी बरकसे, आनंद शिंदे, अक्षय बरकसे, नईमुद्दीन शेख, सौरव सोनार, धनंजय गायकवाड, विजू ठोंबरे, शुभम नन्नवरे, अनता पालवे, शुभम आव्हाड, अक्षय गायकवाड, मोनू कांडेकर, रेहान शेख, शेखर राशिनकर, वैभव तिजोरी, समीर अत्तर, राहुल कुमार आदि परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गजेंद्र राशिनकर म्हणाले की, पुरोगामी विचाराने मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणात सक्रीय आहे. युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत आहे. युवकांसह मराठी बांधवांचे प्रश्‍न पक्षाच्या ध्येय धोरणाने सुटणार आहे. घराणेशाहीने बरबटलेल्या राजकारणात मनसे हा पक्ष युवकांना एक उत्तम पर्याय आहे. मराठी अस्मितेसाठी पक्षनिष्ठेने मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करीत आहे. सर्व सामाजाला बरोबर घेऊन मनसेची वाटचाल सुरु असून, युवकांना काम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिन डफळ म्हणाले की, युवा शक्तीने परिवर्तन शक्य आहे. मात्र इतर पक्षाचे राजकारणी त्यांचा वापर आपल्या आपला हेतू साध्य करण्यासाठी करीत आहे. मनसेत युवकांना एक वेगळी दिशा देऊन त्यांना नेतृत्वाची संधी निर्माण करुन देण्यात आली आहे. पक्षाच्या या धोरणामुळे युवक मनसेकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नितीन भुतारे यांनी युवकांना सामाजिक कार्यासाठी व दीनदुबळ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून ध्येय धोरणानुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा प्रश्‍न न सोडविल्यास आंदोलन करणार 

कॉ. सुभाष लांडे : नव्याने पारित केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा पुढाकार

वेब टीम नगर : केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे आणि ग्राहकांची लूट करण्याच्या हेतूने कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करून देणारे तीन जनविरोधी कृषी कायदे संसदेत पारित केले आहे. हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. तर शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, अशोक बाबर, महादेव पालवे, भाऊसाहेब थोटे, कॉ. महेबुब सय्यद, अंबादास दौंड, लहू लोणकर, संतोष गायकवाड, रामदास वागस्कर, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, चंद्रकांत माळी, गणेश माळी आदि सहभागी झाले होते.

नव्याने पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन करीत आहे. शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले असून, या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यामुळे सोमवारी (दि.१४ डिसेंबर) रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन व निदर्शने केले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर  किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात दहा केंद्रीय कामगार संघटना, देशभरातील विविध उद्योगांतील कामगार आणि कर्मचारी फेडरेशन यांनी पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तातडीने केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करावे आणि विजेचे खाजगीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकर्‍यांचे प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने न सोडविल्यास जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे डोळेझाक करणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येक शासकीय कार्यालयात ठिय्या आंदोलन व खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या तयारीत शेतकरी असल्याची माहिती अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ
मनपाच्या प्रवेशद्वारात काते यांचा कुटुंबियांसह ठिय्या
कागदपत्रे गहाळ झाल्याने आंदोलक संतप्त

वेब टीम नगर : नगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले. महापालिकेचे गेट बंद आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी आंदोलकांना रोखले. सदर मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देण्यात आले. डॉ. पठारे यांनी आस्थापनेला सदर कागदपत्राची विचारपुस केली असता सदर कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती मिळाली. मात्र काते परिवार कागदपत्र मिळण्यावर ठाम असून, अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात रविंद्र मिसाळ, ज्योती मिसाळ, सुशिला काते, शंकर काते, सिताबाई रोकडे, सुनिता वैरागर आदि सहभागी झाले होते.

शंकर काते हे नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना कायमस्वरुपी कामाची नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सिताराम वाघमारे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे त्यांचा वारस दाखवून नोकरी मिळवली असल्याचा आरोप काते यांनी केला आहे. आई, वडिलांना धमकावून सदर कागदपत्रे नगरपालिकेत दाखल केले. मी व माझे भाऊ लहान व अशिक्षित असल्याने काही करता आले नसल्याचे काते यांनी निवेदनात म्हंटले आहे.

सदर व्यक्ती 35 ते 40 वर्षापासून नोकरी करत होता. त्यानंतर त्या जागेवर त्याच्या मुलास नोकरी लावण्यात आली आहे. मात्र शंकर काते यांचे कुटुंबीय हक्काच्या नोकरीपासून वंचित असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सदर प्रकरणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या आस्थापना प्रमुखांना शंकर काते यांच्या नोकरीची जुनी ऑर्डर व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या संबंधीत अधिकार्‍यांनी सदर कागदपत्रे न्यायालयात सादर करु असे खोटे आश्‍वासन काते परिवाराला दिले होते. मात्र महापालिकेत सदर कागदपत्रे उपलब्ध नसल्याने काते परिवाराने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गदिमांचे स्मारक महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित ठरेल -संजय कळमकर

गदिमांच्या स्मारकासाठी सरकारला जाग आणण्यासाठी

गदिमांच्या साहित्यावर काव्यजागर

वेब टीम नगर - महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, गीतरामायणकार ग.दि. माडगळूकर यांचे स्मारक महाराष्ट्राचे संचित ठरेल. त्यासाठी गदिमांची जन्मभूमी शेटफळ, मुळ गाव माडगूळ व कर्मभूमी पुणे येथे स्मारकासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.

गदिमांच्या स्मारकासाठी सरकारला जाग आणण्यासाठी 36 जिल्हे, 4 राज्ये व 6 देशात एकाचदिवशी गदिमांच्या साहित्यावर आधारित काव्यजागर कार्यक्रम करण्यात आला. नगर येथे कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या काव्य जागर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कळमकर बोलत होते. जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, मसापचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, गझलकार प्रा. रविंद्र काळे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदि उपस्थित होते.

कळमकर पुढे म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेण्यातच बरेचसे पुर्वायुष्य खर्ची पडल्याने गदिमांच्या मनात आयुष्याविषयी कटूता वा अढी नव्हती. त्याचे स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसायचे. गदिमा हे मराठी साहित्य संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. दारिद्रय व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस त्यांचा कायम कृतज्ञ आहे. आपल्या रूपाने गदिमांनी साहित्य चित्रपटसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले. अशा मनस्वी साहित्यिकाचे स्मारक होणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल असे ते म्हणाले.

ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी सांगितले की, आमच्या तरुण वयात गदिमांच्या गीतरामायणाचे मोठी भुरळ सर्वांना होती. गदिमांचे निधन झाले तेव्हा रोज गितरामायण ऐकणारे एक प्राध्यापक रेडिओ छातीशी लावून रडण्याचे मी पाहिले आहे. गदिमा समाजमनाच्या इतके खोलवर रुजलेले होते. यावेळेस गझलकार प्रा .रवी काळे, जयंत येलूलकर यांचीही भाषणे झाली. बापूराव गुंजाळ व विजय साबळे यांनी गदिमांच्या काही कविता गाऊन दाखवल्या. प्रास्ताविक गझलकार प्रा. रवींद्र काळे यांनी केले तर आभार सचिन साळवे यांनी मानले. राज्यभर या आंदोलनासाठी पुढाकार घेणार्‍या मराठीतील प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळेस करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

" त्या "  बोगस कागदपत्राच्या आधारे राहत्या घरावर चढवला कर्जाचा बोजा

तलाठी, मंडळ अधिकारी व लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने गैरप्रकार केल्याचा आरोप

वेब टीम नगर : महापालिका हद्दीतील बोल्हेगाव गावठाण संभाजीनगर येथील ओमकार रो हाऊसिंग कॉलनीतील प्लॉट नंबर४ते ६/१येथील राहत्या घरावर बोगस कागदपत्राच्या आधारे तलाठी ज्ञानेश्‍वर बेल्हेकर, मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड व व्यवस्थापक लक्ष्मीनारायण पतसंस्था यांनी संगनमत करून घरावर बोजा चढविल्याचा आरोप दिलीप मारुती राख यांनी केला आहे. तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले.

दिलीप मारुती राख यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी दुधाची विक्री करून व रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. माझ्या कुटुंबाने २०१८मध्ये ओमकार कॉलनी बोल्हेगाव गावठाण येथे इंडियन बँकेचे कर्ज घेऊन घर घेतले होते. वरील उतारा तलाठी नागापूर यांच्याकडून आणल्यानंतर असे निदर्शनास आले की, माझ्या घरावर लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे व्यवस्थापक व तलाठी मंडळ अधिकारी यांनी खोटे बनावट कागदपत्र तयार करून कर्ज दाखवून नोंद केली आहे. याबाबत दुय्यम निबंधक अहमदनगर यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक १५ विषयी चौकशी केली असता तिन्ही कार्यालयमध्ये माझ्या नावाचा दस्त क्रमांक पंधरा आढळून आलेला नाही. सदर प्रकरणी माहिती घेतली असता अशा प्रकारचा कोणताही दस्त आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही, असे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयतील अधिकार्‍यांनी सांगितले. २०१९ या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्या नावाचा कुठल्याही प्रकारचा दस्त झालेला नाही, असे देखील सांगण्यात आले. लक्ष्मीनारायण पतसंस्थेकडून ३५ हजार ६८६ कर्ज घेतलेले नाही. तसेच फेर नंबर १४१६६ मध्ये मला७ एप्रिल रोजी नोटीस बजावल्याचे दर्शविले आहे. या कोरोना महामारी रोगामुळे संपूर्ण राज्यामध्ये कडक लॉकडाऊन होता. अशावेळी तलाठी यांनी नोटीस कोणत्या प्रकारे व कोणत्या पोस्टाने बजावली? हे देखील समजत नसल्याचे म्हंटले आहे.

सदर प्रकरणी सर्व कागदपत्र हे बोगस खोटे दर्शविलेले आहे. दस्त नंबर १५ उपलब्ध नसून, तो अन्य व्यक्तींच्या नावावर आहे. तरी वरील सर्व कागदपत्र हे बोगस खोटे असून, तलाठी ज्ञानेश्‍वर बेल्हेकर, मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड व व्यवस्थापक लक्ष्मीनारायण पतसंस्था यांनी संगनमत करून घरावर बोजा चढविल्याचा आरोप दिलीप मारुती राख यांनी केला आहे. या प्रकरणामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक स्वरूपाचे नुकसान झाले असताना सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments